नाशिकक्षेत्री, गोदातटी सिंहस्थ कुंभमेळा आता सजू लागला आहे. दुर्वासाशी नाळ जोडणारे हळूहळू डेरेदाखल होत आहेत. त्यांच्या हातातील कमंडलुमध्ये मंतरलेले जल असते आणि वाणीत तपाचरणाने प्राप्त केलेले सामर्थ्य असते तर एव्हाना आणि केवळ आवंदाच्याच पर्वपूर्वकाळात किमान एकवीस वेळा सारी रामभूमी खांडववनात रुपांतरित झाली असती आणि भूमी नि:मंत्री, नि:खासदार आणि नि:आमदार झाली असती. पण तसे काही आजवर होऊ शकलेले नाही. परंतु तितकेच कशाला, हिन्दु धर्मातील या परमआदरणीय महानुभावांच्या वाणीत तेज असते तर त्यांनी परस्परांप्रती उच्चारण केलेल्या शापवाण्यांनी कदाचित समस्त साधुसमाजही निजधामी गेला असता. पण तसेही काही झालेले नाही. होण्याची सुतराम शक्यताही नाही. याचा अर्थ शापवाण्या थांबतील असे नव्हे. त्यांचे उच्चारण तर मुख्यमंत्र्यांच्या पुढ्यातही होऊन गेले. जो समक्ष समोर उभा आहे तो नामधारी का होईना देवांचा राजा म्हणजे देवेन्द्र आहे, याचेदेखील भान राखले गेले नाही. रामकुंडाच्या सान्निध्यात आणि त्याच्या साक्षीने जो स्वत:स ज्ञानाचा दास म्हणवून घेतो त्याने प्रत्यक्षात तो कसा तामसी वृत्तीचा दास आहे, हे दाखवून देताना एका कथित साध्वीला जे वाकताडन केले त्यातून हा स्वत:स ज्ञानाचा दास म्हणविणारा कसा अज्ञानी तर आहेच, शिवाय त्याच्यापाशी साधा शिष्टाचार आणि स्त्रीदाक्षिण्य यांचाही कसा लोप आहे, हेच दिसून आले. तसे नसते तर,यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:।यत्रैनास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया।।या सुभाषिताप्रमाणे आपण ज्या इष्टदेवतांच्या स्नानासाठी गोदातटी जमलो आहोत, त्या इष्टदेवता त्याक्षणी तिथून अंतर्धान पावू शकतात, हे त्याच्या ध्यानी आले असते. पण हा अपवाद नव्हे. तो नियम आहे. संपूर्ण पर्वकाळात त्याचा पदोपदी अनुभव येणार आहे. भावभोळे आणि अज्ञ लोक ज्यांना सर्वसंगपरित्यागी म्हणून केवळ ओळखतातच असे नव्हे, तर त्यांना भक्तिभावाने पूजतातदेखील, त्यांचा ऐशोआराम, त्यांचा विलास, त्यांचे राहणीमान, त्यांच्या पायाशी लोळण घेणाऱ्या धनधान्याच्या आणि द्रव्याच्या राशी, त्यांच्या आखाड्यांमधून सांडले जाणारे शुद्ध धृत असे सारे डोळे दिपवून टाकणारे ऐश्वर्य बघितल्यानंतर त्यांच्या मनात जळो जीणे सामान्य गृहस्थाश्रमीचे, असा विचार आला आणि त्यांनीही सांप्रतच्या काळातील सर्वाधिक यशस्वी आणि फलदायी अशा अध्यात्ममार्गाचा स्वीकार करण्याचा विचार केला, तर त्यांना का बरे बोल लावावा? लावूच नये. आणि मग साहजिकच शंकरसूत बबन यांना तरी तो का लावावा? बबनराव तसे प्रथमपासूनच भक्तिमार्गी असले पाहिजेत. कुसुमाग्रजांनी, ज्या न्यायाने प्रेम कोणावरही करावे, असे सांगून ठेवले तसेच मग भक्ती कोणावरही करावी हे ओघानेच येते. परिणामी बबनरावांनी त्यांच्या हाती जे लागले किंवा त्यांच्या पुढ्यात जे आले, त्याची भक्ती केली. जो अशी मनोभावे भक्ती करतो, तोच मग त्या भक्तीद्वारे प्राप्त होणाऱ्या फळाचाही सिद्ध अधिकारी असतो. इष्टदेवेतेचे प्रात:काळपासून तिन्ही सांजेपर्यंत स्तवन हा बालके बबनचा नित्यनियम. तिन्ही सांजेनंतरच्या इष्टदेवता वेगळ्या! स्वाभाविकच ज्या इष्टदेवतेची बबन मनोभावे आणि सकारात्मक व उत्पादक पूजा बांधीत आला, त्या इष्टदेवतेनेही मग या परम भक्ताला सहस्त्र हस्ते व भरभरुन आशीर्वाद दिले, व शंकरसुताने ते ग्रहणही केले. एकदा एका प्रसंगी ही इष्टदेवता हातातून निसटून जाण्याचा बाका प्रसंग आला. प्रसंग कसला, कटच तो. पण बबनरावाचे भक्तिसामर्थ्यच इतके थोर की हा कट लीलया उधळून लावला गेला. या परमभक्तीचे अधिक गोमटे फळही मग यथावकाश पदरात पडले. पुढे मग बरेच बरे होत गेले. इतक्यात अण्णा नावाच्या एका भणंगाने बिचाऱ्या बबनच्या राजमार्गात हजारो कंटक पेरुन ठेवले. भक्ती कुंठित झाली वा करावी लागली. तेव्हांच बहुधा शंकरसुताने मनोमनी निर्धार केला असावा की, आता इनफ ईज इनफ, वेगळ्या आणि अधिक फळ देणाऱ्या व कोणाच्याही नजरेत न येणाऱ्या आणि येऊनही कोणी काहीही करु न शकणाऱ्या भक्तिमार्गाचा स्वीकार करण्याशिवाय गत्यंतर नाही. तसे दाखले तर जागोजागी विखुरलेले. मग काय पुत्र बबन यांनी एक गुरु वा बाबा गाठला. ‘गुरुबिन कौन दिखाये बाट’? या बाबाच्या नावावरुन तो हिमालयस्थित असावा असे कोणालाही वाटेल. पण तसे नव्हते. बाबाचे आध्यात्मिक बळच इतके अचाट की तो जाईल तिथे हिमालयच म्हणे अवतरत असे. आता याच बाबाच्या नावाने कुंभग्रामात अवघे दहा कोटी सांडून एक भव्य आश्रम उभारला गेला आहे. तिथे एका प्रचंड वातीची तजवीज केली गेली आहे. वात म्हटली की तेल आलेच. खंडीभर तेलात ही वात तेवणार आणि ‘दिवा जळू दे सारी रात’, नव्हे तर १०८ रात, अशी सिद्धता केली गेली. पण हे सारे कशासाठी? निष्काम कर्मयोगाला आता कुणी पुसत नाही. कर्मयोग कसा सकामच हवा. बालके शंकरसुताचा हा कर्मयोग तसाच आहे. अशा कर्माचे फळदेखील निश्चित असते. ते आता सत्वर प्राप्त होईल आणि मग त्याच साधुग्रामात एक नवा आखाडा उदयास येईल, ज्यावर सुवर्णाक्षरांनी कोरलेले असेल, ‘जगद्गुरु श्री श्री बबनगिरी महाराज १००८’!
जगद्गुरु श्री श्री बबनगिरी!
By admin | Updated: July 18, 2015 03:51 IST