शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

CoronaVirus News: कळते; पण वळत नाही...

By किरण अग्रवाल | Updated: April 8, 2021 08:19 IST

सद्य:स्थितीत आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे, म्हणूनच राज्यातील ठाकरे सरकारने ‘मी जबाबदार’ मोहीम सुरू केली आहे. कोरोनाची साखळी खंडित करायची असेल तर सर्वांना जबाबदारीने वागावे लागेल.

- किरण अग्रवालहा मथळाच पुरेशी स्पष्टता करणारा आहे, कोरोनाच्या वाढत्या संकटाबाबत तेच होताना दिसत आहे. डोळे उघडून किंवा फाडून बघण्याची गरजच नाही इतके कोरोनाचे दिवसेंदिवस उग्र होत चाललेले रूप सर्वांच्या समोर आहे. वैद्यकीय यंत्रणा राबराब राबत आहे, शासन व प्रशासनही आवश्यक त्या सर्व उपाययोजनांमध्ये गर्क आहे, तरी त्यासंबंधीच्या प्रतिबंधात्मक उपायांचे पालन न करता लोक वावरणार व वागणार असतील तर त्याला हाच मथळा समर्पक ठरावा.राज्यातील कोरोनाचा ग्राफ कमी व्हायचे नाव घेताना दिसत नाही. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ८० हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण असून, त्याच बरोबरीने मुंबईची अवस्था आहे. ठाण्यातही साठ हजारांपेक्षा अधिक तर नागपूरमध्ये ५७ हजारांपेक्षा अधिक सक्रिय रुग्ण आहेत, त्याखालोखाल नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, नांदेड व अन्य जिल्ह्यांची स्थिती आहे. देशाचा विचार करता फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये मृतांची संख्या पाचपट झाली आहे, यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. आकडेवारीतच बोलायचे तर राज्यात ५६ हजारांपेक्षा अधिक बळी गेले असून, देशातील एकूण कोरोनाबळींपैकी तब्बल ३४ टक्के बळी एकट्या महाराष्ट्रात गेले आहेत. भयावह अशी ही स्थिती असून, विशेषतः शहरी भागात जाणवणारा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागातही फैलावताना दिसत आहे. हॉस्पिटल्समधील बेड्स कमी पडू लागल्याची ओरड होऊ लागली असून, अंत्यसंस्कारासाठी नंबर लावावे लागत असल्याची स्थिती काही ठिकाणी पहावयास मिळत आहे. अशी एकूण परिस्थिती असताना निर्बंध पाळण्याबाबत मात्र नागरिक गंभीर दिसत नाहीत, हे शोचनीय म्हणायला हवे.कोरोनाची दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली स्थिती पाहता हळूहळू काही निर्बंध लावण्यात आलेत. तथापि, त्याने फरक न पडल्याने अखेर ‘ब्रेक द चेन’ या भूमिकेने कडक निर्बंध लागू केले गेले आहेत; परंतु या निर्बंधांचासुद्धा मुंबईसह काही शहरांत फज्जा उडाल्याचे पहिल्याच दिवशी बघावयास मिळाले. काही ठिकाणी बाजारपेठा बंद होत्या; परंतु रस्त्यावरील गर्दी कमी झालेली नव्हती व स्वाभाविकच त्या गर्दीत फिजिकल डिस्टन्सिंगचा मागमूसही आढळत नव्हता. बाजार समित्या, मंडयांमध्येदेखील गर्दी उसळलेली दिसली. संकट आपल्या आजूबाजूस घोंगावत आहे हे उघड व स्वच्छपणे दिसत असतानाही अशी गर्दी कायम राहणार असेल व यात डिस्टन्सिंग पाळले जाणार नसेल तर कोरोनाला संधी मिळणारच; पण विचारात कोण घेतो अशी स्थिती आहे. निर्बंध पाळावेत ते शेजारच्याने म्हणजे दुसर्‍याने, आम्ही मात्र अनिर्बंधपणेच वागणार व वावरणार म्हटल्यावर दुसरे काय होणार? कळते; पण वळत नाही, असे म्हणता यावे ते त्यामुळेच.महत्त्वाचे म्हणजे कोरोनाच्या संकटाचा संबंधित यंत्रणांवरील ताण वाढला आहे. तसे पाहता गेल्या वर्षभरापासून वैद्यकीय यंत्रणा कोरोनाशी  निपटण्यात व्यस्त आहे. डॉक्टर, नर्सेस, वाॅर्डबाय असे सारेच जण जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस रुग्णांवर उपचार करीत आहेत. अनेकांनी तर या काळात रजाही घेतलेल्या नाहीत. पोलीस यंत्रणाही बंदोबस्तात अडकलेली आहे. अधिकारी व अन्य कर्मचारीवर्गही नेहमीची कामे व जबाबदाऱ्या सांभाळून कोरोनाविषयक कामावर देखरेख ठेवून आहे. या सर्वांवरच कामाचा ताण आहे हे नाकारता येणारे नाही. अशा स्थितीत जमावबंदी, संचारबंदीचा नियम मोडून उगाच भटकणाऱ्यांच्या मागे पोलिसांना दंडुका घेऊन पळत फिरावे लागणार असेल किंवा फिजिकल डिस्टन्स न पाळणाऱ्यांना अंतरा-अंतराने उभे करण्याची वेळ येणार असेल तर त्यात वेळ व श्रमाचाही अपव्ययच घडून यावा. सद्य:स्थितीत आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे, म्हणूनच राज्यातील ठाकरे सरकारने ‘मी जबाबदार’ मोहीम सुरू केली आहे. कोरोनाची साखळी खंडित करायची असेल तर सर्वांना जबाबदारीने वागावे लागेल. कोरोनाचे संकट त्रासदायी आहे हे जर आपल्याला कळत आहे तर त्यासंबंधीची काळजी आपल्या वर्तनात वळलेली दिसायला हवी इतकेच यानिमित्ताने.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या