कार्तिक आर्यनविरुद्ध कट रचला जातोय...! अनुभव सिन्हांच्या ट्वीटमुळे बी-टाऊनमध्ये खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 18:24 IST2021-06-04T18:21:41+5:302021-06-04T18:24:55+5:30
Kartik Aaryan : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. कारण काय तर लागोपाठ तीन सिनेमांमधून त्याची झालेली हकालपट्टी...

कार्तिक आर्यनविरुद्ध कट रचला जातोय...! अनुभव सिन्हांच्या ट्वीटमुळे बी-टाऊनमध्ये खळबळ
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. कारण काय तर लागोपाठ तीन सिनेमांमधून त्याची झालेली हकालपट्टी. आधी करण जोहरने त्याच्या ‘दोस्ताना 2’ या सिनेमातून कार्तिकला आऊट केले. पाठोपाठ शाहरूख खान प्रॉडक्शनच्या एका बिग बजेट सिनेमातून त्याला बाहेर करण्यात आले. यानंतर आनंद एल रॉय यांच्या चित्रपटातूनही कार्तिकला बाहेर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अद्याप कार्तिक या मुद्यावर काहीही बोललेला नाही. पण आता दिग्दर्शक अनुभव सिन्हा (Anubhav Sinha) कार्तिकच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. कार्तिकसाठी त्यांनी केलेले ट्वीट सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे सुशांत सिंग राजपूत याच्यासारखाच कार्तिकविरोधातही कट रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अनुभव सिन्हा यांनी गुरूवारी एक ट्वीट केले आणि हे ट्वीट पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. ‘ जेव्हा एखादा निर्माता एखाद्या अभिनेत्याला चित्रपटातून बाहेर करतो किंवा अभिनेता स्वत:हून चित्रपट सोडतो तेव्हा ते दोघेही या विषयावर चुप्पी साधतात. प्रत्येकवेळी हेच घडतं. माझी अशी पक्की खात्री आहे की, कार्तिक आर्यन विरोधात कट रचला जातोय किंवा मोहिम सुरू केली जातेय आणि हा अन्याय आहे. कार्तिक गप्प आहे आणि मी त्याच्या मौनाचा आदर करतो,’ असे अनुभव सिन्हा यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले.
अनुभव सिन्हाच्या या ट्वीटनंतर अनेक नेटकरी कार्तिकची बाजू घेताना दिसले. इतकेच नाही तर सोशल मीडियावर पुन्हा एकदा इनसाईडर विरूद्ध आऊटसाईडर असा वाद रंगला आहे. अनेकांनी कार्तिकवर अन्याय होत असून यासाठी करण जोहर जबाबदार असल्याचा थेट आरोप केला आहे. अनेकांनी कार्तिकने याविरोधात आवाज उठवावा, अशी भावनाही व्यक्त केली आहे. कार्तिक बोलला नाही पण अनुभव सिन्हा यांनी बोलण्याची हिंमत दाखवली, यासाठी अनेक युजर्सनी त्यांचे कौतुकही केले आहे.
म्हणून ‘दोस्ताना2’मधून झाली होती हकालपट्टी?
कार्तिकला सिनेमातून काढल्यानंतर करण जोहर सोशल मीडियावर ट्रोल झाला होता. कालांतराने करणने असे का केले, याचे कारणही समोर आले होते. ईटी टाईम्सच्या रिपोर्टनुसार, कार्तिक आर्यनला गेल्या वर्षी लॉकडाउनच्या आधी 2-3- कोटी रुपये मानधनावर ‘दोस्ताना 2’ या चित्रपटासाठी साइन केले होते. नंतर त्याची ब्रँड व्हॅल्यू वाढली आणि त्याने अधिक मानधनाची मागणी केली. कार्तिक आर्यनची ब्रँड व्हॅल्यू 10 कोटींवर गेली होती आणि त्यामुळे त्याने निर्मात्यांकडे ही मागणी केली होती. यावर करण जोहर अजिबात खूष नव्हता. याशिवाय कार्तिकच्या या अनप्रोफोशनल वागणुकीला घेऊन देखील तो नाराज होता. त्यामुळे त्याने थेट कार्तिकला चित्रपटातून बाहेर काढले. एवढेच नाही तर कार्तिक आर्यनला सोशल मीडियावर देखील अनफॉलो केले.