आमिर खानच्या नवीन सिनेमाची घोषणा; 'ही' मराठी अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 12:28 IST2025-12-03T12:21:35+5:302025-12-03T12:28:55+5:30
आमिर खान प्रॉडक्शनच्या आगामी सिनेमाची घोषणा झाली असून मराठमोळी अभिनेत्री या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणार आहे. जाणून घ्या कोण आहे ती

आमिर खानच्या नवीन सिनेमाची घोषणा; 'ही' मराठी अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका
आमिर खानचा नवीन धमाकेदार गुप्तहेर चित्रपट 'हॅपी पटेल'ची घोषणा अखेर करण्यात आली आहे. हा चित्रपटाचं दिग्दर्शन वीर दासने केलं असून त्याचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात वीर दास आणि मोना सिंग लीड रोलमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाचं शीर्षक जितकं मजेदार आहे, तसंच मेकर्सनी रिलीज केलेला अनाउन्समेंट व्हिडिओही सर्वांना हसवणारा आहे. विशेष म्हणजे चित्रपटात मराठी अभिनेत्री प्रमुख भूमिकेत आहे.
ही मराठी अभिनेत्री झळकणार
'हॅपी पटेल' चित्रपटाची खासियत म्हणजे, आमिर खान प्रोडक्शन्स नेहमीच हटके आणि अनोख्या कथा अत्यंत सादर करत आलं आहे. या चित्रपटात मराठी अभिनेत्री मिथिला पालकर खास भूमिकेत झळकणार आहे. मिथिलाला अनेक दिवसांनी मोठ्या बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
आमिर खानने त्याच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत 'लगान', 'तारे जमीन पर', 'दंगल' आणि 'सीक्रेट सुपरस्टार' सारख्या अविस्मरणीय चित्रपटांनंतर, ही फिल्मही वेगळ्या सिनेमाचा अनुभव देण्याचा आणखी एक प्रयत्न आहे. यावेळी आमिर खान प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन वीर दाससोबत काम करत आहेत. वीर दासने जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे. याशिवाय 'गो गोवा गॉन', 'बदमाश कंपनी' आणि 'दिल्ली बेली' सारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 'हॅपी पटेल' हा वीर दासचा 'दिल्ली बेली'नंतर आमिर खान प्रोडक्शन्ससोबतचा दुसरा चित्रपट आहे.
'हॅपी पटेल'ची घोषणा अगदी हटके आणि मजेशीर पद्धतीने करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये आमिर खान, वीर दासला विचारताना दिसतो की, तो आपल्या फिल्ममध्ये अॅक्शन, रोमांस आणि अगदी आयटम नंबर कशा अंदाजात दाखवणार आहे. आमिरला सतत आगामी चित्रपटाची चिंता दिसते की, प्रेक्षक याला कसा प्रतिसाद देतील. तर दुसऱ्या बाजूला थिएटरबाहेर पडलेले लोक चित्रपटाची प्रशंसा करताना दिसतात.
आमिर खान-वीर दासचा हा मजेशीर व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली तयार होत असलेला 'हॅपी पटेल'चा दिग्दर्शक वीर दास असून हा चित्रपट १६ जानेवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.