आधी रणवीर सिंगला 'शक्तिमान'मधून दाखवला बाहेरचा रस्ता; आता 'धुरंधर' पाहून मुकेश खन्ना म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 14:54 IST2025-12-21T14:46:42+5:302025-12-21T14:54:14+5:30
रणवीर सिंगच्या हातून शक्तिमान काढून घेतलेल्या अभिनेते मुकेश खन्ना यांनी धुरंधर पाहिला. हा सिनेमा पाहून मुकेश खन्ना काय म्हणाले?

आधी रणवीर सिंगला 'शक्तिमान'मधून दाखवला बाहेरचा रस्ता; आता 'धुरंधर' पाहून मुकेश खन्ना म्हणतात...
एकेकाळी रणवीर सिंगला 'शक्तिमान' या भूमिकेसाठी उघडपणे विरोध करणारे ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना. मुकेश खन्ना यांनी रणवीर सिंगच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर' (Dhurandhar) या चित्रपटाबद्दल त्यांचं मत परखड मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काय म्हणाले मुकेश खन्ना?
मुकेश खन्ना यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी 'धुरंधर' चित्रपटाचा रिव्ह्यू दिला. ते म्हणाले, "मी 'धुरंधर'चा नायक रणवीर सिंगचे कौतुक करू इच्छितो. तुम्ही म्हणाल की मी त्याला शक्तीमानसाठी नकार दिला होता. हो, मी शक्तीमानसाठी नकार दिला असेल, पण तो एक चांगला अभिनेता आहे हे मी नेहमीच मान्य केले आहे."
चित्रपटातील रणवीरच्या अभिनयाबद्दल बोलताना खन्ना म्हणाले, "या चित्रपटात रणवीरची ऊर्जा आणि जोश वाखाणण्याजोगा आहे. त्याच्या डोळ्यांतील तीव्रता आणि संपूर्ण भूमिकेतील सहजता प्रेक्षकांना खिळवून ठेवते. आदित्य धर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन अतिशय उत्तमरित्या केले असून प्रत्येक विभागाने आपले सर्वोत्तम दिले आहे."
शक्तिमान वादाची पार्श्वभूमी
काही वर्षांपूर्वी जेव्हा 'शक्तिमान' चित्रपटाची घोषणा झाली होती, तेव्हा रणवीर सिंगचे नाव या भूमिकेसाठी चर्चेत होते. मात्र, मुकेश खन्ना यांनी रणवीरच्या 'ऑफ-स्क्रीन' प्रतिमेवर बोट ठेवत त्याला या भूमिकेसाठी 'अनफिट' ठरवले होते. रणवीरने त्यांना पटवून देण्यासाठी तीन तासांची भेटही घेतली होती, तरीही खन्ना आपल्या निर्णयावर ठाम होते.
रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त आणि आर. माधवन यांची मुख्य भूमिका असलेल्या 'धुरंधर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींहून अधिक कमाई करत जगभरात ८०० कोटींचा टप्पा गाठला आहे. या चित्रपटातील अक्षय खन्नाच्या खलनायकी भूमिकेचेही मुकेश खन्ना यांनी विशेष कौतुक केले असून, त्याची तुलना 'शोले'मधील गब्बर सिंगशी केली आहे.