"ते खूप अस्वस्थ होते...", मनोज कुमार यांची शेवटच्या क्षणी अशी होती तब्येत; लेकाने दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 10:47 IST2025-04-04T10:46:49+5:302025-04-04T10:47:33+5:30

नातवंडांसोबत रमायचे मनोज कुमार, मुलगा म्हणाला...

actor manoj kumar son kunal goswami reveals father s health at last moment as manoj kumar dies at the age of 87 | "ते खूप अस्वस्थ होते...", मनोज कुमार यांची शेवटच्या क्षणी अशी होती तब्येत; लेकाने दिली माहिती

"ते खूप अस्वस्थ होते...", मनोज कुमार यांची शेवटच्या क्षणी अशी होती तब्येत; लेकाने दिली माहिती

अभिनेते मनोज कुमार (Manoj Kumar) यांनी आज जगाचा निरोप घेतला. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. 'भारत का रहने वाला हूं भारत की बात सुनाता हूं' हे गाणं ऐकलं की मनोज कुमार ऊर्फ भारत कुमार यांचा चेहरा आपसूक डोळ्यासमोर येतो. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले मनोज कुमार यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी शशि गोस्वामी आणि मुलगा कुणाल आहेत. 

मनोज कुमार यांच्या लेकाने दिली माहिती

मनोज कुमार यांचा मुलगा कुणाल (Kunal Goswami) बिझनेसमन आहे. एएनआयशी बोलताना तो म्हणाला, "नमस्कार, मी कुणाल गोस्वामी. माझे वडील मनोज कुमार यांचं आज पहाटे ३.३० वाजता कोकिलाबेन रुग्णालयात दुर्दैवी निधन झालं. ते काही दिवसांपासून अस्वस्थ होते. मात्र मोठ्या हिंमतीने ते सगळ्याला त्रासाला सामोरे गेले. देवाच्या कृपेने, शिर्डी साईबाबांच्या दयेने त्यांनी शांततेत शेवटचा श्वास घेतला. उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. ते गेल्या बऱ्याच वर्षांपासून आजारी होते. येत्या दोन महिन्यात ते ८८ वर्षांचे होणार होते. मात्र ८७ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. ते खूप आनंदी होते. सगळ्यांशी बोलायचे. विशेषत: नातवंडांवर, पतवंडांवर त्यांचा जीव होता. थोडे त्रासात होते. वयामुळे अस्वस्थ होते एवढंच."

मनोज कुमार यांचा मुलगा कुणालचा केटरिंग बिझनेस आहे. त्यानेही सुरुवातीला अभिनयात नशीब आजमावलं. मनोज कुमार यांनी लेकाच्या करिअरसाठी बरीच मेहनत घेतली होती. मात्र त्याने हवी तशी झेप घेतली नाही. 

मनोज कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला होता. भारतीय सिनेमाच्या इतिहासात त्यांचं अमूल्य योगदान राहिलं आहे. अभिनयासोबतच त्यांनी लेखक, दिग्दर्शकाचीही भूमिका पार पाडली. 'शहीद','उपकार','पूरब और पश्चिम','क्रांती'सारख्या सिनेमांमधून त्यांनी देशभक्तीची भावना सर्वदूर पोहचवली. म्हणूनच त्यांना भारत कुमार नावाने ओळख मिळाली होती. त्यांचे सिनेमे हे सामाजिक मुद्दे, शेतकऱ्यांचे कष्ट आणि आव्हानं, राष्ट्रीय एकता यावरच असायचे.

Web Title: actor manoj kumar son kunal goswami reveals father s health at last moment as manoj kumar dies at the age of 87

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.