शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

आकाशातही दहशतवादी

By admin | Updated: July 19, 2014 08:46 IST

मलेशियाचे प्रवासी विमान रॉकेटच्या मार्‍याने जमीनदोस्त करणार्‍या युक्रेनविरोधी दहशतवाद्यांना आंतरराष्ट्रीय गुन्हेगार ठरवून जबर शिक्षा दिली गेली पाहिजे.

अ‍ॅमस्टरडॅमहून क्वालालंपूरकडे जाणारे मलेशियाचे प्रवासी विमान रॉकेटच्या मार्‍याने जमीनदोस्त करणार्‍या व त्यातील २९५ प्रवाशांचा हकनाक बळी घेणार्‍या युक्रेनविरोधी दहशतवाद्यांना आंतरराष्ट्रीय गुन्हेगार ठरवून जबर शिक्षा दिली गेली पाहिजे. युक्रेनच्या भूमीवर या विमानाच्या सापडलेल्या ब्लॅकबॉक्समध्ये रॉकेट उडविणारे दहशतवादी आणि त्या दुर्दैवी विमानाचे वैमानिक यांचे संभाषण नोंदविले गेले आहे आणि ते ऐकणार्‍यांच्या अंगावर शहारे आणणारे आहे. कसेही करून हे विमान पाडायचेच असा मनसुबा आखून या दहशतवाद्यांनी ते पाडले व त्यातील निरपराधांचे प्राण घेतले. प्रवासी विमाने जेमतेम ३0 ते ५0 हजार फुटांच्या उंचीवरून आकाशात उडतात आणि पाहायला बरेचदा दुर्बिणींचीही गरज नसते. ती पाडायची व त्यातील माणसांचे बळी घ्यायचे असे जगभरच्या दहशतवाद्यांनी उद्या ठरविले तर विमानप्रवास यापुढे असुरक्षित होणार आहे. मलेशियन एअरलाईन्सचे एकाच वर्षात कोसळलेले हे दुसरे विमान आहे. मार्च महिन्यात त्या देशाचे ७७७ याच श्रेणीतले प्रवासी विमान बेपत्ता झाले व ते कुठे कोसळले याचा नक्की पत्ता अजूनही लागलेला नाही. त्यामागचे कारणही कोणाला अजून कळले नाही. युक्रेन हा एकेकाळी रशियाच्या सोव्हिएत साम्राज्याचा भाग होता. आठ वर्षांपूर्वी स्वतंत्र देश म्हणून तो उदयाला आला. त्यातील क्रिमिया या प्रांतात रशियन वंशाचे लोक  बहुसंख्य आहेत. रशियाचे सध्याचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन हे सत्तेवर आल्यापासून क्रिमियातील रशियनवंशीयांचा ओढा रशियाकडे वाढला व आम्हाला रशियात सामील व्हायचे आहे असे म्हणत त्यांनी एक उग्र आंदोलन सुरू केले. त्या प्रांतात त्यांनीच घेतलेल्या लोकमताच्या कौलातले बहुमतही रशियाच्या बाजूने गेले. रशियन वंशाचे लोक सोडून तेथील इतरांनी त्या कौलावर बहिष्कार घातला होता हे येथे लक्षात घ्यायचे. त्यानंतर रशियाने क्रिमियाचा भाग आपल्यात रीतसर सामीलही करून घेतला. नंतर रशियाची नजर एकूणच युक्रेनकडे वळली आणि त्या देशावर नियंत्रण मिळविण्यासाठी त्याला आजवर केला जाणारा इंधनपुरवठा रशियाने थांबविला. रशियाच्या या कारवाईविरुद्ध अमेरिका व तिच्या मित्र राष्ट्रांनी एकत्र येऊन रशियाची आर्थिक नाकेबंदी केली. पण रशियावर त्याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसले नाही. पुतीन यांची साम्राज्याकांक्षा वाढली असल्याची व त्यांना पुन्हा एकवार रशियाच्या ताब्यातले सोव्हिएत साम्राज्य उभे करण्याची महत्त्वाकांक्षा जडली असल्याचा आरोप आता जगात होऊ लागला आहे. मलेशियाचे प्रवासी विमान क्रिमियातील रशियन दहशतखोरांनी या पार्श्‍वभूमीवर पाडले असेल तर ते रशियाने आपल्या नाकेबंदीला दिलेले उत्तर आहे असेच जगात मानले जाणार आहे. मात्र तसे करण्यासाठी मलेशियन विमानातील निरपराधांचा बळी घेण्यापर्यंत त्यांच्या कारवाईची मजल गेली असेल तर रशियाच्या साम्राज्यवादाने आता एक अतिशय घृणास्पद व अपराधी पातळी गाठली आहे असेच म्हटले पाहिजे. या पुढच्या काळात रशियाचे राज्यकर्ते आपल्या कानावर हात ठेवून या घटनेशी आपला संबंध नसल्याचे सांगतील. क्रिमियन दहशतखोरांचे ते कृत्य त्यांनी आमच्या संमतीवाचून केले असेही ते सांगू शकतील. पण त्या दहशतखोरांना तसे करण्यापासून रोखण्याचे बळ व क्षमता पुतीन आणि रशियाच्या राजवटीत नक्कीच आहे. ती त्याने वापरली नसेल व क्रिमियन दहशतखोरांना असे मोकळे रान दिले असेल तर त्यामुळे रशियाचा अपराधही लहान ठरत नाही. क्रिमियामध्ये सुरू असलेल्या दहशती कारवायांना रशियाचे पाठबळच नव्हे तर शस्त्रबळही मिळाले आहे. या दहशतखोरांच्या युक्रेनविरोधी कारवायांना रशियाने उघड पाठिंबाही दिला आहे. तसे करताना युक्रेनवर आपले नियंत्रण आणण्याच्या आकांक्षा त्याने कधी लपवूनही ठेवल्या नाहीत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत रशियाला या अपराधापासून पूर्णपणे मुक्त होता येणे अवघड ठरणार आहे. मात्र दोन देशांतील अशा संघर्षात तिसर्‍या देशाचे विमान पाडले जाणे व त्यातील शेकडो निरपराधांना हकनाक मृत्युमुखी पडावे लागावे याएवढे निंद्य व निषेधार्ह कृत्य दुसरे असणार नाही. या प्रकरणाचा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पातळीवरून कठोरपणे छडा लावण्याची व यातील अपराध्यांना जगाच्या न्यायासनासमोर आणून उभे करण्याची गरज आहे, अन्यथा यापुढचा जागतिक विमान प्रवास धोक्याचा ठरणार आहे.