अरबाज खाननं अंधेरीमधील फ्लॅट विकून कमावले कोट्यवधी; खरेदी किमतीपेक्षा दुप्पट नफा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 16:33 IST2026-05-08T16:33:13+5:302026-05-08T16:33:55+5:30
अरबाज खानने ११ वर्षांपूर्वी खरेदी केलेला हा फ्लॅट आता दुप्पट किमतीला विकला आहे.

अरबाज खाननं अंधेरीमधील फ्लॅट विकून कमावले कोट्यवधी; खरेदी किमतीपेक्षा दुप्पट नफा!
Arbaaz Khan : बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खान पुन्हा एकदा आपल्या रिअल इस्टेट व्यवहारामुळे चर्चेत आला आहे. अरबाजने मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील आपला एक आलिशान फ्लॅट कोट्यवधी रुपयांना विकला आहे. अरबाजनं ही मालमत्ता विकून मोठा नफा कमावला आहे. अरबाज खानने ११ वर्षांपूर्वी खरेदी केलेला हा फ्लॅट आता दुप्पट किमतीला विकला आहे.
अरबाजने मुंबईतील अंधेरी वेस्ट परिसरातील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील आलिशान अपार्टमेंट तब्बल ६.५ कोटी रुपयांना विकलं आहे. प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन कागदपत्रांनुसार, हा व्यवहार ५ मे २०२६ रोजी नोंदवण्यात आला. हे अपार्टमेंट Infinity Mallजवळील 'रनवाल एलिगंट' प्रोजेक्टच्या टॉवर बीमध्ये आहे. फ्लॅटचं कार्पेट एरिया सुमारे १,३६९ स्क्वेअर फूट असून त्यासोबत दोन कार पार्किंगची सुविधाही आहे. या व्यवहारासाठी खरेदीदारांनी सुमारे ३९ लाख रुपयांचं मुद्रांक शुल्क भरल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या फ्लॅटच्या विक्रीतून अभिनेत्याने ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा कमावला आहे. मालमत्तेशी संबंधित कागदपत्रांमधून हे उघड झाले आहे की, अरबाज खानने हा फ्लॅट मे २०१५ मध्ये रनवाल ग्रुपकडून ३.३८ कोटी रुपयांना खरेदी केला होता. त्यावेळी खरेदीवर १६.९२ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यात आले होते. ताज्या विक्री मूल्याच्या आधारावर, गेल्या ११ वर्षांत या अपार्टमेंटचे मूल्यांकन जवळपास दुप्पट झाले आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच अरबाज खानने मुंबईतील जोगेश्वरी वेस्ट परिसरात नवीन अपार्टमेंट खरेदी केलं होतं. सुमारे २.७८ कोटी रुपये किंमतीचा हा फ्लॅट 'ऑटोग्राफ रेसिडेन्सी' या इमारतीच्या २७व्या मजल्यावर आहे. या फ्लॅटचं कार्पेट एरिया १,२४३ स्क्वेअर फूट असून दोन पार्किंग स्पेसचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या व्यवहाराची नोंदणी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आली होती. यासाठी १६ लाख रुपयांहून अधिक स्टॅम्प ड्युटी आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरलं गेलं होतं. दरम्यान, अरबाजची एकूण संपत्ती सुमारे ५०० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.