शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

कुठे आहे आज महाराष्ट्र शिवरायांचा?

By admin | Updated: February 19, 2015 00:03 IST

एके काळी १ मे, १५ आॅगस्ट, २६ जानेवारी या दिवशी जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, हे गीत कानावर पडताच अभिमानानं छाती भरून यायची.

एके काळी १ मे, १५ आॅगस्ट, २६ जानेवारी या दिवशी जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, हे गीत कानावर पडताच अभिमानानं छाती भरून यायची. तेव्हाची परिस्थितीही तशीच होती. या सार्थ अभिमानाला छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य व सुराज्य याची समर्थ पार्श्वभूमी होती. खऱ्या अर्थाने शिवराय जाणते व रयतेचे राजे होते. ठीक अशाच प्रकारची राजसत्ता विसाव्या शतकात राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात चालविली. किंबहुना समाज सुधारणेच्या बाबतीत ते शिवरायांच्या काकणभर पुढे असल्याचीही इतिहासात नोंद आहे.त्यानंतरच्या काळातही महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची कारकीर्द सार्थ गाजून गेली. त्यावेळचे समस्त राजकारण राष्ट्रहिताचे व समाजाभिमुख होते. समाजसुधारणा, शिक्षण, सिंचन, कृषी, उद्योगधंद्याला चालना देणारी धोरणे हा त्यांच्या राजकारणाचा, सरकारचा गाभा राहिला. फुकाचा अभिनिवेश, दांभिकता, खोटी प्रतिष्ठा याला थारा नव्हता. त्यानंतरच्या काळातही वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण आणि अलीकडील विलासराव देशमुख अशा काही मुख्यमंत्री व त्यातील बऱ्याच सहकारी मंत्र्यांची कामगिरी उत्तम राहिली. वसंतराव नाईकांना तर कृषी क्षेत्रात हरितक्रांंतीचे जनक असा सन्मानही मिळाला. कृषी-सिंचनाचे अनेक मध्यम व डोळ्यात भरण्याजोगे मोठे प्रकल्प मार्गी लागले. कृषी व शहरी तसेच ग्रामीण भागाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चांगलाच सोडविला गेला. मराठवाड्यातील काही प्रकल्प तर मराठवाड्यासह आंध्र, (आताचा तेलंगणा) कर्नाटकासाठी वरदान ठरले. थर्मल पॉवरला गती मिळून विजेची स्थिती चांगली झाली. समाजमनही स्वस्थ राहिले. एकोपा व सहकार्याची भूमिका वाढीस लागून सहकारी बँका, सोसायट्या, पतपेढ्या, शिक्षणसंस्था यात वृद्धी व गुणवत्ता राखली गेली. त्यांच्या निर्लेप, नि:स्वार्थी कार्यप्रवण स्वच्छ प्रतिमेकडे राज्य आणि केंद्राची मोठी मानाची पदे आपसूक चालत यायची. स्वाभिमान, समाजसेवा यांच्याशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही, म्हणून आजही ते चांगल्या दृष्टीने सर्वांच्या स्मरणात, वंद्य आहेत. सर्व जातीधर्मांना सामावून घेत सर्व बाबींचे समाजाभिसरण झाले, जातीय-धार्मिक तेढ, दंगे पाहायला मिळाले नाहीत. फारसे औद्योगिकरण झाले नसले तरी गरजेपुरती आर्थिक प्रगती साधली गेली.