‘केला इशारा जाता-जाता!’ नावाचा एक मराठी चित्रपट खूप गाजला होता. त्याच्या शीर्षकाची आज आठवण येते. कारण केवळ चार दिवसांत (शनिवार ते मंगळवार) दक्षिण महाराष्ट्राला मान्सूनच्या पावसाने येता येता इशारा दिला आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारपर्यंत तुरळक पाऊस होता. नाले, ओढे कोरडेच होते. पुढे चार दिवस पाऊस चोवीस तास झोडपून काढू लागला. बघता बघता सर्व नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले. अनेक नद्यांच्या पाण्याने धोक्याची पातळीही गाठली. अनेक रस्ते, बंधारे आणि पूल पाण्याखाली गेले. राष्ट्रीय महामार्ग वगळता बहुतांश रस्त्यांवर पाणी आले. कोल्हापूर- रत्नागिरी, कोल्हापूर-सिंधुदुर्ग मार्गांवर पाणी आले. शिवाय अनेक ठिकाणी शहरांतून पाणी शिरले. कोल्हापूरच्या सखल भागातही पाणी येऊन, सांगली शहराचा एक तृतीयांश भाग पाण्याने डबडबला. केवळ चार दिवसांत पावसाने दाणादाण उडवून दिली.कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, कऱ्हाड आदी सर्व शहरांतील पाणी बाहेर पडण्यास पुरेशी जागाच शिल्लक ठेवलेली नाही. वास्तविक, दक्षिण महाराष्ट्राच्या कृष्णा खोऱ्यातील चोवीसपैकी एकही धरण अद्याप भरलेले नाही. या चार दिवसांत पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या पावसाने आता कोठे ५० टक्के पाणीसाठा झाला आहे. एकही धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसल्याने पाण्याचा विसर्ग करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरीदेखील केवळ धरणांच्या लाभक्षेत्रात पडणाऱ्या पाण्याने नद्यांना महापुरी बनवून सोडले आहे. कारण, सर्वच नद्यांवर येणारे रस्ते वाढविले आहेत. राज्य आणि महामार्ग उंच केले आहेत. पावसाचे पाणी वाहून जाण्यास पुरेशी जागाच ठेवलेली नाही. त्यामुळे हजारो एकर शेतीमधील उभ्या पिकांत पाणी शिरले आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांच्या पश्चिम भागातील बारा तालुक्यांत अतिवृष्टी झाली. हे सर्व तालुके डोंगराळ आहेत. सह्याद्री पर्वत रांगांमध्ये पसरले आहेत. तेथे पाऊस प्रचंड असतो. दरवर्षी या तालुक्यांतच असणारी चोवीस धरणे भरतात. त्यांचा विसर्ग सुरू होताच नद्यांच्या पाण्याची पातळी वाढते. नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा दिला जातो. निसर्गनियमाप्रमाणे याचीही एक पद्धत ठरून गेली आहे. गत वर्षीच्या दुष्काळी पार्श्वभूमीवर उन्हाळी पाऊस झालेच नाहीत. जूनमध्ये पाऊसच नाही. जुलैचा पहिला आठवडाही कोरडा गेला. मात्र, गत चार दिवसांत झालेल्या पावसाने कसर भरून काढली. गत वर्षीच्या पावसाची सरासरी पार केली. ही किमया केवळ चार दिवसांत झाल्याने नद्यांना पूर आले. अनेक गावांचा संपर्क तुटला. जनजीवन विस्कळीत झाले. त्याचे कारण थोडा जरी अधिक पाऊस झाला तरी येणाऱ्या पुरावर मात करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा नाहीत. अनेक वर्षे आणि पिढ्यान्पिढ्या ठरावीक रस्ते, मार्ग, गावे पाण्याखाली जातातच, त्यावर उपाय नाही. याउलट अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग बंद केले गेले आहेत. परिणामी, पाण्याची अडवणूकच होत आहे. अद्याप ७० टक्के पाऊस होणे अपेक्षित आहे. जुलै आणि आॅगस्टमध्ये तुफान पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यानच्या काळात धरणे भरली तर विसर्ग करावा लागेल. एकीकडे पावसाचे पाणी आणि धरणांचा विसर्ग यामुळे हाहाकार उडू शकतो. हा निसर्गाने येता येताच दिलेला इशारा आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दक्षिण महाराष्ट्रात १९५३, १९८३ आणि २००५ मध्ये महापूर आले होते. केव्हा तरी दशक-दोन दशकांनंतर महापूर येतो म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. कारण पाण्याच्या निचऱ्याच्या मार्गावर आपण असंख्य अडथळे निर्माण केले आहेत. सांगली शहरात चार दिवसांच्या पावसाने वाताहत झालीे. निम्मे शहर पाण्यात तरंगत होते. चेन्नईची आठवण व्हावी, अशी परिस्थिती होती. निसर्गाने दिलेला इशारा समजून घेणे हाच समजूतदारपणा आहे. - वसंत भोसले
पावसाने केला इशारा येता येता!
By admin | Updated: July 15, 2016 01:58 IST