कामचुकार अधिकाऱ्यांना घरी पाठवण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला इशारा जेवढा स्वागतार्ह तेवढाच तो प्रशासनाधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष सरकारातील अनेकांना अंतर्मुख व्हायला लावणारा आहे. राज्याचे प्रशासन आपले ऐकून घेत नाही ही तक्रार फडणवीस यांनी या आधीही किमान दोन वेळा जाहीरपणे लोकांसमोर केली होती. आता त्यांनी या आडमुठ्या कामचुकारांना धारेवर धरण्याची तयारी केल्याचेच त्यांच्या या इशाऱ्याने राज्याला दाखविले आहे. फडणवीसांना मोदींचा वरदहस्त लाभला आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीश्वरांची काळजी नाही. त्यांच्या प्रत्येक कारवाईला दिल्लीची साथ मिळेल अशीच आताची चिन्हे आहेत. मात्र प्रशासनाचे ढिसाळपण आणि हलगर्जीपण ही त्यांची वा राज्याची खरी चिंता नाही. लोकांच्या काळजीचे प्रमुख कारण फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांचे सुस्तावलेपण, त्यातल्या काहींचे उंडारलेपण, काहींचे आडमुठेपण तर काहींची बंडखोरी वा बेगुमानपण हे आहे. त्यांनी मंत्रिमंडळातून दूर केलेले एकनाथ खडसे अजून स्वस्थ नाहीत आणि ते तसे होणारही नाहीत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर बहुजन समाजाचा माणूस (म्हणजे ते स्वत:) नाही, हे त्यांचे शल्य त्यांना शांत होऊ देत नाही आणि फडणवीस व मोदी हे त्यांच्या जागांवर जोवर स्थिर आहेत तोवर ते अशांतही राहणारच आहेत. पंकजा मुंडे-पालवे यांचा मुख्यमंत्रिपदावर नुसता डोळाच नव्हता तर त्या पदासाठी त्या एकट्याच लायक असल्याची आणि तो त्यांचा वंशाधिकार असल्याची त्यांना खात्रीच होती. त्यांची निराशा त्यांना स्वस्थ बसू देत नाही आणि जमेल त्या मार्गाने मुख्यमंत्र्यांवर चिखलफेक करण्याची संधी त्या सोडत नाहीत. त्यांच्याकडची महत्त्वाची खाती फडणवीसांनी काढून घेतल्यानंतरही त्यांचा लढाऊ आवेग कमी झालेला नाही. मध्यंतरी त्या भगवान गडावर चालून गेल्या, तेव्हा मुख्यमंत्र्यांना स्थानिक प्रशासनाची मदत घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा लागला. विनोद तावड्यांचे विनोदीपण थांबत नाही आणि शिक्षणासारख्या गंभीर व्यवहाराचा त्यांनी चालविलेला बाळखेळ थेट स्मृती इराणींच्या वळणावर त्यांनी नेऊन ठेवला आहे. फुंडकर व दानवे यांची खडसे यांच्यासोबत झालेली, बहुजन व मराठा मोर्च्यांच्या पार्श्वभूमीवरील बैठकही मध्यंतरी गाजली. महाजनांच्या घोषणाबाजीनेही सरकारसह प्रशासनाचे अनेकवार हंसे केले तर जुने व जाणते म्हणून ओळखले जाणारे गिरीश बापट त्यांच्या अखत्यारीतील अफाट खात्यावर आपला पुरेसा जम अजून बसवू शकले नाहीत. कर्नाटक सरकारने महाराष्ट्रात येऊन हमी दराने कांदा खरेदी करावी या एवढे त्यांच्या खात्याचे व महाराष्ट्र सरकारचेही अपयश दुसरे नाही. शिवसेना आणि इतर छोट्या मित्र पक्षांच्या वाट्याला गेलेली खाती इतकी हलकीफुलकी की त्यांनी काही केले वा न केले तरी त्याची राज्याला चिंता नाही. त्यांच्यापैकी अनेकांकडे कोणती खाती आहेत आणि ती नेमके काय करीत आहेत याची फारशी चौकशीही लोक करीत नाहीत. त्या बिचाऱ्यांच्या दुर्दैवाविषयी एकट्या उद्धव ठाकऱ्यांखेरीज दुसरे कोणी बोलतानाही महाराष्ट्रात दिसत नाही. आणि हो, फडणवीसांच्या मंत्रिमंडळात दुपारचे दोन वाजेपर्यंत निवांत झोपून राहणारे एक मंत्री आहेत आणि त्यांच्याकडे आदिवासी कल्याणाची, अंत्योदयासारखी महत्त्वाची जबाबदारी आहे. पण ते व त्यांचे नाव फारसे कुणाच्या ध्यानीमनी नसल्याने त्यांचे व त्यांच्या खात्याचेही ‘बरे’ चालले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीची एक विशेष बाजू ही की त्यांच्यावर विरोधी पक्षही फारशी बोचरी टीका करताना कधी दिसत नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे अधूनमधून त्यांना चिमटे काढतात पण त्यांच्या निकटची माणसे वा मंत्रीही फडणवीसांशी प्रत्यक्ष दावा मांडताना कधी दिसले नाहीत. एक गोष्ट सगळ््याच सामुहिक व्यवहारात खरी असते. कोणत्याही संस्थेतील सगळीच माणसे कार्यक्षम नसतात. त्यातली काही धडाडीने काम करतात, काही आस्तेकदम चालतात तर बाकीचे या काम करणाऱ्यांच्या भरवशावर खपून जातात. मात्र फडणवीसांनी या खपून जाणाऱ्या माणसांची फारशी तमा बाळगण्याचे कारण नाही. देशातील इतर अनेक राज्यांच्या सरकारांची स्थिती याहून वेगळी नाही. प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारातली माणसेही बरीचशी अशी आहेत. दिल्ली आणि मुंबईच नव्हे तर थेट वॉशिंग्टन आणि लंडनच्या सरकारांचाही अनुभव असाच आहे. त्यातले काही धडाडीने पुढे जातात बाकीचे त्यांनी चुका न केल्याने तरतात तर काहींच्या बाजूने त्यांचे नशीबच उभे असते. त्यामुळे फडणवीसांनी फारसे निराश होण्याचे कारण नाही. त्यांच्यावर टीका करता यावी असे आजवर ते वागले नाहीत वा तसे बोललेही नाहीत. त्यांच्या धोरणांवर होणारी टीका ते राजकारणात असल्याने होईल पण त्या टीकेचा कोणताही डाग त्यांच्या व्यक्तिमत्वापर्यंत पोहचत नाही. एक स्वच्छ चारित्र्याचा, अभ्यासू व कमालीची कार्यक्षमता असणारा तरुण नेता त्यांच्या रुपाने महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभला आहे. त्यांची ही तडफच त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना अस्वस्थ करणारी आहे. माणसांना आपल्या अपयशाचे दु:ख जेवढे नसते तेवढे आपल्यासोबतच्या माणसांचे यश दु:ख देत असते, हा सार्वजनिक जीवनातल्या साऱ्यांचाच अनुभव आहे ही फडणवीसांसाठी समाधानाची बाब आहे.
मंत्रिमंडळातल्या कामचुकारांचे काय ?
By admin | Updated: November 4, 2016 04:38 IST