‘शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये’ असे म्हणतात, परंतु मुंबई उच्च न्यायालयातील संग्रहालय प्रत्येकाने पाहण्यासारखे आहे. केवळ बॉलीवूडमधील चित्रपटात पाहिलेले ‘कोर्ट’ खरेच कसे दिसते. याची उत्सुकता सगळ्यांना असते. न्यायालयात न्यायव्यवस्था कशी असते? न्यायाधीशांचा पेहराव... कोर्ट रूम... आॅर्डर..आॅर्डर अशा एक ना अनेक गोष्टींचे कुतूहल उच्च न्यायालयातील संग्रहालयात शमते. उच्च न्यायालयाला २०१२ साली १५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित केलेल्या प्रदर्शनांना मोठा प्रतिसाद मिळाल्याने तेथे कायमस्वरूपी संग्रहालय सुरू करण्यासाठी धडपड सुरू झाली. मुंबई उच्च न्यायालयातील दस्तऐवज आणि सर्व जुन्या वस्तू संग्रहालयासाठी देण्याची जबाबदारी अॅड. राजन जयकर यांनी सांभाळली आहे. उच्च न्यायालयाच्या स्थापनेपासून एकविसाव्या शतकापर्यंतची स्थित्यंतरे या संग्रहालयात पाहायला मिळतात. १८६२ सालच्या उच्च न्यायालयाच्या स्थापनेपूर्वी मुंबईत फोर्ट मार्केटजवळ मेयर कोर्ट, रेकॉर्ड्स कोर्ट आणि सुप्रीम कोर्ट होते. उच्च न्यायालयाच्या स्थापनेनंतर १८७८ मध्ये स्वतंत्र इमारत उभारण्यात आली. या इमारतीची शैली इंग्लिश-गॉथिक स्थापत्यशैलीचे वैशिष्ट्य आहे. उच्च न्यायालयाच्या तळमजल्यावर १७ नंबरच्या कोर्ट रूममध्ये हे संग्रहालय आहे. या छोटेखानी संग्रहालयात, मोहनदास करमचंद गांधी यांना १८९१ मध्ये देण्यात आलेले बॅरिस्टर सर्टिफिकेट, महम्मद अली जीना यांना १८९६ मध्ये देण्यात आलेले बॅरिस्टर सर्टिफिकेटही आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, के. एम. मुन्शी, भारताचे पहिले सरन्यायाधीश एम. सी. छागला यांची बॅरिस्टर सर्टिफिकेटही या संग्रहालयाची शोभा वाढवितात. मेणबत्त्यांचे जुने स्टॅन्ड, शाईच्या दौती, पेपरवेट आणि न्यायव्यवस्थेशी संबंधित त्या काळातल्या वस्तू आहेत. पूर्वीची न्यायालयीन पद्धत, त्याचे साहित्य, दाखले, टाइपरायटर, वकील आणि न्यायाधीशांचे बदलते पेहराव, मेयर्स-रेकॉर्ड्स आणि सुप्रीम कोर्टाचे मूळचे दस्तऐवज, वकिलांचे अर्ज, ब्रिटिशकालीन वस्तूही येथे आहेत. न्यायालयीन ऐतिहासिक पर्वणीसोबतच जुन्या मुंबईची सफरही या ठिकाणी करता येते. अॅड. जयकर यांनी स्वत:च्या संग्रहातील दुर्मीळ आणि जुन्या मुंबईच्या कृष्णधवल छायाचित्रांचा समावेशही केला आहे. त्यात मुंबईतील ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रे आहेत. या संग्रहालयाचे उद्घाटन फेब्रुवारी २०१५ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी हे संग्रहालय ‘डिजिटल’ स्वरूपात करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत.या संग्रहालयाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यात एक प्रातिनिधिक कोर्ट रूम तयार केली आहे. जुने ब्रिटिशकालीन फर्निचर आणि कोर्टातील विविध साहित्यांचा यासाठी वापर केला आहे. मुंबई किल्ला जमीनदोस्त करताना सापडलेली त्या वेळची जुनी तोफही येथे पाहायला मिळते. एकोणिसाव्या शतकात विजेचा वापर नसताना न्यायालयाचे कामकाज कसे चालत असे, याची रेखाटनेही आहेत. या काळात न्यायालयात न्यायाधीशासाठी वापरण्यात येणारे कापडी पंखे, त्याचा वापर कसा केला जात असे याबद्दलच्या रेखाटनांचाही संग्रहालयात समावेश आहे. न्यायाधीशांच्या भव्य तैलचित्रांच्या लहान स्वरूपातील प्रती, जुन्या काळातील वकिलांच्या नोंदणीचे दस्तऐवज, न्यायाधीशांची जुनी खुर्ची, काचेच्या हंड्यांचे दिवे, गॅसवर चालणारे दिवे, शाईचे दौत आणि मोरपिसी पेन अशा सर्वच वस्तू या ठिकाणी पाहता येतात. स्नेहा मोरे
न्यायिक इतिहासाचा ठेवा!
By admin | Updated: March 28, 2015 23:59 IST