- अंजली भुजबळसैन्यातील जवानांना शत्रू आणि निसर्ग अशा दोन्हींशी लढाया लढाव्या लागतात. सियाचीन ग्लेशियर सारख्या सरासरी २२ हजार फुट उंचावर आॅक्सीजनचे प्रमाण कमी असेत. येथे बर्फाचे कडे कोसळण्याच्या घटनाही वारंवार घडतात. त्यात अनेक जवानांना प्राण गमवावे लागले आहेत. बर्फाच्या वादळात अनेक सैनिकांचे तर मृतदेहही सापडत नाहीत. देशासाठी असे हौतात्म्य पत्करणाऱ्या सैनिकांना अभिवादन. सीमाच्या मोबाइलची रिंग वाजली... तसा तिने फोन उचलला. समोरून अगदी खंगलेला आवाज आला... ‘हॅलो सीमा, मी रवी बोलतोय...’ आवाज ऐकून सीमाने प्रश्नांचा भडिमार के ला. काय झालं? तुमचा आवाज असा का येतोय?... तुमची तब्येत बरी नाही का?... त्यावर रवीने अगदी सहज उत्तर दिलं, ‘मी ठीक आहे. जरा पाठ दुखतेय एवढंच... मी सध्या चंदिगढच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे. पण काळजी करण्याचं काही कारण नाही.’ आठ दिवस असाच सीमा आणि रवीचा फोनचा सिलसिला सुरू होता. रवी फोन करेल तेव्हा ‘मी येऊ का’ हा एकच प्रश्न ती विचारत होती. त्यावर ‘तू एकटी कशी येणार? मुलांचं काय? त्यांचा अभ्यास बुडेल? कुटुंबाला राहण्यासाठी येथे काही व्यवस्था नाही. मीच येतो बरा झालो की,’ असेही त्याने सांगितले. त्यावर सीमाने जरा विचार केला आणि ‘ठीक आहे, पण तुम्ही काळजी घ्या,’ असे ती उत्तरली. रवीची काळजीही स्वाभाविक होती, मुलांचा विचार करणंही गरजेचं होतं. त्यानंतर नेहमीप्रमाणे सीमा रवीला फोन करत होती. मात्र रवीचा फोन बंद होता. काही दिवसांनी तिला रवीच्या निधनाचं वृत्त समजलं. हे ऐकून असं काही घडलंय यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. लेह लडाख येथे पोस्टिंग असताना रवींद्र देशमुख यांना आॅक्सिजन कमी पडल्याने त्यांची प्रकृ ती गंभीर झाली आणि चंदिगढ येथील आर्मी हाँस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.१ आॅगस्टला रवींद्र देशमुख यांचे चंदिगढच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ३ आॅगस्टला त्यांचा मृतदेह पुणे विमानतळावर तिरंग्यात रवीचा मृतदेह पाहून सीमाच्या अश्रूंचा बांध फुटला. ही केवळ रवींद्र आणि सीमा देशमुख यांची कहाणी नसून अनेक जवानांच्या कुटुंबीयांची आहे. रवींद्र देशमुख यांचे वडीलही माजी सैनिक असून दोन्ही भाऊही लष्करात आहेत. देशसेवेसाठी अविरत झटणारे हे जवान कुटुंबापासून दूर सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी उभे असतात. या सैनिकांना नेमणूक असलेल्या ठिकाणच्या वातावरणाचाही सामना करावा लागतो, तोही एक संघर्ष आहे.आपली भारतीय सेना अशा दुर्गम भागात आहे, जेथे वीज, रस्ता, पाणी अशा पायाभूत सुविधा नाहीत. अशा परिस्थितीत भारतीय सैन्य सीमेवर आपल्या रक्षणासाठी तैनात आहे. सियाचीन हे सर्वात उंच ठिकाण असून येथे आॅक्सिजन कमी आहे, तसेच तेथील तापमान -३५ एवढं असतं, अशा स्थितीत या वातावरणाचा सामना करत जवान जिवाची बाजी लावत आहेत. जम्मू-काश्मीर, लेह लडाख येथील परिस्थितीही काही वेगळी नाही. अशा दुर्गम ठिकाणी रस्ता नसल्याने सैनिकांना इमर्जन्सीमध्ये मैलोन्मैल पायपीट करावी लागते. तर अनेक उपयुक्त सामान पोहोचविण्यासाठी प्राण्यांचा आधार घ्यावा लागतो. येथे दोन-तीन महिने वास्तव्य करताना फ्रोजन फूडचा आधार घ्यावा लागतो. कोणत्याही सुविधेशिवाय हे सैनिक केवळ देशप्रेमाखातर येथे राहतात.जम्मू, काश्मीर आदी ठिकाणी नोव्हेंबरपासून बर्फवृष्टी सुरु होते. अगदी जानेवारी, फेब्रुवारीपर्यत बर्फ पडत असतो. अनेक सैनिकांना या वातावरणाचा फटका बसतो. काही जणांना प्राणालाही मुकावे लागते. या बर्फाच्या वादळामध्ये अनेक सैनिकांचे मृतदेहही सापडत नाहीत. १९७२ साली बेपत्ता झालेल्या सैनिकाचा मृतदेह मागील वर्षी सापडला होता, हे उदाहरण तसं ताजंच आहे.