"माझा मुलगा जेव्हा मोठा होईल तेव्हा..."; बाबा झालेला विकी कौशल मुलाप्रती भावुक, काय म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 09:13 IST2025-12-21T09:12:05+5:302025-12-21T09:13:09+5:30
विकी कौशलला एका इव्हेंटमध्ये पुरस्कार मिळाला. त्यावेळी पहिल्यांदाच एका जाहीर व्यासपाठीवर विकीने मुलाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.

"माझा मुलगा जेव्हा मोठा होईल तेव्हा..."; बाबा झालेला विकी कौशल मुलाप्रती भावुक, काय म्हणाला?
बॉलिवूड अभिनेताविकी कौशलसाठी २०२५ हे वर्ष वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही दृष्टीने अत्यंत यशस्वी ठरले आहे. अलीकडेच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात विकी कौशलला 'छावा' (Chhaava) या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारताना विकी भावुक झाला आणि त्याने हे यश आपल्या नुकत्याच जन्मलेल्या मुलाला समर्पित केले.
विकी कौशल मुलाबद्दल काय म्हणाला?
विकी कौशलने पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भाषणात सांगितले की, "या सन्मानासाठी खूप खूप धन्यवाद. हा पुरस्कार माझं कुटुंब आणि माझ्या लाडक्या लेकासाठी आहे, जो माझ्या आयुष्यात एक आशीर्वाद बनून आला आहे. बाबा झाल्यानंतरची ही माझी पहिलीच घराबाहेरची ट्रिप आहे. मला खात्री आहे की माझा मुलगा जेव्हा मोठा होईल आणि हे क्षण बघेल, तेव्हा त्याला आपल्या बाबांचा अभिमान वाटेल."
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांच्या मुलाचे स्वागत केले. सोशल मीडियावर एका संयुक्त पोस्टद्वारे त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर विकीने एका प्रथमच जाहीर इव्हेंटमध्ये आपल्या मुलाबद्दल प्रेम व्यक्त केले. विकी कौशलने नेहमीच आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि पत्नीला दिले आहे, मात्र यावेळी आपल्या चिमुकल्या लेकासाठी व्यक्त केलेल्या भावनांनी चाहत्यांचे मन जिंकले आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या धगधगत्या जीवनावर आधारित आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवलेच, पण विकी कौशलने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचे प्रेक्षक आणि समीक्षकांनी भरभरून कौतुक केले. या ऐतिहासिक भूमिकेसाठी त्याला या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा बहुमान मिळाला आहे.