बर्लिनची भिंत कोसळलेल्या जगात पुन्हा नवी भिंत बांधण्याची भाषा केली जात होती. ‘ओबामा केअर’च्या निमित्ताने रंजल्या-गांजल्यांना आरोग्यसेवा पुरवण्याचा प्रयत्न जिथे झाला, तिथे जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची भाषा केली जात होती. पर्यावरणीय संकटाच्या विरोधात जागतिक लढा जिथे उभा राहिला, तिथेच ‘पॅरिस करारा’तून बाहेर पडण्याची घोषणा होत होती. बारा वर्षांपूर्वी जिथे अमेरिकेचे अध्यक्ष आपल्या पहिल्या भाषणात तृतीयपंथीयांच्या हक्कांचा सन्मानपूर्वक उल्लेख करत होते, तिथेच ‘अमेरिकेत आता तृतीयपंथीयांना जागा नाही’, असे सुनावले जात होते. ही नवी अमेरिका आहे. अमेरिकेचे ४७वे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शपथ घेतल्यानंतर बोलत होते आणि समोर बसलेल्या बराक ओबामांसह अनेकजण हताशपणे हे सारे सहन करत होते! ट्रम्प २०१६ मध्ये आले आणि जगाला धक्का बसला. मात्र, त्यानंतरच्या निवडणुकीत ज्यो बायडेन यांना निवडून देत, अमेरिकेने आपल्या चुकीचे परिमार्जन केले. पराभवानंतर ज्या ट्रम्प यांनी हिंसाचार घडवला, पराभव अमान्य करत नंगानाच घातला, अशा आरोपीला अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची परवानगीही मिळणार नाही, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र रिपब्लिकन पक्षाने त्यांनाच उमेदवारी दिली. एवढेच नाही, अमेरिकेने त्यांना अध्यक्षही केले.
‘अमेरिका फर्स्ट’ असे म्हणत राष्ट्रवादाचा जो उन्माद ट्रम्प यांनी तयार केला, त्याला यश आले. ‘आजवरच्या अध्यक्षांनी केलेल्या चुका आता मी निस्तरणार आहे’, असे म्हणत पहिल्याच भाषणात जो पाढा त्यांनी वाचला, त्यात किती थापा होत्या, हे अमेरिकी माध्यमांनी सांगितले असले, तरी ‘मास हिस्टेरिया’कडे विवेक, विचार नसतो. असतो तो विखार. या विखाराच्या पायावर ट्रम्प नवी अमेरिका उभी करू पाहत आहेत. ज्या स्थलांतरितांनी अमेरिका नावाचा देश घडवला, त्यांनाच ते शत्रू ठरवत आहेत. जागतिकीकरणाचे लाभ घ्यायचे, अन्य देशातील बाजारपेठा बळकावायच्या, मात्र त्या देशांच्या मनुष्यबळाला विरोध करायचा, ही संकुचितता परतली आहे. ‘आम्ही फक्त अमेरिकेचा विचार करणार आणि या देशाला ‘ग्रेट’ बनवणार’, असे म्हणत ट्रम्प यांनी भरपूर टाळ्या घेतल्या. असे करताना, आपण जागतिकीकरणानंतरच्या जगात राहतो आहोत, याचा विसर त्यांना पडला असावा. आता अवघ्या मानवी समुदायाचे प्राक्तन समान आहे. अशावेळी, फक्त मी अथवा केवळ माझा, हा विचारच अनाठायी आहे. ‘क्लायमेट चेंज’चा मुद्दा एका देशाचा नाही. मात्र, ‘पॅरिस करारा’तून बाहेर पडताना, जणू काही उर्वरित जगाशी आपला संबंध नाही, असेच ट्रम्प सूचित करत होते. त्यांच्या या शपथविधी सोहळ्याला त्यांचे लाडके इलॉन मस्क; तसेच जेफ बेझोस, मार्क झकरबर्ग असा गोतावळा हजर होता. जगाच्या बाजारपेठेवर राज्य करणार; मात्र जगाच्या सुख-दुःखांशी आमचे काही नाते नाही, अशा स्वार्थी भूमिकेला कोणी राष्ट्रवाद म्हणत असेल तर ती अधःपतनाची सुरुवात आहे.
अविकसित देशातील लोक जगले काय नि मेले काय, असेच जणू म्हणत ट्रम्प जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडले आहेत. ‘जगाच्या भाकरी भाजण्यात आपला वेळ गेला, आता आम्हाला आमचा विचार करू द्या. मागासलेले पुढे गेले आणि आमचीच मुले बेरोजगार झाली’, अशा न्यूनगंडाचे राजकारण करण्यात ट्रम्प यांना सध्या तरी यश आलेले दिसते. अमेरिका हा देश इथवर आला, कारण जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी अमेरिकेला घडवले. उलटपक्षी अमेरिकेने मात्र अनेक देशांना ध्वस्त केले. हीच अमेरिका कृतघ्नपणे आता जगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करू लागली आहे. त्यांना पनामा कालवा हवा आहे. ग्रीनलंड हवे आहे. ‘ड्रिल बेबी, ड्रिल’ म्हणत नव्याने तेल आणि इंधन मिळवायचे आहे. आणि, या वाटेत जो आडवा येईल, त्याला संपवून टाकायचे आहे. तृतीयपंथीयांचे अस्तित्वच नाकारेपर्यंत अमानुषता नव्या अध्यक्षांची आहे. अमेरिका ‘थर्ड जेंडर’ मानणार नाही, असे सांगणारे हे कोण ट्रम्प? अर्थात, लोकशाहीला पायदळी तुडवणारे ट्रम्प काही एकटे नाहीत. त्यांच्या जोडीला रशियात पुतिन आहेत. चीनमध्ये जिनपिंग आहेत..! आधीच युद्धाच्या ज्वाळांनी जगाला वेढलेले असताना, स्वार्थांध विखाराची भाषा अमेरिकेला शिकवणारे ट्रम्प धोकादायक ठरणार आहेत!