'धुरंधर' सुपरहिट पण अर्जुन रामपालला 'या' गोष्टीचं वाटतंय वाईट, म्हणाला-"भावनिकदृष्ट्या खूप..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 12:41 IST2025-12-24T12:38:10+5:302025-12-24T12:41:36+5:30
"खूप वाईट..."; 'धुरंधर'मधील मेजर इक्बालच्या भूमिकेबद्दल अर्जुन रामपालचं वक्तव्य, 'या' गोष्टीचं होतंय दु:ख

'धुरंधर' सुपरहिट पण अर्जुन रामपालला 'या' गोष्टीचं वाटतंय वाईट, म्हणाला-"भावनिकदृष्ट्या खूप..."
Arjun Rampal: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर'(Dhurandhar) या सिनेमाची सध्या सर्वत्र क्रेझ आहे. चित्रपट आणि त्यातील कलाकारांच्या दमदार अभिनयाचं कौतुक होत आहे. उत्कृष्ट कथा, कलाकारांचा दमदार अभिनय आणि अप्रतिम संगीतामुळे या चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांकडून दाद मिळते आहे. रणवीर सिंग (Ranveer Singh) स्टारर या चित्रपटात अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना आणि आर. माधवन यांसारखे दमदार कलाकार आहेत. धुरंधरमध्ये अभिनेता अर्जुन रामपाल एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र, हे पात्र साकारताना त्याच्या मनात एक खंत होती, एका मुलाखतीत अभिनेत्याने यावर भाष्य केलं आहे.
'धुरंधर' या चित्रपटात अर्जुन रामपालने मेजर इक्बालची भूमिका साकारली आहे. ते एका देशविरोधी क्रूर आयएसआय मास्टरमाइंड आहे. त्याच्या या कामाचं खूप कौतुक होत आहे. ग्राझिया इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन रामपालने सांगितलं की,अशा प्रकारची भूमिका साकारणं त्याच्यासाठी भावनिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक होतं, त्याचं कारण म्हणजे देशप्रेम. तो म्हणाला, "मला या भूमिकेतून लवकरात लवकर बाहेर पडायचं होतं. हा चित्रपट करण्याचं कारण हेच होतं की, तो एका महत्त्वाच्या कथेवर आधारित आहे. एखादी घटना बाहेरून पाहणं ही वेगळी गोष्ट आहे, पण पडद्यामागे काय घडलं हे दाखवणं त्याहून अधिक रोमांचक असतं."
'या' गोष्टीचं अभिनेत्याला वाटतंय वाईट...
पुढे तो म्हणाला, "शूटिंग दरम्यान चित्रपटातील त्या पात्रामुळे मला खूप वाईट वाटलं. पण, खरंतर मी माझ्या देशावर खूप प्रेम करतो.पण हेच तर एका अभिनेत्याचं काम असतं आणि त्याला त्या भूमिकेशी एकरुप व्हावं लागतं." असं अभिनेत्याने सांगितलं.
'धुरंधर' हा स्पाय थ्रिलर सिनेमा आहे. या चित्रपटात रणवीर सिंगने एका निर्भीड गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. या चित्रपटाचा सिक्वेल मार्च २०२६ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.