अलीकडच्या काळात मात्र या स्वस्थ व विकासोन्मुख राजकारणाचा प्रकर्षाने अभाव जाणवतो. माणुसकीची खांडोळी करण्यासाठी महापुरुषांच्या नावाचा जयघोष केला जातो. स्वार्थी राजकारणापायी सर्व युगप्रवर्तकांना आपसात एकमेकांच्या विरोधात उभं केलं जातं. हिंदवी स्वराज्याचा अर्थ एका विशिष्ट समूहाचे राज्य असा होऊन बसल्याची अनुभूती होत आहे. लोकप्रतिनिधींच्या गुन्हेगारीवर कायदा आला असला तरी त्याचा परिणाम दिसत नाही. सरकारी कामकाजातील अरेरावी, गैरवर्तन नित्याचे आहे. राजदंडासारखे पवित्र प्रतीक जाग्यावर राहू दिले जात नाही. शिवरायांच्या महाराष्ट्रात स्त्रियांची नग्न धिंड (बोरगाव-लातूर, सिरसगाव-औरंगाबाद), दलितांचे नित्याचे अमानवीय, अमानुषी भीषण सामूहिक हत्त्याकांड, बलात्कार, बहिष्कार, जातीय दंगे व त्यातील जीवित, वित्त हानी इत्यादी मानवतेला काळिमा फासणाऱ्या गोष्टी घडत आहेत. लोकशाही, कायद्याच्या आणि औद्योगिकीकरण, जागतिकीकरणाच्या अत्याधुनिक, पुरोगामी युगात आपण कितीतरी परिष्कृत, सुसंस्कृत व विकसित व्हायला हवे होते, पण तसे दिसत नाही. शिक्षणक्षेत्राची परवड, दुरवस्था, बेकारी, महागाई, अवर्षण, अतिवर्षण, नापिकी, शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या, सिंचन व कृषीधोरणाचे तीन तेरा, आरक्षण, अनुशेष, एक गांव एक पाणवठा, एक मसणवटा, गायरान, हाडोळे आदि प्रश्नही जीवघेणे करून ठेवले गेले आहेत. यातील मोजके प्रश्न नैसर्गिक असून सर्वाधिक प्रश्न मानवनिर्मित, शासननिर्मित आहेत. फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला बिहारच्या ‘जंगलरा’ची उपमा दिली जात आहे. ही या राज्याची शोकांतिका मानावी लागेल. शिवरायालाही उणेपण आणून देणारी ही बाब आहे. नुसते देदीप्यमान, रंगारंग मुंबईच्या भौतिक विकासाकडे व माणसांच्या रोजच्या महापुराकडे बघून आता भागायचे नाही. कधी काळी ‘जीवाची मंबई’ करणाऱ्या गोरगरिबांची, सर्व जाती-धर्म, पंथाची मुंबई, चाकरमान्यांची मुंबई, समस्त महाराष्ट्राची व देशाची किंबहुना समस्त जगातील पर्यटकांची, उद्योजकांची आवडती मुंबई, अशा या बहुआयामी मुंबईलाही आता ग्रहण लागले आहे. बाहेरील दहशतवादासोबतच तिथे आता मराठी, हिंदी, गुजराती, भय्ये, बिहारी, मद्रासी अशी शकलं पाडून छुपा, अघोषित दहशतवाद निर्माण केला गेला आहे. झोपडपट्ट्यांचे बकालपण, त्यावरील बिल्डरांचे, गुंडांचे अतिक्रमण, आक्रमण हेही धगधगते प्रश्न आहेत. मुंबईशिवाय महाराष्ट्रातील कोणत्याच शहराचा मध्यमही औद्योगिक विकास साधला गेलेला नाही. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचीही (घरकुल) हीच रड आहे. शीर तळहातावर घेऊन रोजच समोरासमोरच्या भीषण रक्तपाती लढाईची सिद्धता ठेवत शिवरायांच्या राजवटीत अवाढव्य, आकर्षक किल्ल्यांची निर्मिती झाली, आपण आवश्यक अशी गृहनिर्माण योजनाही पुरती राबवू शकलो नाही. प्रबळ इच्छाशक्ती बाळगून व्यापक धोरणाच्या माध्यमातून खंबीर पावले उचलली गेली तरच या पुरोगामी महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त होईल. - वामनराव जगताप, निवृत्त प्राचार्य