चाहत्यांनीच धक्काबुक्की केली अन्...; प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडला संतापजनक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 10:27 IST2025-12-18T10:27:20+5:302025-12-18T10:27:57+5:30
Nidhhi Agerwal Mobbed By Fans: प्रसिद्ध अभिनेत्री चाहत्यांच्या गराड्यात फसली अन् तिच्यासोबत धक्काबुक्की झाली. हा संतापजनक व्हिडीओ

चाहत्यांनीच धक्काबुक्की केली अन्...; प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडला संतापजनक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
कलाकरांना चाहत्यांचं प्रेम मिळतं पण कधी हेच फॅन कलाकारांसाठी डोकेदुखी ठरते. सिनेसृष्टीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत असाच एक किस्सा घडला. बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री निधी अग्रवाल एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यावेळी तिच्यासोबत हा अतिशय संतापजनक प्रकार घडला आहे.
झालं असं की, निधी ही सुपरस्टार प्रभासच्या आगामी 'द राजा साब' या चित्रपटातील 'सहना सहना' या गाण्याच्या लॉन्च इव्हेंटमध्ये निधी सहभागी झाली होती. हा कार्यक्रम हैदराबादमध्ये पार पडला, मात्र तिथून परतताना अभिनेत्रीला चाहत्यांच्या अफाट गर्दीने घेरले आणि तिच्यासोबत धक्काबुक्की झाली.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावरून संताप व्यक्त केला जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कार्यक्रम संपल्यानंतर निधी आपल्या कारकडे जाण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, तिथे जमलेल्या गर्दीने तिला सर्व बाजूंनी घेरले. चाहते तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी आणि तिला जवळून पाहण्यासाठी इतके उत्सुक झाले होते की, त्यांनी धक्काबुक्की करायला सुरुवात केली. सुरक्षा रक्षक असूनही गर्दीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते.
Scary visuals of #NidhhiAgerwal being mobbed by fans at the #TheRajaSaab song launch.
— Gulte (@GulteOfficial) December 17, 2025
A little common sense from the crowd would have made the situation better. pic.twitter.com/2kAv43zJ2Q
चाहत्यांनी इतकी गर्दी केली निधी अग्रवाल पडता पडता वाचली. तिला चालणंही कठीण झालं होतं. अतिशय कष्टाने ती आपल्या कारपर्यंत पोहोचली. कारमध्ये बसल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर भीती आणि अस्वस्थता स्पष्टपणे जाणवत होती. गाडीत बसल्यावर तिने सुटकेचा निश्वास टाकला परंतु मनातील नाराजी आणि राग उघडपणे व्यक्त केला.
अनेकांनी सोशल मीडियावर कमेंट्स करत म्हटले की, "चाहत्यांच्या नावाखाली हे लोक अतिरेक करत आहेत, चाहत्यांना आपल्या मर्यादा माहीत असायला हव्यात." काहींनी या मोठ्या इव्हेंटच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निधी अग्रवालने टायगर श्रॉफच्या 'मुन्ना मायकल' या हिंदी चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती, पण नंतर ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री बनली. तिने 'आयस्मार्ट शंकर' सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मारुती यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'द राजा साब' हा चित्रपट ९ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभास आणि निधी अग्रवाल यांच्यासोबत संजय दत्त, मालविका मोहनन आणि रिद्धी कुमार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. दरम्यान निधीसोबत घडलेल्या या घटनेमुळे सोशल मीडियावर चाहते आणि इव्हेंटच्या व्यवस्थापनावर चीड व्यक्त केली जात आहे.