अर्चना सिंहच्या मुलासोबत ऑनलाइन फसवणूक, फ्री ट्रायलच्या नावाखाली ८७ हजारांचा चुना लागला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 11:48 IST2026-04-26T11:48:17+5:302026-04-26T11:48:36+5:30
प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना पूरण सिंहच्या मुलाची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. फ्री ट्रायलच्या नावाखाली अर्चनाचा मुलगा आयुष्मानला तब्बल ८७ हजार रुपये गमवावे लागले आहेत.

अर्चना सिंहच्या मुलासोबत ऑनलाइन फसवणूक, फ्री ट्रायलच्या नावाखाली ८७ हजारांचा चुना लागला
ऑनलाइन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना पूरण सिंहच्या मुलाची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. फ्री ट्रायलच्या नावाखाली अर्चनाचा मुलगा आयुष्मानला तब्बल ८७ हजार रुपये गमवावे लागले आहेत. युट्यूबवर व्हिडीओ शेअर करत अर्चना आणि तिच्या मुलाने या फसवणुकीबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. याआधीही आयुष्मानची अशाच पद्धथीने ८० हजार रुपयांची फसवणूक झाली होती.
अर्चनाचा मोठा मुलगा आर्यमन सेठी याने त्याच्या व्लॉगमधून हा सर्व प्रकार सांगितला आहे. त्याच्या व्लॉगमध्ये आयुष्मान घाबरलेला दिसत आहे. "माझ्या क्रेडिट कार्डमधून ८७ हजार रुपये काढले गेले आहेत. सात दिवसांच्या फ्री ट्रायलच्या बदल्यात त्यांनी पूर्ण एका वर्षाचे पैसे घेतले", असं तो व्हिडीओत म्हणत आहे. त्यानंतर अर्चना त्याला सल्ला देते की "याला आधी ब्लॉक कर. क्रेडिट कार्ड कंपनीला फोन कर". त्यानंतर परमीत सेठ त्याला म्हणतो की कार्ड रद्द करू नकोस. फक्त ट्रानझॅक्शन रद्द कर. मग आयुष्मान त्यांना विचारतो की "मला हा ऑप्शन कुठे मिळेल?". मग सगळं कुटुंबच हसायला लागतं असं व्हिडीओत दिसत आहे.
आयुष्मानसोबत नेमकं काय घडलं?
आयुष्मानने सांगितलं की "माझ्या परवानगी शिवाय माझ्या क्रेडिट कार्डमधून पैसे काढले गेले. त्यांनी सांगितलं होतं की सात दिवसांचं फ्री ट्रायल असेल आणि त्यानंतर पूर्ण फी घेतली जाईल. पण, माझ्या परवानगीशिवाय त्याआधीच त्यांनी माझ्याकडून पूर्ण वर्षाची फी घेतली. मला त्या वेबसाइटचं नाव आठवत नाही. पण ती ऑथेंटिक वेबसाइट होती. मी ती वापरत होतो. त्यांनी सात दिवस फ्री ट्रायलच्या नावाखाली माझ्या अकाऊंटमधून पैसे घेतले. सुरुवातील शून्य डॉलरच्या ट्रानझॅक्शनला मी मंजूरी दिली होती. त्यानंतर एका तासाने माझ्या अकाऊंटमधून ८७ हजार रुपये गेले".