'बॉर्डर ३' कन्फर्म? 'त्या' चर्चांवर खुद्द निर्मात्यांनीच दिलं उत्तर, म्हणाले-"यासाठी योग्य वेळ..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 10:23 IST2026-01-27T10:19:30+5:302026-01-27T10:23:12+5:30
एकीकडे 'बॉर्डर २' ची क्रेझ असताना 'बॉर्डर ३'बद्दल जोरदार चर्चा, खुद्द निर्मात्यांनीच दिली हिंट, म्हणाले...

'बॉर्डर ३' कन्फर्म? 'त्या' चर्चांवर खुद्द निर्मात्यांनीच दिलं उत्तर, म्हणाले-"यासाठी योग्य वेळ..."
Bhushan Kumar On Border 3 : अनुराग सिंग दिग्दर्शित 'बॉर्डर-२' हा सिनेमाची सध्या सगळीकडे जोरादार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सनी देओल,वरुण धवन, दिलजीत दोसांझ यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २३ जानेवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या तांत्रिक बाजू, कथा आणि कलाकारांच्या अभिनयाचं समीक्षकांनी भरभरून कौतुक केलं आहे. या देशभक्तीपर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अवघ्या ४ दिवसांत जवळपास १५० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. त्यामुळे लवकरच 'बॉर्डर-२' दोनशे कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करेल एवढी मात्र, नक्की. एकीकडे सिनेमागृहात आणि चाहत्यामध्ये या चित्रपटाची क्रेझ असताना आता आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
‘बॉर्डर’ सिनेमाचा दुसरा भाग अजून चित्रपटगृहात सुरु असताना आता ‘बॉर्डर’ सिनेमाचा तिसरा भाग सुद्धा येणार अशा चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत. बॉर्डर-२ च्या यशानंतर निर्माते भूषण कुमार यांनी चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. अलिकडेच हिंदुस्तान टाइम्स सोबत संवाद साधताना त्यांना बॉर्डर सिनेमाच्या तिसऱ्या भागाबद्दल हिंट दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले,"'बॉर्डर' ही एक मोठी फ्रँचायझी आहे आणि जवळजवळ ३० वर्षांनंतर ही कथा पुन्हा पडद्यावर पाहिल्यानंतर आम्हाला जे काही प्रेम मिळतंय, ते बघून आता आमचा पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे." मात्र, यासाठी योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागेल, असंही त्यांनी सांगितलं.
चाहत्यांची उत्सुकता वाढली...
बॉर्डर २ सिनेमा प्रदर्शित होऊन पाच दिवस झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल विचारणा करत आहेत. यावर भुषण कुमार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या मुलाखतीत म्हणाले की, बॉर्डर-३ हा त्यांच्या आगामी प्रोजेक्ट नसेल. तर अनुराग सिंग यांच्यासोबत ते दुसऱ्याच एका महत्वाच्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. त्यानंतरच "बॉर्डर" फ्रँचायझी काम सुरु करण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.