"त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढणार होते, पण..."; धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अभिनेत्री सायरा बानूंना धक्का, केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 10:23 IST2025-11-25T10:22:15+5:302025-11-25T10:23:38+5:30
धर्मेंद्र आणि सायरा बानू यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सायरा बानूंनी भावुक शब्दात त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या

"त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढणार होते, पण..."; धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अभिनेत्री सायरा बानूंना धक्का, केला मोठा खुलासा
बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र यांचं निधन झाल्याच्या बातमीने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. आपल्या ९० व्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला, त्यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो (Saira Banu) यांचाही समावेश आहे. सायरा बानू यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत 'साजिश', 'पॉकेट मार' आणि 'ज्वार भाटा' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सायरा बानूंना धक्का बसला आहे.
सायरा बानू यांना धक्का
धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी ऐकून सायरा बानो यांना सुरुवातीला विश्वासच बसला नाही. न्यूज १९ वृत्तसंस्थेशी बोलताना त्या अत्यंत भावूक झाल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या रडत म्हणाल्या की,"ते माझ्या कुटुंबासारखे होते. ते खूप सुंदर आणि देखणे व्यक्ती होते!"
पुढे अभिनेत्री सायरा बानू यांनी धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत एक अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला. त्या म्हणाल्या, "त्यांची तब्येत सुधारत होती. त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात येणार होतं. पण आता मी काय बोलू?" त्यांच्या या वक्तव्यामुळे धर्मेंद्र यांचे निधन त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि जवळच्या लोकांसाठी किती अनपेक्षित आहे, हे स्पष्ट होते.
धर्मेंद्र आणि सायरा बानू यांनी 'आदमी और इंसान', 'रेशम की डोरी' आणि 'चैताली' अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. सायरा बानू यांनी धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारालाही हजेरी लावली आणि आपल्या लाडक्या सहकलाकाराला निरोप दिला. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे बॉलिवूडमधील एक देखणं, दिलदार, प्रतिभावान व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्वांच्या मनात आहे.