सैफ अली खानच्या घरात आरोपीचे किती फिंगरप्रिंट्स मिळाले? पोलिसांनी रिक्रिएट केला क्राईम सीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 10:53 IST2025-01-21T10:52:49+5:302025-01-21T10:53:06+5:30
दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी आरोपीला अटक केली. तो बांगलादेशी असून कुस्तीपटू निघाला.

सैफ अली खानच्या घरात आरोपीचे किती फिंगरप्रिंट्स मिळाले? पोलिसांनी रिक्रिएट केला क्राईम सीन
अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) त्याच्याच घरात झालेल्या हल्ल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीच्या घरात कडक सुरक्षाव्यवस्था असतानाही चोर आत घुसलाच कसा असाच प्रश्न सर्वांना पडला होता. दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी आरोपीला अटक केली. तो बांगलादेशी असून कुस्तीपटू निघाला. त्यानेच सैफवर ६ वार केल्याचं कबूल केलं. दरम्यान पोलिसांनी त्याला सैफच्या घरी नेत क्राइम सीन रिक्रिएट केला.
शरीफुल इस्लाम शहजाद असं आरोपीचं नाव आहे. मुंबई पोलिसांना घटनास्थळावरुन शरीफुलचे १९ फिंगर प्रिंट्स मिळाले आहेत ज्याचा तपास सुरु आहे. पोलिसांना हे पुरावे बाथरुममधील खिडकी, एसी डक्ट, पायऱ्या, बाल्कनी अशा काही ठिकाणाहून मिळाले आहेत. सध्या शरीफुलचे फिंगरप्रिंट्स या प्रकरणातील सर्वात महत्वाचा पुरावा आहे. हे फिंगरप्रिंट्स राज्य आणि राष्ट्रीय डेटाबेससोबत तपासण्यात आले पण मॅच झाले नाही. पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, 'चोर बाहेरील देशाचा असू शकतो किंवा बांगलादेशी नागरिक असू शकतो हा विचार आम्ही आधी केला पाहिजे होता. कारण तिथून लोक मोठ्या संख्येने बेकायदेशीर मार्गाने येतात."
काल सोमवारी पोलिसांची टीम आरोपी शरीफुलला लॉकअपमधून बांद्रा पोलिस स्टेशनमध्ये घेऊन आली. त्यानंतर ते सैफच्या घरी गेले आणि सीन रिक्रिएट केला. एक तास टीम आरोपीसोबत तिथेच होती. संपूर्ण तपासानंतर आता पुरावे व्हेरिफिकेशनसाठी पाठवण्यात आले आहेत.
कसा घुसला आरोपी?
आरोपी पायऱ्यांवरुन आधी सातव्या मजल्यावर गेला. तिथून डक्ट एरियातून तो १२ व्या मजल्यावर पोहोचला. सैफच्या घरात बाथरुममधून बाहेर आला. तेव्हा त्याला तैमुर आणि जेहच्या नॅनी पाहिले. त्यांची बाचाबाची झाली. नॅनींनी आरडाओरडा केला. यानंतर सैफ धावत आला. आरोपीने सैफवर अंदाधुंद वार केला. यानंतर आरोपी तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला.