Laal Singh Chaddha : “जेव्हा विनाश....”, ‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप ठरल्यानंतर लेखक अतुल कुलकर्णींचं बोलकं ट्वीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 13:06 IST2022-09-01T13:03:02+5:302022-09-01T13:06:14+5:30
Laal Singh Chaddha, Atul Kulkarni : आमिरचा सिनेमा फ्लॉप होणं हा अनेकांसाठी धक्का आहे. या पार्श्वभूमीवर ‘लाल सिंग चड्ढा’चे लेखक व मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी एक ट्वीट केलं आहे.

Laal Singh Chaddha : “जेव्हा विनाश....”, ‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप ठरल्यानंतर लेखक अतुल कुलकर्णींचं बोलकं ट्वीट
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा (Aamir Khan ) ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा सिनेमाबॉक्स ऑफिसवर दणकून आपटला. सध्या बॉलिवूडकर या एकाच विषयावर ‘मंथन’ करत आहेत. आमिरने या चित्रपटासाठी चार वर्षे दिली होती. त्याचा सिनेमा इतक्या वाईट पद्धतीने फ्लॉप होईल, याची कुणी कल्पनाही केली नव्हती. ‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप का झाला, यामागची अनेक कारणं सांगितली जात आहे. पण अनेकांच्या मते, चित्रपट फ्लॉप होण्यामागे बॉयकॉट ट्रेंड कारणीभूत आहे. सोशल मीडियावरच्या निगेटीव्ह कमेंट्समुळे लोक या चित्रपटाकडे फिरकलेच नाही, असा निष्कर्ष काढला जात आहे. कारण काहीही असोत, पण आमिरचा सिनेमा फ्लॉप होणं हा अनेकांसाठी धक्का आहे. या पार्श्वभूमीवर ‘लाल सिंग चड्ढा’चे लेखक व मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) यांनी एक बोलकं ट्वीट केलं आहे.
‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी ‘लाल सिंग चड्ढा’ची कथा आणि पटकथा लिहिली आहे. चित्रपटाचे पटकथाकार या नात्याने अतुल कुलकर्णीचं ट्वीट महत्त्वाचं आहे.
When destruction is celebrated as if it were a spectacle, the harsh truths are reduced to debris. #globalphenomenon
— atul kulkarni (@atul_kulkarni) August 28, 2022
‘जेव्हा विनाश मोठ्या कामगिरीप्रमाणे साजरे केले जातात, तेव्हा सत्याची किंमत मातीमोल होते,’अशा आशयाचं ट्वीट अतुल कुलकर्णी यांनी केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी ‘लाल सिंग चड्ढा’चा उल्लेख केलेला नाही. पण त्यांचं हे ट्वीट ‘लाल सिंग चड्ढा’च्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर असल्याचं अनेकांचं मत आहे.
‘लाल सिंग चड्ढा’वर 180 कोटींचा खर्च झाला होता. 20 दिवसांत या चित्रपटाने केवळ 60 कोटींचा बिझनेस केला. 11 ऑगस्टला सिनेमा रिलीज झाला. पण या चित्रपटाकडे प्रेक्षक फिरकलेच नाहीत. हॉलीडे वीकेंडचाही चित्रपटाला फायदा झाला नाही. परिणामी पहिल्या आठवड्यानंतर या चित्रपटाचे अनेक शो कॅन्सल करण्याची वेळ वितरकांवर आली.