अक्षय कुमार-अर्शद वारसी पुन्हा एकत्र झळकणार रुपेरी पडद्यावर, 'जॉली एलएलबी ३' मध्ये येणार आमनेसामने
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 15:18 IST2025-08-25T15:16:44+5:302025-08-25T15:18:21+5:30
अक्षय कुमार-अर्शद वारसी पुन्हा एकत्र झळकणार,'जॉली एलएलबी ३' मध्ये येणार आमनेसामने

अक्षय कुमार-अर्शद वारसी पुन्हा एकत्र झळकणार रुपेरी पडद्यावर, 'जॉली एलएलबी ३' मध्ये येणार आमनेसामने
Jolly LLB 3 : बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजे अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शद वारसी त्यांचा आगामी चित्रपट 'जॉली एलएलबी-३' (Jolly LLB 3)मुळे प्रचंड चर्चेत आहेत.'जानी दुश्मन' आणि 'बच्चन पांडे' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर अक्षय कुमार आणि अर्शद वारसी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता तिसऱ्या भागात काय वेगळं पाहायला मिळणार याबद्दल सिनेरसिकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
'जॉली एलएलबी ३'च्या माध्यमातून प्रेक्षकांना कोर्टरुम ड्रामा अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटात अर्शद वारसीचा जॉली त्यागी आणि अक्षय कुमारचा जॉली मिश्रा समोरासमोर येणार आहेत. आपल्या विनोदी शैलीसाठी ओळखले जाणारे हे दोन्ही अभिनेते रुपेरी पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहेत. कोर्टरूममधील त्यांच्यातील वाद-प्रतिवाद न्यायाधीश त्रिपाठी (सौरभ शुक्ला) निकाल देताना त्यांच्या मध्ये पडून कसे मुद्दे सोडवतात, हे पाहणं देखील मजेशीर असणार आहे. जॉली एलएलबी फ्रँचायझीची कथा एका कोर्टातील केसभोवती गुंफण्यात आली आहे. कलाकारांचा अभिनय, कॉमिक टायमिंगने या चित्रपटाने स्मार्ट कोर्टरूम ड्रामाचा ट्रेंड सेट केला.दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकमेकांसमोर येत असल्याने, हा सिक्वेल आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धाडसी अध्याय बनत आहे.
सुभाष कपूर लिखित,दिग्दर्शित हा चित्रपट येत्या हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या या टीझरला प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे सध्या तरी अनेकांचं लक्ष या चित्रपटाकडे लागून राहिलं आहे. या चित्रपटातून अक्षय कुमार आणि अर्शद वारसी दोन तगडे कलाकार एकत्र येत आहेत. त्यामुळे हा चित्रपट या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे, यात शंका नाही.