थ्री डी प्रिंटिंग ही संकल्पना आता फार अपरिचित राहिलेली नाही; मात्र तरीही शुक्रवारी चीनमधून आलेली बातमी तोंडात बोटं घालायला लावणारीच म्हटली पाहिजे. चीनमधील हुनान प्रांतातील एका इस्पितळात, हान हान नामक तीन वर्षीय बालिकेला थ्रीडी प्रिंटरद्वारा छापण्यात आलेली कवटी बसविण्यात आली. जन्मत:च एका अत्यंत दुर्मीळ आजाराने ग्रस्त असलेल्या हान हानला या प्रयोगामुळे जीवदानच मिळाले आहे. थ्रीडी प्रिंटिंगचा शोध लागला नसता तर हान हानचे जगणे अशक्यप्रायच होते. जगभरातील पुराणांमध्ये एखाद्या मरणासन्न व्यक्तीला चमत्कारामुळे जीवदान मिळाल्याच्या अनेक कथा आहेत. थ्रीडी प्रिंटरने तसा चमत्कार प्रत्यक्षात घडवून दाखविला आहे. या तंत्रज्ञानात असे अनेक अफाट चमत्कार घडवून आणण्याची क्षमता आहे. सर्वसामान्यांना अद्याप थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या क्षमतांचा पुरता अदमासच आलेला नाही; पण भविष्याचा वेध घेण्यात माहीर असलेल्या ‘फ्युचरिस्ट’ मंडळीच्या मते, या तंत्रज्ञानामध्ये अफाट क्षमता आहे. आज अगदी अशक्यप्राय वाटणारी गोष्ट हे तंत्रज्ञान चुटकीसरशी शक्य करून दाखवू शकते. ‘फ्युचरिस्ट’ मंडळीच्या मते, आजपासून ५० ते ७५ वर्षांनी, आपली आताची जीवन-पद्धती प्रचंड जुनाट वाटू लागेल, एवढा बदल हे तंत्रज्ञान घडवून आणणार आहे. सध्याच्या घडीला एखादी व्यक्ती एकशे दहा वर्षे वगैरे जगल्यास तो जगभरातील वृत्तपत्रांसाठी बातमीचा विषय ठरतो; मात्र थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाद्वारा तयार केल्या जाणाऱ्या कृत्रिम अवयवांमुळे लवकरच ती अतिशय सामान्य गोष्ट होणार आहे. थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाद्वारा त्वचा व मूत्रपिंड छापणे सुरूही झाले आहे. एवढेच नव्हे तर स्पंदित होणाऱ्या मानवी हृदयाची हुबेहुब नक्कल साकारण्यातही या तंत्रज्ञानाला यश आले आहे. काही दिवसांपूर्वीच थ्रीडी प्रिंटरद्वारा चक्क एक कार छापण्यात आली. ही कार रस्त्यावर धावतेदेखील! त्यामुळे लवकरच अवजड कारखाने ही भूतकाळातील गोष्ट होईल, असा आशावाद प्रकट केला जाऊ लागला आहे. काही ‘फ्युचरिस्ट’ तर असे म्हणतात, की या तंत्रज्ञानामुळे बांधकाम व कृषी या दोन्ही क्षेत्रांचे मरण जवळ आले आहे. थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाद्वारा घरांची निर्मिती सुरू झाली आहे आणि काही खाद्यपदार्थ छापण्यातही यश आले आहे. थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाने मनुष्यजातीसाठी अपरिमित शक्यतांचे एक नवे दालन उघडले असले तरी, उद्याच कुणीही काहीही छापू शकेल, असे नाही. त्यासाठी अद्याप बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. शिवाय या तंत्रज्ञानाचा वापर करून खाद्यपदार्थ, मानवी अवयव तयार करण्यातील धोक्यांचाही अभ्यास करावा लागेल. असे असले तरी जग बदलणाऱ्या गोष्टींच्या यादीत थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा समावेश करावाच लागणार आहे.
अफाट क्षमतेचे ज्ञान
By admin | Updated: July 19, 2015 22:46 IST