-सारिका पूरकर-गुजराथीघर सजावटीसाठी जशी खूप मेहनत घेतो, तेवढीच मेहनत घर टाप-टीप ठेवण्यासाठीही लागते. एकवेळ घरात सजावट कमी केली असेल तरी चालेल पण घर नीटनीटकं आवरलेलं असेल, घर स्वच्छ असेल तर घरात एक वेगळीच प्रसन्नता भरून राहते. मात्र घराच्या स्वच्छतेकडे दिवाळी, पाहुणे आणि कार्यक्रम असले प्रसंग सोडले तर बहुतांश ठिकाणी एवढं लक्ष दिलं जात नाही. हल्ली प्रत्येक घरात मुलं-मुली अभ्यास, शाळा, कॉलेज, क्लास, अॅक्टिव्हिटीजच्या मागे तर नवरा बायको नोकरी व्यवसायाच्यानिम्मित्त घड्याळाच्या काट्यांवर धावताना दिसताहेत. त्यामुळे स्वत:चं आवरणं आणि खाण्याची सोय करणं यालाच महत्त्व दिलं जातं. घराची साफसफाई आज नाही जमली तर उद्या नाहीतर परवा नाहीतर मग सुट्टीच्या दिवशी अशी पुढे पुढे ढकलली जाते. पण आठवड्यातून मिळणाऱ्या एकाच सुटीच्या दिवशी करायचं तरी काय काय आणि किती? असं म्हणून त्यादिवशीही घराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्षच होतं. यामुळे घरात पसारा साचत जातो आणि घर छोटं असो की मोठं ते पसाऱ्यानं ओंगळवाणं दिसायचं ते दिसतंच.पण खरंतर घराची स्वच्छता वाटते तितकी अवघड आणि वेळखाऊपणाची तर मुळीच नाही. रोजच्या दिवसात इतर कामांसारखंच घर स्वच्छतेच्या कामाचंही थोडंसं प्लॅनिंग करून जे ठरवलं ते फॉलो केलं तरी आपल्या घाईच्या वेळेतही घर टाप टिप दिसतं. त्यामुळे घर प्रसन्न राहतं आणि घरात राहणारी माणसंही.
स्वच्छतेचं प्लॅनिंग करायचं कसं?१) रोज करावयाची स्वच्छता :- यात जेवणाची भांडी रोज स्वच्छ करा. तसेच प्रत्येक वापरानंतर सिंक (बेसिनही)स्वच्छ करा. डायनिंग टेबल, किचन ओटा, किचन फ्लोअर हे देखील दररोज स्वच्छ करा. बेडरुममध्ये बेडवरील चादरी, पिलो कव्हर्स दररोज व्यवस्थित लावा. बाथरुममध्ये टाईल्स स्पंजनं पुसायला हव्यात. तसेच ओले टॉवेल्स दररोज वाळत घालायला विसरु नका. शक्य झाल्यास रोजचा कचरा घंटागाडीत टाकून द्या.२) दर आठवड्याला करावयाची स्वच्छता:- घरातील सदस्यांचे आठवडाभरात वापरलेले कपडे धुवून काढा. तसेच कार्पेटमधील धुळ झटकून टाका. फर्निचर, शेल्फ, कपाटे, लॅम्प शेड्स यांच्यावरील धुळ झटकून शक्य झाल्यास पुसून घ्या. किचनमधील डस्टबीन स्वच्छ धुवून घ्या. पडदे धुवून टाका, खिडक्या स्वच्छ करा. टेलिफोन, कॉम्प्युटर, लॅपटॉपची स्क्रीन पुसून घ्या. रेफ्रिजरेटर बाहेरुन पुसून घ्या.बेडरुममधील चादरी बदला. सर्वांची कपाटं आवरुन घ्या.टॉयलेट बाथरूम स्वच्छ करुन घ्या.३) दर महिन्याला करावयाची स्वच्छता :-भिंतीवर काही डाग पडले असतील तर ते स्वच्छ पुसून काढणं, पडदे, फर्निचरवरची धूळ झटकून घेणं, फ्रीजमध्ये साठवलेल्या मसाले, सॉसेस, पावडर यांची एक्सपायरी डेट तपासून घेऊन मुदतबाह्य झालेल्या वस्तूंची विल्हेवाट लावणं.
४) सिझनल (ऋतुनिहाय) स्वच्छता :- इनडोअर प्लाण्ट्स असतील तर ती बाहेर नेऊन स्वच्छ करावीत. बाल्कनी, पोर्च, अंगण असेल तर ते स्वच्छ करणं. टेबल, खुर्च्या बाहेर नेऊन शक्य झाल्यास धुवून काढणं अथवा पुसून घेणं. ही अशी स्वच्छता आपल्याकडे सहसा आपण उन्हाळ्यात करतो. तसेच दिवाळीच्या आधी करतो. ५) दर वर्षी करावयाची स्वच्छता:- लाकडी फर्निचरवरची धूळ स्वच्छ झटकून घेणं, फर्निचर जर अगदीचं जुनं दिसत असेल तर ते पॉलिश करुन घेणं, बेडवरील मॅट्रेसेसमधील धुळ झटकून घेणं (शक्य झाल्यास ऊन दाखवणं). वॉशिंग मशीन्सचे पाईप तपासून घेणं,दोन वर्षापेक्षा त्याला जास्त कालावधी झाला असेल तर ते वेळेत बदलून घेणं, औषधांचा बॉक्स तपासणं, मुदतबाह्य औषधं काढून टाकणं. घरात झुरळांसारखी काही उप्रदवी कीटकं असतील तर पेस्ट कंट्रोल करुन घेणं. घराच्या स्वच्छतेचे हे असे विविध पैलू आहेत. कधी काय करायचं याचं नीट नियोजन केलं आणि ठरवलेलं काम तेव्हाच्या तेव्हाच केलं तर घर स्वच्छता हे काम म्हणजे खूप अवघड आणि किचकिचाटाचं राहात नाही.