भाऊ फैसलला नजरकैद केली होती का? अखेर आरोपांवर आमिर खानने सोडलं मौन, म्हणाला- "बाहेरच्या लोकांशी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 13:53 IST2026-01-08T13:45:57+5:302026-01-08T13:53:40+5:30
आमिर खानने भाऊ फैसल खानने जे आरोप केले त्यावर इतक्या वर्षांनी मौन सोडलं आहे. आमिरने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे

भाऊ फैसलला नजरकैद केली होती का? अखेर आरोपांवर आमिर खानने सोडलं मौन, म्हणाला- "बाहेरच्या लोकांशी..."
बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान (Aamir Khan) आणि त्याचा भाऊ फैसल खान (Faisal Khan) यांच्यातील मतभेद गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. फैसल खानने अलीकडेच दिलेल्या काही मुलाखतींमध्ये आमिर आणि खान कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर आमिर खानने प्रथमच आपले मौन सोडले असून कुटुंबातील वादावर अत्यंत भावनिक भाष्य केले आहे.
काय आहे प्रकरण?
काही काळापूर्वी फैसल खानने असा खळबळजनक दावा केला होता की, आमिर खान आणि त्याच्या कुटुंबाने त्याला वर्षभर घरात नजरकैदेत ठेवले होते. इतकेच नाही तर त्याला 'स्किझोफ्रेनिया' असल्याचे सांगून चुकीची औषधे दिली गेली, असाही आरोप त्याने केला होता. फैसलने अलीकडेच आपल्या कुटुंबाशी असलेले सर्व संबंध तोडल्याचे जाहीर केले आहे.
या वादावर बॉलिवूड हंगामाशी बोलताना आमिर खान म्हणाला की, "आयुष्यात अशा काही परिस्थिती येतात जेव्हा तुम्ही हतबल असता. तुम्ही जगाशी लढू शकता, बाहेरच्या लोकांशी दोन हात करू शकता, पण आपल्याच कुटुंबातील सदस्यांशी लढणे अशक्य असते. कुटुंबातील वाद हे अत्यंत वेदनादायी असतात कारण त्यात भावना गुंतलेल्या असतात."
आमिरने पुढे स्पष्ट केले की, कुटुंबासाठी हा काळ अत्यंत कठीण आणि त्रासदायक आहे. मात्र, आमिरने फैसलचं नाव घेत त्याच्यावर आरोप करणे टाळले. "कुटुंबात कितीही मतभेद असले तरी शेवटी ते आपलेच असतात," असे म्हणत त्याने या प्रकरणावर मोजकी प्रतिक्रिया दिली.
केवळ आमिरच नाही, तर खान कुटुंबातील इतर सदस्यांनीही, ज्यामध्ये आमिरच्या बहिणी झीनत, निखत आणि एक्स पत्नी किरण राव यांचा समावेश आहे. या सर्वांनी मिळून एक पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रात त्यांनी फैसलचे आरोप फेटाळून लावले आहेत. "फैसलने आई आणि भाऊ आमिर यांच्याबद्दल जी चुकीची वक्तव्य केली आहेत, त्यामुळे दु:खी आहोत. फैसलच्या बाबतीत घेतलेले सर्व निर्णय हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि त्याच्या आरोग्याचा विचार करूनच घेतले होते," असं कुटुंबाने स्पष्ट केले आहे.
आमिर आणि फैसल यांनी 'मेला' या चित्रपटात एकत्र काम केले होते. या दोन भावांमधील दुरावा पाहून चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. आमिरने या वादात ज्या प्रकारे संयम राखला आहे, त्याचे अनेकजण कौतुक करत आहेत. फैसल काही महिन्यांपूर्वी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत एका ठिकाणी दिसला होता. फैसल सध्या कोणत्याही सिनेमात काम करत नाहीये.