मिलिंद कुलकर्णी - राजकीय व्यक्तींना जळी स्थळी काष्ठी पाषाणी सत्ता दिसते. त्याचा प्रत्यय खान्देश सध्या घेत आहे. सहकार क्षेत्रातील निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याने मंत्री, आमदार, माजी आमदार, सभापती अशी सगळी मंडळी त्यात रस घेत आहेत. अगदी विविध कार्यकारी संस्थेपासून शिक्षणसंस्था, साखर कारखाना, जिल्हा बँकेपर्यंत राजकीय नेते हस्तक्षेप करू लागल्याने सामान्य कार्यकर्त्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यांच्यातील असंतोष वेगवेगळ्या माध्यमातून उमटू लागला आहे. जळगावच्या जिल्हा बँकेवर कायम काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीतही हीच स्थिती राहिली. परंतु काँग्रेस आघाडीच्या संचालकांमध्ये बेबनाव झाल्याने शिवसेनेचे तत्कालीन आमदार चिमणराव पाटील यांना बँकेचे अध्यक्षपद मिळाले. एकनाथराव खडसे यांनी ऐनवेळी पाटलांच्या पारड्यात वजन टाकल्याने बँकेवर प्रथमच युतीचा झेंडा फडकला. राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर खडसे यांना जिल्हा बँकेतील सत्ता खुणावू लागली. बँक ताब्यात आली तर जिल्ह्याचे सहकार क्षेत्राचे सत्ताकेंद्र हातात येणार असल्याने त्यांनी ‘सर्वपक्षीय पॅनल’ आणि ‘बिनविरोध निवडणुकी’चे पिल्लू सोडले. पाच वर्षे एकमेकांवर चिखलफेक करणारे संचालक पुढील पाच वर्षांसाठी वर्णी लागत असल्याने एकत्र यायला तयार झाले. बैठकांचा रतीब सुरू झाला. उमेदवार ठरविण्यासाठी सर्वपक्षीय समिती गठित झाली. त्यात राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील, अॅड. रवींद्र पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, शिवसेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील यांचा समावेश होता. सहकार कायद्यातील घटनादुरुस्तीमुळे संचालकांची घटलेली संख्या आणि वाढते इच्छुक यांचा ताळमेळ बसविताना समितीला मोठी कसरत करावी लागली. समितीने अंतिम यादी एकनाथराव खडसे यांच्याकडे सोपवली. मात्र ज्यांना या यादीत स्थान मिळाले नाही, त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली. मात्र नेत्यांविषयी बोलणार कोण? मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? असा प्रश्न होता. अमळनेरचे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी कोंडी फोडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत त्यांनी नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांना बँकेत संधी द्या, अशी मागणी केली. या मागणीने जोर धरला आणि समितीचे सदस्य आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांना कार्यकर्त्यांच्या भावनांची दखल घ्यावी लागली. सर्वपक्षीय पॅनलला छेद देण्यापूर्वी त्यांनी खडसे, चिमणराव पाटील यांनी स्वत: वा कुटुंबातील कोणालाही या निवडणुकीत उतरवू नये, अशी मागणी केली. त्यापाठोपाठ अमळनेरचे अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांनीही वेळ आल्यास स्वतंत्र पॅनल उभे करू, असा शड्डू ठोकला. चौधरी यांनी निवडणुकीनंतर भाजपाचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले असूनही त्यांना संभाव्य यादीतून वगळण्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली. ४ एप्रिलपासून खरी रणधुमाळी सुरू होणार असल्याने या घडामोडी आणखी कोणते वळण घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. माजी आमदारांचाही सहभागेसाहेबराव घोडे पराभूतचाळीसगावच्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार प्रा. साहेबराव घोडे यांना पराभव पत्करावा लागला. दुसरे माजी आमदार अमळनेरचे डॉ. बी. एस. पाटील हे खान्देश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत उतरले आहेत. अंतर्गत विरोधात वाढफैजपूरच्या मधुकर सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार शिरीष चौधरी व विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे यांच्या पॅनलमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. चोपड्याच्या साखर कारखान्यात शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. कार्यकर्त्यांना संधी नाकारत नेत्यांनी स्वत: वा कुटुंबातील सदस्यांना आणखी पदे घेण्याच्या या प्रवृत्तीला विरोध होऊ लागला आहे.
जळी स्थळी सत्ता एके सत्ता
By admin | Updated: April 2, 2015 23:11 IST