"महाभारत फक्त सिनेमा नाही, एक यज्ञ आहे", आमिर खानचं भाष्य; यावर्षीच सुरु होणार काम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 16:32 IST2025-09-20T16:31:40+5:302025-09-20T16:32:06+5:30
हा प्रोजेक्ट माझ्या डोक्यात २५-३० वर्षांपासून सुरु आहे...-आमिर खान

"महाभारत फक्त सिनेमा नाही, एक यज्ञ आहे", आमिर खानचं भाष्य; यावर्षीच सुरु होणार काम?
बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानचा 'महाभारत' हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. अनेक वर्षांपासून त्याला या महाकाव्यावर सिनेमा करण्याची इच्छा होती. तसंच हा सिनेमा करणं मोठी जबाबदारी असल्याने त्याला यात कोणतीही चूक होऊ द्यायची नाही. म्हणून तो सावधगिरीनेच या सिनेमाची तयारी करत आहे. आता नुकतंच त्याने सिनेमाविषयी अपडेट दिलं आहे.
पत्रकार कोमल नाहटा यांच्या पॉडकास्टमध्ये आमिर खान म्हणाला, "हा प्रोजेक्ट माझ्या डोक्यात २५-३० वर्षांपासून सुरु आहे. याची तयारी मी आधीपासूनच सुरु झाली आहे, पुढील दोन महिन्यात याच्या स्क्रिप्टिंगवर काम सुरु होईल अशी आशा आहे. मी इंटरनल काम सुरु केलं आहे. महाभारत हा फक्त सिनेमा नाही तर यज्ञ आहे. जर सगळं सुरळीत झालं तर यावर्षी सिनेमाचं काम सुरु होईल अशी आशा आहे."
याआधीही आमिरने एका मुलाखतीत सांगितलेलं की यावर्षी 'महाभारत' सिनेमा सुरु होईल. 'लॉर्ड ऑफ रिंग्स' प्रमाणे हा सिनेमा अनेक भागांमध्ये येईल. तसंच आमिर खानला महाभारतातली श्रीकृष्णाची भूमिका जास्त भावते. आता तो स्वत: सिनेमात काम करणार की नाही यावर त्याने भाष्य केलेलं नाही. तसंच सिनेमाची स्टारकास्ट काय असेल यावरही चर्चा होणं बाकी आहे असं तो म्हणाला.
आमिरचा 'सितारे जमीन पर' यावर्षी रिलीज झाला. तसंच तो रजनीकांत यांच्या 'कुली' सिनेमात कॅमिओ करताना दिसला. आता तो 'महाभारत'साठी पूर्ण वेळ देऊ शकतो.