शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

कोमलची गोष्ट

By admin | Updated: March 30, 2015 22:50 IST

स्वत:च्या मनाचे पूर्ण समाधान व्हावे, यासाठी ती गायची. संगीत हेच तिचे भावविश्व होते. ती कुणी प्रथितयश गायिका नव्हती. संगीताचा तीळमात्र, अर्थाअर्थी संबंध नसलेल्या गरिबाच्या घरची

गजानन जानभोर -

स्वत:च्या मनाचे पूर्ण समाधान व्हावे, यासाठी ती गायची. संगीत हेच तिचे भावविश्व होते. ती कुणी प्रथितयश गायिका नव्हती. संगीताचा तीळमात्र, अर्थाअर्थी संबंध नसलेल्या गरिबाच्या घरची ती प्रज्ञावंत. तिचे नाव, कोमल अशोक चांदेकर. वडील चुन्याचे काम करतात. छोटी मुले पिढीजात वारसा, संस्कारातून घडतात. कोमलच्या बाबतीत तेही नाही. पण तरीही तिला गाणे कळले अन् तिने आत्मसात केले. तिचे स्वर सर्वांना मोहून टाकायचे.संगीत हे मनोवेधक आणि आनंद देणारे असते. दु:खी-कष्टी जिवांना तो सुखाचा आधार असतो. कोमलच्या आई-वडिलांच्या आयुष्यात तिचे गाणे अमूल्य ठेवा झाले होते. राज्य, देशपातळीवरील शेकडो स्पर्धा कोमलने गाजवल्या. ती संगीत विशारदही झाली. टीव्ही चॅनल्सवरील गाण्यांच्या स्पर्धांमध्ये तिची निवड व्हायची, पण परिस्थितीमुळे ती पुढे जाऊ शकत नव्हती. मुंबईला एका मोठ्या स्पर्धेत तिची निवड झाली. जाण्यासाठी पैसे नव्हते. तत्कालीन आमदार आणि आताचे मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी तिला मदतीचा हात दिला. कोमल तिथे गेली आणि बक्षीस मिळवून आली. प्रत्येक वेळी कुणापुढे कितीदा हात पसरायचा? तिला हा सल बोचायचा. मग ती स्थानिक स्पर्धांमध्ये, कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ लागली. चंद्रपूर येथील काँग्रेस सेवादल भवनाच्या मागे कोमलचे घर आहे. तिचा स्वरांकडे वळण्याचा प्रवास मन थक्क करणाराच. घराशेजारीच असलेल्या स्वरविहार संगीत विद्यालयातील मुलांचे स्वर नेहमी तिच्या कानावर पडायचे. ती पाच वर्षांची असेल तेव्हाची ही गोष्ट, कोमल संगीत विद्यालयाच्या भिंतीला टेकून तासन्तास उभी राहायची. कानावर येणारे स्वर मनात साठवून ती घरी यायची आणि तसेच म्हणून पाहायची. विद्यालयात मुले गात असलेली गाणी ती घरी म्हणायची. सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ... तब्बल पाच तास संगीत शाळेच्या भिंतीशेजारी तिचे असे अखंड संगीत अध्ययन सुरू राहायचे. कुणी म्हणेल ही तर एकलव्यी निष्ठा. पण एकलव्याला गुरु ठाऊक होता, कोमलला तर कुणीच गुरु नव्हता. अनेक दिवस तिची ही अशी चार भिंतीबाहेरची संगीतसाधना सुरू होती. एके दिवशी शाळेच्या शिक्षिका सुरेखा दुधलकर यांनी तिला बघितले, जवळ बोलावले आणि नंतर तिचे रीतसर शिकणे सुरू झाले. कोमलला आता गुरु मिळाला होता आणि साधनेची दिशाही मिळाली होती. निसर्गदत्त प्रतिभेचे लेणे लाभलेल्या कोमलच्या गोड गळ्यातून निघणारे स्वर सर्वांनाच थक्क करायचे. यापेक्षाही चांगले गाता यावे यासाठी ती धडपडायची. खाण्यातले पथ्य पाळायची. आयुष्याचे सूर हरवलेल्या तिच्या आई-वडिलांना ते शक्य नव्हते. पण मुलीसाठी ते पोटाला चिमटा द्यायचे. माध्यमांच्या जगात नावारूपास आलेल्या व कुवतीपेक्षा थोडी जास्तच प्रसिद्धी मिळवलेल्या समवयस्क गायकांपेक्षा कोमल अनेक स्पर्धांमध्ये काकणभर सरस ठरायची. कोमलला खूप शिकायचे होते. त्यासाठी तिची दिवस-रात्र साधना सुरू होती. पण वर्षभरापूर्वी तिचे लग्न झाले आणि गाणे थांबले. तेव्हापासून ती शांत राहायची. कदाचित गाणे थांबल्यामुळे असेल, ती फारशी बोलत नव्हती. तसेही आपण स्त्रीला फार बोलू देत नाहीत. तिला मन मारून जगावे लागते आणि रोज मरावे लागते. तिच्या मनात घोंघावणारी वादळे तिलाच शमवावी लागतात. कोमलचेही तसेच झाले असावे. शेवटी ती थकली आणि कायमची निघून गेली. आजार निमित्तमात्र ठरला. सहा महिन्यांपासून ती आजारी होती. वेळीच उपचार होऊ शकले नाहीत. परवा ती गेली. तिला मोठी गायिका व्हायचे होते, या क्षेत्रात करिअर करायचे होते. तिची पात्रता होती आणि त्याच निष्ठेने ती परिश्रमही घ्यायची. तिचे स्वर साऱ्यांनाच ऐकू आले. पण अंतर्मनातली वेदना मात्र तशीच राहिली. ही एकट्या कोमलची कहाणी नाही. अशा असंख्य कोमल आपल्या अवतीभवती असतात. गरिबीमुळे, स्त्री असल्यामुळे त्यांच्या प्रतिभेचे क्षितिज कुटुंब म्हणून आपण एका उंबरठ्यात करकचून बांधून टाकतो. त्यांच्या अपेक्षा, भावना आपण पायदळी तुडवतो. या प्रज्ञावंतांची स्वप्ने फुलण्याआधीच आपण कुस्करून टाकतो. आपले आयुष्य ते समृद्ध करतात, मात्र अस्वस्थ करणारे असंख्य प्रश्न मागे सोडून जातात.