"गोविंदा पंडितांना २ लाखांची देणगी देतो"; पत्नी सुनिता आहुजाचं विधान, आता गोविंदाने मागितली माफी; म्हणाला-
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 08:58 IST2025-11-05T08:53:23+5:302025-11-05T08:58:33+5:30
गोविंदाची पत्नी सुनिता आहुजाने अभिनेत्याच्या पंडितांवर अपमानास्पद टिप्पणी केली. त्यामुळे गोविंदाने पुढे येऊन माफी मागितली. काय घडलं?

"गोविंदा पंडितांना २ लाखांची देणगी देतो"; पत्नी सुनिता आहुजाचं विधान, आता गोविंदाने मागितली माफी; म्हणाला-
बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदाने (Govinda) नुकताच एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये पत्नी सुनिता आहूजाच्या एका विधानावर गोविंदाने माफी मागितली आहे. सुनिताने गोविंदाच्या पंडितांबद्दल एक विधान केलं होतं. याबद्दल आता गोविंदाने विरोध दर्शवला असून त्याचं स्पष्ट मत व्यक्त केलंय. जाणून घ्या
पंडिताबद्दल पत्नीच्या विधानावर गोविंदाचे स्पष्टीकरण
गोविंदाने एक व्हिडीओ शेअर करुन सांगितलंय की, "नमस्कार, मी गोविंदा. मी तुम्हा सर्व लोकांना हे सांगू इच्छितो की, माझ्या कुटुंबाचे पंडित, आदरणीय मुकेश शुक्ला जी, खूपच योग्य, गुणी आणि प्रामाणिक आहेत. आमचं कुटुंब कायम त्यांच्याशी जोडलेलं राहिलं आहे. माझी पत्नी सुनिता आहुजाने तुमच्याबद्दल जे अपशब्द वापरले, त्याबद्दल मी माफी मागतो. मी त्या विधानाशी अजिबात सहमत नाही. कारण मला असं वाटतं की पंडितजी खूपच साधे आणि निष्पक्ष आहेत. पंडित मुकेश जी आणि त्यांचं कुटुंब कठीण काळात माझ्यासोबत राहिले आहेत आणि मी त्यांचा खूप सन्मान करतो."
गोविंदाने पत्नी सुनीता आहुजाच्या वतीने माफी का मागितली? #actor#Actorgovinda#Govinda#Sunitaahuja#Bollywoodpic.twitter.com/4wh5FVgqGK
— bharat jadhav (@bharatjadhav891) November 4, 2025
गोविंदाची पत्नी काय म्हणाली होती?
हा वाद गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने एका पॉडकास्टमध्ये केलेल्या विधानामुळे सुरू झाला होता. सुनिता आहुजाने म्हटलं होतं की, ''गोविंदा ज्योतिष आणि पंडितांवर खूप पैसे खर्च करतो, कधीकधी फक्त पूजेसाठी तो २ लाख रुपयांपर्यंत देणगी देतो. गोविंदाचे मित्र आणि त्याच्या टीममधील काही लोक मूर्ख आहेत आणि त्यांचा सल्ला निरुपयोगी असतो. हे लोक गोविंदाला चुकीचा सल्ला देतात आणि अनेकदा माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात." सुनिता यांनी केलेलं हे विधान पंडित मुकेश शुक्ला यांचा अपमान करणारं असल्याने, ज्यामुळे गोविंदाला जाहीर माफी मागावी लागली.