- डॉ. शुभांगी रघुनाथ पारकर आपण क्रोधासारख्या विध्वंसक भावनेच्या आहारी जातो, तेव्हा नेमके चुकीचे व टोकाचे निर्णय घेतो. नंतर आपल्या लक्षात येते की, आपण खूप चुकलो. त्या क्षणी स्वत:ला सावरता आले नाही, पण आपल्या हातातून खूप काही निसटून गेले, आपण खूप काही गमावून बसलो. म्हणूनच भावनांचे नियोजन करताना थोरा-मोठ्यांचा एक साधासरळ, शांतपणे विचार करून निर्णय घेण्याचा सल्ला खूप मोलाचा ठरतो. अनेक अस्वस्थ करणाऱ्या आणि जीव गुदमरून टाकणाऱ्या अनुभवातून बाहेर येण्याचा उपाय आपण स्वत:च शोधला, तर कदाचित आपण स्वत:ला स्वस्थचित्त व शांतचित्त करू शकतो. जवळजवळ प्रत्येक जण माणूस म्हणून तसा अपूर्णच आहे. आजही आपल्याला अनेक गोष्टी शिकायच्या आहेत. आपल्या अनेक भावनांचा निचरा व्हायचा आहे. अशा वेळी दु:खद अतृप्त भावनांना मनाच्या खोल कप्प्यात दबवून ठेवायचा प्रयोगच चुकीचा आहे. नकारात्मक भावना वेळोवेळी उफाळणारच, पण त्या दबवून टाकण्यापेक्षा त्यांना झेलत एक नवा धडा शिकता येतो का, हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी या भावनांचे स्वरूप आपल्याला बदलता आले पाहिजे. कारण त्या भावनांना आपण त्या क्षणी दाबू, पण नंतर पुन्हा त्या उफाळातील त्या वेळी त्या जास्त पेटतील. वेगळे रूपही धारण करतील. कुणाचा राग कुणावर काढला जातो. रागाचे स्वरूप काही वेळा जीवघेणेसुद्धा होऊ शकते. सुरुवातीला त्या दाबता आल्या खऱ्या, पण नंतर त्या भावनांच्या लाटेला आपण काबूत ठेवू शकत नाही. ती लाट विनाश करूनच जाते. जेव्हा-जेव्हा चित्त थाऱ्यावर नसते, तेव्हा सारासार विचारही करता येत नाही. आपण एक साधी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, ज्या दिशेने आपले चित्त जाते, त्या दिशेनेच आपली ऊर्जाही जाते. चित्त जर सकारात्मक वाटेने गेले, तर ऊर्जाही सकारात्मक दिशेनेच जाणार. म्हणून प्रॉब्लेम कुठलाही असला, तरीही चित्त थाऱ्यावर ठेवणे गरजेचे आहे. हे सगळे खरे पाहता मनाला कळते, पण वळत नाही. माणूस म्हणून एक उत्तम कला देवाने आपल्याला दिली आहे. ती म्हणजे, एखाद्या गोष्टीतून बोध घ्यायची कला. आपल्या सभोवार अनेक घटना घडत असतात. बरे-वाईट प्रसंग घडत असतात. त्यातून आपण बोध घेतला, तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या बऱ्या-वाईट प्रसंगांना आपण सामोरे जाऊ शकतो. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टींतून आपण अनुभव घ्यायची प्रॅक्टिस, ही खरे तर नेट पॅ्रक्टिससारखीच असते. स्वत:च्या अनुभवातूनही शिकत नाही, तर दुसऱ्याच्या अनुभवातून कसे व काय शिकणार? तरीपण कठीण प्रसंगी आपल्या भावनिक उद्रेकाचा बळी न होता, त्यातून बाहेर येण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे हे निश्चित. बिकट प्रसंगातून सहज बाहेर पडणे कठीणच असते, पण स्वत:च्या मनाला ट्रेनिंग देऊन आपण चित्त थाऱ्यावर आणू शकतो. यासाठी प्रथम आपण आपली भावनिक ऊर्जा राखून ठेवायला शिकले पाहिजे. बिकट प्रसंगांनी हादरणारे व दुष्ट माणसामुळे परास्त झालेले लोक आपली अमूल्य ऊर्जा दुसऱ्यावर वाया घालवतात, पण त्या बिकट प्रसंगी स्वत:ला सावरले, तर आपली अमूल्य ऊर्जा आपल्यालाच उपयुक्त ठरते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपली भावनिक ऊर्जा आपण त्रासदायक वा विघ्नसंतोषी माणसांवर, दुर्दैवी घटनांवर वाया न घालवता, आपल्या भल्यासाठी वापरतो. एकूण काय, आपली ऊर्जा आपण जेव्हा विधायक परिणामासाठी वापरतो, तेव्हा जगातील वाईट प्रसंगांना आपण सक्षमपणे सामोरे जातो. फक्त गरज आहे, ती आपली मानसिक ऊर्जा जाणीवपूर्वक जतन करण्याची.
मानसिक ऊर्जेचे जतन करू या!
By admin | Updated: July 10, 2016 03:47 IST