आज शिवसेना सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करते आहे. महाराष्ट्राच्या कालप्रवाहातली ही एक महत्त्वाची घटना आहे. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी एखादी संघटना असली पाहिजे या जनमताच्या रेट्यातून १९६६ साली शिवसेनेची स्थापना झाली. तिला संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या आंदोलनाची पार्श्वभूमी होती. संयुक्त महाराष्ट्र समिती फुटून, विविध पक्ष आपापल्या वाटेने निघाले होते, राज्याची सत्ता मिळाल्याने कॉँग्रेसची ताकद पुन्हा वाढली होती. मुंबईसारख्या महानगरात दाक्षिणात्यांचा वरचष्मा सर्वत्र जाणवू लागला होता. आपल्याला डावलले जाते आहे या जाणीवेने मराठी तरुण भयशंकित झालेला होता. त्याच्या सैरभैर मनात जो संताप खदखदत होता, त्याला व्यंगचित्रकार बाळ ठाकरे यांनी वाचा फोडली आणि त्या घुसळणीतून शिवसेनेचा जन्म १९ जून १९६६ या दिवशी झाला.शिवसेना ‘मराठी तरुणांना नोकऱ्या’ या तत्कालीन विषयावर स्थापन झाल्याचे वरवर दिसत असले तरी ‘मराठी अस्मितेचे संरक्षण’ हाच तिचा मूळ उद्देश होता. गांधी हत्त्येनंतर महाराष्ट्राची पद्धतशीर कोंडी केली जाऊ लागली. जातीपातीच्या राजकारणाने महाराष्ट्राचा घात झाला. शिवसेनेचा उदय या पार्श्वभूमीवर झाला आहे. दिल्लीपतींपुढे झुकणाऱ्या ग्रामीण सत्ताधीशांबद्दल शहरी मराठी माणसाच्या मनात कायम तिडीक होती. यांनी शिवछत्रपतींचा स्वाभिमान का दाखवू नये, मराठी माणसाच्या हितासाठी खणखणीत भूमिका का घेऊ नये, आपल्याच राज्यात आपल्या अस्मितेचा लखलखीत अभिमान का बाळगू नये, हे प्रश्न त्याच्या मनात घोंगावत होते. त्यांना ज्यांनी वाचा फोडली त्या बाळ ठाकऱ्यांनाच मराठी माणसाने आपले नेतृत्त्व बहाल केले ! ‘शिवसेना’ हे संघटनेचे नाव, ‘भगवा’ हाच तिचा झेंडा अन् ‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हेच एकमेव ध्येय! त्यानंतरचा, गेल्या ५० वर्षांचा इतिहास सर्वांसमोर घडत गेला आहे. सुवर्णमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभी असलेली आजची शिवसेना नेमकी कशी आहे? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आता नाहीत. पहिल्या फळीतले काही महत्त्वाचे नेतेही दिवंगत झालेत. जे जे शिवसेना सोडून गेले, ते सगळ्या बाजूंनी उघडे पडले, केविलवाणे ठरले. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्रे सांभाळल्यानंतर प्रचंड चलबिचल माजवण्याचा पद्धतशीर प्रयत्न झाला. परंतु अतिशय धीमेपणाने, चिवटपणाने, शांतपणाने त्यांनी परिस्थितीवर ताबा मिळवलाच. स्वत:चे जसे व्यक्तिमत्त्व आहे तसेच घेऊन, कसलाही आव न आणता, कुणाचीही (अगदी वडिलांचीही) नक्कल न करता, जनतेसमोर जाण्याचे त्यांचे धाडस अद्भुत म्हटले पाहिजे. त्यांनी अनेक आव्हाने यशस्वीपणे परतवून लावली. विधानसभा निवडणुकीत, ते भाजपाच्या सापळ्यात न अडकता उलट भाजपाला पुरून उरले. शरद पवारांच्या कुटील डाव प्रतिडावांना ते शांतपणे निष्प्रभ करताना दिसले. पण खरी आव्हाने इथून पुढेच आहेत याची जाणीव शिवसेनेच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या फळ्यांनी ठेवली पाहिजे. शिवसेना ही एकमेव अशी संघटना आहे की जिथे जातीयवाद नाही. ज्याच्यामध्ये तडफ असेल, धमक असेल, उत्साह असेल असा कुणीही संघटनेत पुढे जाऊ शकतो. ज्यांना कधीही सत्तेचे लाभ मिळू शकले नाहीत असे गावगाड्यातले कोरडवाहू अल्पभूधारक शेतकरी आणि अठरापगड लहानलहान दुबळे कारूनारू यांना शिवसेनेमुळेच मानाचे स्थान मिळाले. आपली सत्ता गेल्याच्या क्रोधातून, सत्ताभोगी सरंजामदार आता शिवसेनेवर कब्जा मिळवण्याची धडपड करतील. शिवसैनिकांनी डोळ्यात तेल घालून, शिवसेनेचे सर्वसमावेशक रूप जपलेच पाहिजे. शरद पवारांचे गेल्या ३० वर्षांतले राजकारण हे सामान्य माणसाला दुबळे करणारे, लाचार करणारे राजकारण होते. ते आक्रसत नेण्याचे काम सामान्य जनांनीच मतपेटीच्या माध्यमातून करून दाखवले; तसतशी शिवसेनेची ताकद हळूहळू वाढत गेली. अगदी शेवटच्या वस्तीवाडीपर्यंत कार्यकर्ता असणारी ही एकमेव संघटना आता महाराष्ट्रात आहे. तिची बांधणी सामान्य शिवसैनिकांनीच आणखी घट्ट केली पाहिजे. महाराष्ट्राच्या सर्व प्रादेशिक उपविभागांमध्ये शिवसेनेचे भावनिक आवाहन पोचते. मुंबई असो की पुणे, कोकण असो की मराठवाडा, वऱ्हाड असो की बालेघाट, शिवसेनेचा भगवा रंग मराठी माणसाला सर्वत्र हवाहवासा वाटतो; कारण त्याच्या जागत्या धर्माचा अन् उमद्या संस्कृतीचा तो रंग आहे. महाराष्ट्रात भाजपा बलिष्ठ झाल्यामुळे, त्याच्या नकाशालाच आता धोका निर्माण झाला आहे. विदर्भ महाराष्ट्रापासून तोडण्याची कारस्थाने सुरू झाली आहेत. मुंबईचे आर्थिक साम्राज्य गुजराथमध्ये हलवण्याची षड्यंत्रे दिसू लागली आहेत. कसोशीने त्यांना पायबंद घातला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे महाराष्ट्रात संघ जितका ताकदवान दिसू लागेल तितके ब्राह्मणद्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्नही जारीने केला जाईल. यात महाराष्ट्राचे अतोनात नुकसान होईल. ते न होऊ देण्याची किमया फक्त शिवसेनाच करू शकेल. कारण जातीगत कावेबाजी आणि पातीगत रांगडा धसमुसळेपणा या दोन्ही बाधा फक्त शिवसेनेनेच परतवून लावल्या आहेत. सध्या इतिहासाचा कोळसा उगाळून महाराष्ट्र काळाकुट्ट करण्याचे उद्योग सुरू आहेत. त्याच इतिहासातले चंदन उगाळून नव्या पिढ्यांचा नवा महाराष्ट्र सुगंधित करण्याचे ऐतिहासिक कार्य शिवसेनेला करावे लागेल.-नंदन रहाणे(शिवसेनेचे माजी नाशिक महानगर प्रमुख)
शिवसेना: खरी आव्हाने तर येथून पुढेच आहेत
By admin | Updated: June 19, 2015 03:17 IST