- मोरेश्वर बडगे
कोकण रेल्वे मार्गावरील भीषण अपघाताने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि एकूणच सुखरूप प्रवासाचा प्रश्न पुन्हा नव्याने ऐरणीवर आला आहे. दिवा-सावंतवाडी पॅसेंजरचे इंजिनसह चार डबे रुळावरून घसरल्याने १९ प्रवासी मृत्युमुखी पडले आणि १५० पेक्षा जास्त जखमी झाले. तुटलेला रूळ हे अपघाताचे कारण सांगितले जात आहे. काही जणांच्या मते, वळणावर चालकाने करकचून ब्रेक दाबल्याने पॅसेंजर घसरली. अपघाताच्या चौकशीत नेमके कारण समजेल. पण, या अपघाताने उपस्थित केलेले प्रश्न कोण सोडवणार ? कोकण रेल्वे मार्गावरचा हा पहिला अपघात नव्हे. या आधीही झालेल्या अपघातांमध्ये लाख मोलाचे जीव गेले आहेत. पावसाळ्यात दरड कोसळणे, जमीन खचणे, रुळांना तडे जाणे नेहमीचे झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानात यावरही उपाय आहेत; पण ती इच्छाशक्ती कोणी दाखवायची? अपघात झाला की रेल्वेचे अधिकारी मृताच्या वारसांना प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर करून मोकळे होतात. माणसाच्या जिवाची किंमत फक्त दोन लाख रूपये? घरचा कर्ताकमावता माणूस गेला तर सारे घर कोसळते; पण इथे दोन लाख रुपये मोजून रेल्वेखाते हात झटकू पाहते. माणूस एवढा स्वस्त कधीपासून झाला? सामान्य माणसे प्रवास करतात म्हणून जमेल तशी रेल्वे चालवण्याचे लायसन्स रेल्वेला मिळालेले नाही. रेल्वेचा दुसरा फंडा म्हणजे, अपघाताची चौकशी जाहीर केली जाते. चौकशीचे पुढे काय होते?, चौकशीत आढळलेल्या कारणांची पुनरावृती होऊ नये यासाठी काय उपाय योजिले जातात? जनतेला हे समजले पाहिजे. दर वर्षी रेल्वेचा अर्थसंकल्प सादर केला जातो. सुरक्षिततेसाठी केलेल्या तरतुदीची घोषणा केली जाते. तरीही अपघात वाढतच आहेत. मग अर्थसंकल्पाचा पैसा जिरतो कुठे? प्रश्न एका कोकण रेल्वेचा नाही. रेल्वेचे जाळे देशभर पसरले आहे. ६४ हजार किलोमीटर लांबीचे नुसते रूळमार्ग आहेत. दररोज सुमारे दोन कोटी माणसे रेल्वेतून प्रवास करतात. हे सारे सुरळीत चाालायचे असेल, तर सुरक्षित प्रवासाला रेल्वेने सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. पण हे होत नाही. हे खातेच मुळी सर्वांत दुर्लक्षित आहे. राजकीय सोय लावायची म्हणून कुणालाही रेल्वेमंत्रिपदी बसवले जाते. हे बंद झाले पाहिजे. रेल्वेचा अभ्यास आहे, दूरदृष्टी आहे अशाच नेत्याच्या हातात रेल्वे दिली पाहिजे. त्यातून रेल्वेच्या कारभारात थोडी शिस्त येईल. राजकीय दबावामुळे दर वर्षी नवनव्या गाड्या सुरू केल्या जातात. हा प्रकार थांबवला पाहिजे. वाढत्या ताण-तणावांमुळे रेल्वेची दमछाक सुरू आहे. गाड्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मार्ग तेवढेच आहेत. ते किती तग धरणार? अशा परिस्थितीतही रेल्वे धावते हा दैवी चमत्कारच म्हटला पाहिजे. तुम्हाला धक्का बसेल. सुरक्षेची काळजी घेणार्या कर्मचार्यांच्या सुमारे लाखभर जागा रिकाम्या आहेत. पायी चालून रूळ तपासणार्या खलाशांच्या काही हजार जागा काटकसरीच्या नावाखाली भरल्या जात नाहीत. सुट्या भागांची कमतरता ही नेहमीची ओरड आहे. कार्यक्षम कर्मचार्यांची वानवा असल्याने नुसते दिवस ढकलणे सुरू आहे. गेल्या वर्षभरात देशात रेल्वे अपघातात १५ हजार लोक मारले गेले. दररोज कुठेना कुठे काहीना काही होत असते. कोकण अपघाताची शाई वाळण्याआधीच मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेसच्या चार डब्यांतील शौचकूपांतून धूर निघू लागला. गाडी प्लॅटफॉर्मवर उभी असल्याने धावपळ करून मोठा अनर्थ टाळला. प्रश्न हा आहे की, रेल्वेचे स्वत:चे सुरक्षा दल आहे. या दलाची माणसे काय करतात? कुठलीही दुर्घटना सांगून होत नाही. म्हणून सुखरूप प्रवास हे एकमेव टार्गेट डोळ्यांपुढे ठेवून त्या दृष्टीने रेल्वेने उपाय योजले पाहिजेत. या अपघाताने रेल्वे एवढी शिकली तरी खूप झाले असे म्हणता येईल. कारण, रेल्वेवर सध्या दुहेरी जबाबादारी आहे. गाड्या सुरक्षित तर चालवायच्याच आहेत; पण ते करताना घातपाती लोकांवरही लक्ष ठेवायचे आहे. समाजकंटकांनी चालवलेल्या घातपाती कारवाया रोखण्यासाठीही डोळ्यांत तेल घालून चालण्याची आवश्यकता आहे. गेल्या आठवड्यात चेन्नई रेल्वेस्थानकावर एक्स्प्रेसमध्ये बॉम्बस्फोट होऊन एका तरुणीचा जीव गेला व अनेक जखमी झाले. अतिरेक्यांचा धोका वाढणार असल्याने सुरक्षिततेचे जाळे भक्कम करताना, रेल्वेची यंत्रणाही फूलप्रूफच असली पाहिजे.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)