विजयराज बोधनकरही गोष्ट आहे दोन उपवर मुलींची. दोघी शिकलेल्या. एकीचं नाव रिटा, दुसरीचं मंगला. दोघींचे आईवडील जुन्या मतांचे, रूढी पाळणारे, श्रद्धाळू, समाजमताच्या ढिगाऱ्याखाली दडपलेले. मुलामुलींनी कसं रहावं याची गणितं मांडणारे. अशा वातावरणात रिटा आणि मंगला वाढत राहिल्या. रिटा बंडखोर तर मंगला दबून जगणारी. लग्नाची वेळ आली तेव्हा ंंंमंगलाच्या आईवडिलांनी समाजातला मुलगा शोधणं चालू केलं. मंगलाला माहिती होतं की आपल्या समाजात चांगली मुलं नाहीत. तरीही आईबाबा आपल्याला कुणाच्याही गळ्यात बांधून देतील. कारण तिच्या दोन बहिणींची लग्ने अशीच लावून त्यांच्या आयुष्याचं कुंपण करून टाकलं होतं.रिटा बुद्धीचा वापर करणारी. तिच्या जेव्हा लक्षात आलं की, आईवडिलांच्याच पसंतीच्या मुलासोबत आपलं लग्न लावून देणार आहेत, तशी ती जागृत झाली. यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागली. तिच्याच शहरात एक महिला जागृती मंच होता. ती तिथं गेली, मंचाच्या मुख्य अधिकाऱ्यांना भेटली. आजच्या आधुनिक काळात मुलामुलीची इच्छा नसताना केवळ समाजाच्या भीतीपोटी कुणा अनोळखी व्यक्तीच्या गळ्यात बांधले जात असेल तर मग आमच्या शिक्षणाचा काय उपयोग, असा थेट प्रश्न तिने केला. मंचाच्या अध्यक्षांनी विचारले, आम्ही काय करावे असे तुला वाटते? त्यावर रिटा म्हणाली, तुमच्या मंचातर्फे एक परिसंवाद आयोजित करा व तरुण मुलामुलींना, पालकांना व समाजाला आमंत्रित करा. त्याचा प्रचार मी करते ! रिटाचे म्हणणे आयोजकांना पटले. परिसंवाद आयोजित केला गेला. ठरल्या दिवशी रिटाच्या आईवडिलांनाही बोलावले. त्यात रिटाने स्वत: भाग घेतला. अनेक मुलामुलींना व पालकांना बोलतं केलं. यातून एकच सूर उमटला तो म्हणजे स्वत:चा जोडीदार स्वत:ला निवडण्याचा हक्क आहे आणि तो हक्क आईवडिलांकडून व समाजाकडून त्यांना देण्यात यावा. जो युवक किंंवा युवती उच्च शिक्षणाने, जाणिवेने किंंवा उच्च विचाराने प्रभावित असेल त्याच्याशीच स्व-खुशीने लग्न झाले पाहिजे. या परिसंवादाने परिसरात चर्चा झाली. मत आणि मनपरिवर्तन झालं. रिटाने आपला मनपसंत जोडीदार निवडूनही काढला. पण मंगलाच्या आईवडिलांनी मात्र जातीतल्याच एका सामान्य मुलाशी लग्न लावून मंगलाच्या स्वप्नाचा बळी घेतला. मंगलाला बुद्धिवादी बंडखोर बनता आलं नाही. म्हणूनच रिटा भगवान कृष्णाची क्रांतिकारी गीता ठरली. तर मंगला मात्र दुर्बल वनवासी सीता ठरली. जेव्हा बंडखोरीची वेळ येते तेव्हा प्रत्येकाने ती करावी. त्यालाच म्हणतात क्र्रांतीचं उचललेलं पाऊल.
ही गीता ती सीता
By admin | Updated: April 11, 2015 00:41 IST