जगातील 80 टक्के लोकांसाठी ‘आकाशगंगा’ अदृश्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 16:08 IST
जागतिक लोकसंख्या सुमारे 83 टक्के लोकांना कृत्रिम प्रकाशाच्या प्रदूषणामुळे रात्रीचे नैसर्गिक आकाश दिसतच नाही.
जगातील 80 टक्के लोकांसाठी ‘आकाशगंगा’ अदृश्य
अमेरिका आणि इटलीमधील संशोधकांनी हाय-रेझ्युलेशन सॅटेलाईटद्वारे जगाचा ‘प्रकाश नकाशा’ तयार केला. या नकाशानुसार जागतिक लोकसंख्या सुमारे 83 टक्के लोकांना कृत्रिम प्रकाशाच्या प्रदूषणामुळे रात्रीचे नैसर्गिक आकाश दिसतच नाही. त्वरीत काही उपाययोजना हाती घेतल्या नाही तर ही परिस्थिती अधिक गंभीर होण्याचा त्यांनी इशारा दिला.शाळेत असताना विज्ञानात शिकलो होतो की, रात्रीच्या काळ्याभोर आकाशात जी ‘दुधाची नदी वाहताना’ दिसते ती म्हणजे आपली आकाशगंगा. इंग्रजीमध्ये यालाच ‘मिल्कीवे’ म्हणतात.आकाशगंगेच्या सौंदर्याने भुरळून शतकानुशतके कित्येक कथा, चित्र, गीतं, कविता रचल्या गेल्या. लहानपणी गावात बाहेर अंगणात किंवा गच्चीवर झोपताना चांदण्यांच्या मंद प्रकाशात सारं आभाळ उजळून गेल्याचे आठवते का?पण आता निसर्गाचे तेच सौंदर्य पाहणे जगातील एक तृतांश लोकांना दुरापस्त झाले आहे. थॉमस एडिसनेने शोध लावलेल्या प्रकाशदिव्यामुळे अंधारातून जग बाहेर आले मात्र आता हेच कृत्रिम दिवे आपल्या आकाशगंगेला झकोळून टाकताहेत.मागच्या पाच दशकांमध्ये उ. अमेरिका आणि युरोपमध्ये प्रकाश प्रदूषणात दरवर्षी सहा टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती संशोधकाच्या टीमने दिली. पंधरा वर्षांपूर्वीदेखील याच टीमने अशा प्रकारचा प्रकाश नकाशा तयार केला होता.सर्वाधिक प्रकाश प्रदूषण सिंगापूरमध्ये नोंदविण्यात आले तर त्यानंतर कुवैत, कतार यांचा क्रमांक येतो. आफ्रिका खंडातील चाड, मादागास्कार हे देश यादीमध्ये सर्वात शेवटी आहे. विशेष म्हणजे अमेरिका आणि युरोपमधील 99 टक्के लोकांना प्रकाश प्रदूषणामुळे आकाशगंगा दिसत नाही.प्रकाश प्रदूषण ही गंभीर समस्या असून याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत संशोधक व्यक्त करत आहेत. रात्रीच्यावेळी तीव्र स्वरुपाचा कृत्रिम प्रकाश पक्ष्यांच्या स्थलांतरचक्राला बिघडवू शकतो, निशाचर प्राण्यांचा दिनक्रम बदलू शकतो तसेच पाण्याखालील जीवसृष्टीवरदेखील याचे अनिष्ट परिणाम दिसू शकतात. मानवाच्या झोपेवरदेखील परिणाम होऊन अनेक आरोग्यविषय समस्या उद्भवण्या धोका आहे. यामुळे कॅन्सरचादेखील धोका आहे. Credt : Light Pollution Science and Technology Institute‘प्रकाश नकाशा’चे सहनिर्माते आणि ‘लाईट पॉल्यूशन सायन्स अँड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट’चे संशोधक फॅबिओ फॅलची यांनी सांगितले की, केवळ दिवे बंद करून प्रकाश प्रदूषण टाळता येणार नाही. त्यामुळे केवळ तीव्रता कमी होईल पण जी हानी आधीच झाली आहे ती कशी भरून काढणार?