- डॉ. वि. पं. फड
संसारिक माणूस म्हटला की त्याच्याकडे ईर्षा, व्देष, स्वार्थ, मत्सर, अहंकार, द्वैत आदी विकारांना किंवा त्यापैकी काहीना थोड्याफार प्रमाणात का होईना किंवा प्रसंगानुरूप का होईना स्थान असते. ज्या व्यक्तीकडे यापैकी कशालाही स्थान नसते, तिच्याकडे आनंदाला उणीव असत नाही. अशा लोकाना संसारातले संन्याशी म्हणणे योग्य होईल असे आम्हास वाटते. खरे म्हणजे हे अवघड आहे. असे असले तरीही काही लोक असे असू शकतात. असो.ईर्षा, व्देष, स्वार्थ, मत्सर, अहंकार, द्वैतादी विकारांना पुरेसे किंवा थोडेफार स्थान देणारा माणूस स्वत:ला आनंदी, भाग्यशाली, शक्तीशाली समजत असला तरी असे लोकही कधी ना कधी दु:खी झाल्याशिवाय राहत नाहीत. चुकीच्या वर्तनामुळे एकीकडे एखाद्यावर अन्याय होतो आणि दुसरीकडे चूक करणाऱ्यांचे पाप वाढते. काहींना त्यांच्या इच्छेविरूध्द थोडेसे जरी काही घडले किंवा अपेक्षेचा भंग झाला की लगेच त्रास सुरू होतो. काही लोक केवळ अवास्तव कल्पना करून, असे होईल का, तसे होईल का, असे झाले तर, असे नाही झाले तर, तसे झाले तर, तसे नाही झाले तर, अशा कल्पनेनेच दु:खी वा त्रस्त होतात. काही लोकांकडे भौतिक सुख साधनांच्या उपलब्धतेसोबतच मानसिक दारिद्र्याचीही रेलचेल असते.अर्थात, काही लोक भरपूर उपलब्ध असूनही दु:खी तर काहींकडे काहीच नसते म्हणून दु:खी असतात. थोडक्यात, काही मोजके लोक सोडले तर मोठ्या प्रमाणावर लोक दु:खी, त्रस्त, अशांत आहेत. या अशांतीवर, पापावर, तापावर, अवास्तव आशा अपेक्षा, व्यर्थ कल्पना आदींवर, विकारांवर रामबाण उपाय म्हणजे संतांची संगत होय. संत संगतीत गेल्याने काय होते, हे सांगतांना संत निळोबाराय म्हणतात, संतसंगे हरे पाप। संतसंगे निरसे ताप।संतसंगे निर्विकल्प।होय मानस निश्चळ।संतांची संगत करण्यासाठी संत ओळखता आला पाहिजे. केवळ पेहराव पाहून किंवा काही लोक एखाद्याला संत मानतात म्हणून आपणही मानायचे, असे केले तर एखाद्या वेळी दु:ख कमी होण्याऐवजी दु:ख वाढू शकते. म्हणून केवळ लोक एखाद्याला संत म्हणत आहेत म्हणून आपणही संत म्हणून त्यांच्याकडे धाव घ्यावी असे नाही. संतांना पेहरावापेक्षा किंवा लोकांच्या म्हणण्यापेक्षा त्यांच्या वर्तनातून ओळखावे. ही ओळख व अशांची संगत निश्चितच आपल्या मनाला चुकीच्या विचारातून बाहेर काढून निश्चळ बनविण्यास मदत करेल. मन निश्चळ झाले तर आनंदाला वेगळ्याने शोधावे लागणार नाही. जय जय राम कृष्ण हरी।।