भाग्यश्रीला 'मैने प्यार किया'साठी सलमान खानपेक्षा जास्त मानधन का मिळालं? अभिनेत्रीने सांगितलं त्यामागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 14:32 IST2026-05-11T14:29:47+5:302026-05-11T14:32:23+5:30
भाग्यश्री हिला 'मैने प्यार किया' या चित्रपटासाठी सलमानपेक्षा चौपट जास्त मानधन मिळालं होतं.

भाग्यश्रीला 'मैने प्यार किया'साठी सलमान खानपेक्षा जास्त मानधन का मिळालं? अभिनेत्रीने सांगितलं त्यामागचं कारण
बॉलिवूडमध्ये स्त्री आणि पुरुष कलाकारांच्या मानधनातील तफावत हा अनेक वर्षांपासून चर्चेचा आणि वादाचा विषय राहिला आहे. अनेक आघाडीच्या अभिनेत्रींनी मान्य केले आहे की त्यांना पुरुष सहकलाकारांच्या तुलनेत खूप कमी, कधीकधी केवळ १०-१५ टक्के मानधन मिळते. पण, अभिनेत्री भाग्यश्री हिला 'मैने प्यार किया' या चित्रपटासाठी सलमानपेक्षा चौपट जास्त मानधन मिळालं होतं. खुद्द भाग्यश्रीनेच एका मुलाखतीत यामागचं व्यावसायिक कारण स्पष्ट केलं आहे.
१९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मैने प्यार किया' या चित्रपटासाठी राजश्री प्रॉडक्शन्सने भाग्यश्रीला १ लाख रुपये मानधन दिले होते. दुसरीकडे, या चित्रपटाचा मुख्य अभिनेता असलेल्या सलमान खानला केवळ २५ हजार रुपये मिळाले होते. भाग्यश्री म्हणाली, "हे सर्व 'मागणी आणि पुरवठा' या गणितावर अवलंबून आहे. चित्रपटसृष्टी हा शेवटी एक व्यवसाय आहे. निर्मात्याला किंवा दिग्दर्शकाला जेव्हा एखादी विशिष्ट अभिनेत्रीच भूमिकेसाठी हवी असते, तेव्हा त्यांना ती मागणी पूर्ण करावीच लागते".
मानधनातील भेदभावाबद्दल बोलताना भाग्यश्रीने स्पष्ट मत मांडलं. ती म्हणाली की, जोपर्यंत महिला कलाकार एकत्र येऊन स्वतःचं मूल्य ठरवत नाहीत, तोपर्यंत ही समस्या कायम राहील. सिनेसृष्टीत नेहमीच कोणीतरी कमी पैशात काम करायला तयार असतं, त्यामुळे वाटाघाटी करणे कठीण होते. मात्र, केवळ पैसाच महत्त्वाचा नसून कामाचा आनंदही महत्त्वाचा असल्याचं तिने नमूद केलं.
विशेष म्हणजे, ३५ वर्षांनंतर ही जोडी नुकतीच रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक चित्रपटात दिसली. या चित्रपटात भाग्यश्रीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईची, राजमाता जिजाऊंची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात सलमान खानचीही विशेष भूमिका आहे, मात्र या दोघांचेही एकत्र एकही दृश्य (Frame) नाही. तरीही या जुन्या जोडीचे नाव एकाच प्रोजेक्टशी जोडले गेल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली.