- डॉ. शुभांगी रघुनाथ पारकरआपण स्वत:ला किती केविलवाणे ठरविणार की, त्या प्रसंगीतून ज्ञानाचा उपहार मिळविणार, हेसुद्धा आपल्या मनावरच अवलंबून आहे. अर्थात, जीवनपटावर दु:ख अनुभवले नाही, तर आनंदाची मजा येणारच नाही. सत्याच्या जवळ जाण्यासाठी दु:खासारखा दुसरा पर्याय माणसाकडे नाही. दु:खाची व्यथाच माणसाला नात्यातल्या सच्चेपणाची, संपत्तीच्या फोलपणाची प्रतिष्ठेच्या बेगडीपणाची सत्य परिस्थिती अनेकदा समजावून देते.आपल्या प्रत्येकाच्या मनात एक छोटेसे रोप जगत असते. त्या रोपाच्या अस्तित्वामुळे प्रत्येकाला आपण अंतर्मनात जिवंत आहोत, याची जाणीव सतत होत असते. ते रोप आपले आपण शोधायचे असते. त्याला व्यवस्थित खतपाणी घालत त्याचा वृक्ष बनवाचा असतो. अर्थात, आपण जे काही ऐहिक करत असतो वा मिळवत असतो, त्यात आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करायची गरज नाही. पैशाने विकत घेता न येणाऱ्या, पण तरीही निर्मळ आनंद देणाऱ्या गोष्टी या जगात आपल्याला मिळतात.आपण आयुष्यात मागे घडलेल्या अनेक गोष्टींचे, भूतकाळातील प्रसंगाबद्दलचे भावनिक ओझे पाठीवर घेऊन फिरत असतो. आपल्याला नेहमी जाणवत असते की, आपल्या कटू भावनांचे पाठीवरचे हे गाठोडे नको असलेले मनामनांचे ओझे आहे. कारण या जुन्या ओझ्याचे वजन आपल्याला पुढचे पाऊल टाकताना त्रासदायक ठरणारे आहे. विधायकदृष्ट्या आयुष्यातल्या कोणत्या गोष्टी सकारात्मक घडणार आहेत, हे आधीच सांगणे मुश्कील आहे. आपल्याला पुढे जाणे कठीण होणार आहे, पण ज्या काही नकारात्मक पीडा देणाऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात. त्या कधी आपल्याला नवीन अनुभवाचा धडा तरी देतात किंवा आपल्या आयुष्यातला कायमचा अडसर बनून जातात. आपण स्वत:ला किती केविलवाणे ठरविणार की, त्या प्रसंगीतून ज्ञानाचा उपहार मिळविणार हेसुद्धा आपल्या मनावरच अवलंबून आहे. अर्थात, जीवनपटावर दु:ख अनुभवले नाही, तर आनंदाची मजा येणारच नाही. स्वत:च्या राजवाड्यात सुखाने रमणाऱ्या पांडवांना काय किंवा प्रभू रामचंद्रांना काय सत्याची कटू प्रचित घ्यावी लागली आणि ‘पराधीन आहे, जगती पुत्र मानवाचे’ हे सत्य स्वीकारावे लागेल. आयुष्यात जीवन संकल्पनेच्या दोन महत्त्वाच्या बाजू आहेत. एका बाजूने दु:ख अनुभवल्याशिवाय दुसऱ्या बाजूने सुखाचा आनंद घेता येत नाही. थोडेसे जगाच्या अनुभवांतून टक्केटोणपे खाल्ले नाही, तर शहाणपणा शिकता येत नाही. जीवनप्रवाहात खूप अनिश्चितता आहे. म्हणूनच आशेचे महत्त्व कळते. दुसऱ्याच्या ताकदीची भीती अनुभवली की, ती केवढी मोठी चीज आहे हे हळूहळू मनाला पटायला लागते. बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे, आयुष्य ही अनेक बऱ्यावाईट घटनांची न संपणारी मालिका आहे. त्याच्यात चढउतार आहेत. त्यातून माणसाला संधी शोधली पाहिजे. त्यात आनंद व यश आणि निराशा व दु:ख यांची शक्यता जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर माणसाला पडताळता येते. आपण कितीही अपेक्षा केली, तरी आपल्या मनाजोगती परिस्थिती आपल्याला निर्माण करता येत नाही, हे सत्य आहे. आपण स्वत:ला दुसऱ्याच्या नजरेतून पारखण्याची गरज नाही, हे शिकायला खूप वर्षे जावी लागतात, पण जेव्हा आपण हे शिकतो, तेव्हा जग आपल्या हातात राहते. सोप्या शब्दांत हे तथ्य समजायचे झालेच, तर आपला प्रत्येकाचा जन्म हा मुळातच आपल्या स्वत:च्या जगण्याचा आनंद घेण्यासाठीच झाला आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या विचाराने जर आपण आयुष्य जगू लागलो, तर आपण कसे आनंदी होणारे? कसे सुखी होणार? आपल्याला सतत दुसऱ्याला आवडते म्हणून किंवा दुसऱ्या कुणाची इच्छा म्हणून आपल्या जगण्याची शैली बदलायची गरज नाही. इतर लोक आपण ज्या पथावर चाललो आहोत, त्या पथाबद्दल काय मत मांडतात, यापेक्षा आपली इच्छा किती दुर्दम्य आहे हेच शेवटी महत्त्वाचे आहे. म्हणून तर काही दुर्मीळ लोकांच्या वाटा वेगळ्याच असतात. त्यात त्यांचा आनंद व निर्भेळ समाधान त्यांना मिळते. बुद्धी आणि हृदय जेव्हा एकत्र येऊन काम करतात, तेव्हा माणसाचे आयुष्य खऱ्या अर्थाने, सुखी होते. आपण आपल्याकडून वचन घ्यायला पाहिजे की, आयुष्यात ज्या व्यक्तींवर आपण प्रेम करतो, ज्या मूल्यांवर आपला विश्वास आहे, जो जीवनहेतू आपल्याला साध्य करायचा आहे, त्या सर्व गोष्टींशी आपण प्रामाणिक राहणार आहोत. नाहीतर नैतिक मूल्यांच्या विरोधात पांडवांशी युद्ध करीत, कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या बलाढ्य रथीमहारथींची जी त्रेधातिरपीट झाली, जी ससेहोलपट झाली, तीच अनेक माणसांच्या आयुष्यात होते खरी. जसजसे आयुष्य आपल्यासमोर उलगडत जाते, तसतसे आपल्या लक्षात येते की, ‘भगवत्गीतेत सांगितल्याप्रमाणे’ जे झाले ते ठीक होते, जे आता होत आहे ते ठीक आहे आणि जे होईल तेही ठीकच होईल. बऱ्याच वेळा काही चांगल्या गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे आपल्याला मिळालेल्या नसतात, पण नंतर अपेक्षा नसतानाही अधिक मोलाच्या गोष्टी आपल्याला मिळतही जातात. खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या कष्टांसाठी नैसर्गिक दृष्ट्या मिळालेल्या या भेटी आहेत.छोट्या-मोठ्या काळजी करण्यासाररख्या गोष्टी व कष्टप्राय गोष्टी आयुष्यात येत राहतातच, पण मनातील कटू भावनांना शमवत त्या गोष्टी आपण अनुभवल्या, तर त्यात वेदना तेवढ्यापुरतीच होते, हे ज्याक्षणी समजते, त्या क्षणी आपल्या आनंदाच्या क्षणांना कोणीही आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही हे खरे. आयुष्याच्या शेवटी एक प्रामाणिक सुंदर हसू फक्त आपल्या विचारांशी व कृतीशी इमानदार असणाऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसते.
सच्चेपणाची जाणीव
By admin | Updated: October 29, 2016 23:22 IST