'थ्री इडियट्स'च्या सीक्वलबद्दल मोठं अपडेट, आमिरच्या चित्रपटात असणार 'हा' खरा ट्विस्ट; उत्सुकता शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 09:39 IST2026-05-14T09:38:55+5:302026-05-14T09:39:33+5:30
'थ्री इडियट्स'च्या सीक्वलबाबत आणि त्यातील 'ट्विस्ट'बद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

'थ्री इडियट्स'च्या सीक्वलबद्दल मोठं अपडेट, आमिरच्या चित्रपटात असणार 'हा' खरा ट्विस्ट; उत्सुकता शिगेला
बॉलिवूडमधील 'कल्ट क्लासिक' चित्रपटांच्या यादीत अग्रस्थानी असलेला 'थ्री इडियट्स' हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दलची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. आता या चित्रपटाच्या कथेबाबत आणि त्यातील 'ट्विस्ट'बद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार, दिग्दर्शक राजकुमार हिरानी या सिक्वेलमध्ये १० वर्षांचा 'टाइम जंप' दाखवण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, हा टाइम जंप २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या मूळ चित्रपटाच्या घटनांच्या आधीचा (Prequel) किंवा नंतरचा (Sequel) असू शकतो. यामुळे पात्रांच्या वयात आणि परिस्थितीत मोठा बदल पाहायला मिळेल, जे प्रेक्षकांसाठी नक्कीच चकित करणारं ठरेल.
विकी कौशलची एन्ट्री अन् 'फोर इडियट्स'?
या चित्रपटात आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी ही त्रिमूर्ती पुन्हा एकदा एकत्र दिसणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगली आहे. काही रिपोर्ट्सनुसार, या भागाचे नाव 'फोर इडियट्स' असू शकते आणि यामध्ये अभिनेता विकी कौशल चौथ्या 'इडियट'च्या भूमिकेत झळकू शकतो. अर्थात, निर्मात्यांकडून अद्याप यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही.
प्री-प्रोडक्शन कामाला सुरुवात
सुपरस्टार आमिर खान सध्या या प्रोजेक्टमध्ये पूर्णपणे व्यस्त असल्याचंय समजतंय. राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा हा चित्रपट सध्या प्री-प्रोडक्श टप्प्यात आहे. आमिर खानने आपल्या आगामी ॲक्शन चित्रपटाच्या तयारीसोबतच 'थ्री इडियट्स'च्या सिक्वेलवर काम सुरू केल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.