- प्रसाद ताम्हनकरनाइट व्हिजन स्मार्टफोन...विविध देशांच्या लष्करात उपयोगी पडणारे आणि वापरले जाणारे सुरक्षा तंत्रज्ञान आता स्मार्टफोन्समध्येदेखील यायला सुरुवात झाली आहे. ‘नाइट व्हिजन’ ह्या तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या दुर्बिणी, कॅमेरा, गॉगल्स यांचा सररास वापर लष्करात केला जातो. आता हेच नाइट व्हिजन तंत्रज्ञान चक्क स्मार्टफोनमध्ये अवतरले आहे. डेन्मार्कच्या ल्युमिगॉन या कंपनीने आपल्या नव्या ‘ल्युमिगॉन-३’ ह्या स्मार्टफोनमध्ये हे तंत्रज्ञान सादर केले आहे. यात दोन इन्फ्रारेड फ्लॅश लाइटसह ४ मेगापिक्सलचा नाइट व्हिजन कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या मदतीने अगदी गडद अंधारात अतिशय स्पष्ट असे फोटो मिळवणे शक्य आहे. याच्या मदतीने ४-के फॉर्मेटचे व्हिडीओ चित्रीकरण करणे सहजसाध्य होणार आहे. या कॅमेऱ्याच्या जोडीलाच आॅटो फोकस आणि फेज डिटेक्शन फीचर्सने सुसज्ज असा १६ मेगापिक्सलचा एक मुख्य कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरादेखील उपलब्ध करण्यात आलेला आहे. ह्याच्या बेसिक एडिशनची किंमत ९२५ डॉलर्स (साधारण ६२,०००/-) तर गोल्ड एडिशनची किंमत १२०० डॉलर्स (साधारण ८१,०००/-) रुपये आहे. इनबिल्ट १२८ जीबी स्टोरेज, दणकट गोरीला ग्लास, ३ जीबी रॅम आणि मरिन ग्रेड-३१६ दर्जाची स्टेनलेस बॉडी ही त्याची इतर वैशिष्ट्ये आहेत.
बीएसएनएल ‘फ्री टू होम’ ...दूरसंचार क्षेत्रात विविध कंपन्यांशी स्पर्धा करत असलेल्या बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी ‘फ्री टू होम’ ही आकर्षक सेवा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेमध्ये बीएसएनएलचे मोबाइल ग्राहक, कुठलेही अतिरिक्त शुल्क न भरता आपले मोबाइल कॉल्स आपल्या लॅण्डलाइनवरती ट्रान्सफर करू शकणार आहेत, तसेच रिसीव्ह अथवा फॉरवर्ड करू शकणार आहेत. या सोयीमुळे आता कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असणाऱ्या अथवा एखाद्या मिटिंगमध्ये बिझी असलेल्या ग्राहकाला एक नवा अनोखा पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र टेलिकॉम सर्कलच्या क्षेत्राबाहेर ही सेवा वापरण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे.
झुकरबर्गला हॅकर्सचा दणका ...जगभरातील ग्राहकांना ज्याच्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपने वेड लावले त्या मार्क झुगरबर्गच्या ट्विटर आणि पिंटरेस्ट अकाउंट्सना हॅकर्सच्या प्रभावाखाली यावे लागले. ह्या बातमीने सध्या सोशल जगतात चांगलीच खळबळ माजलेली आहे. सोशल मीडियावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा जोमाने चर्चेत आलेला आहे. २०१२मध्ये अनेक लिंक्डीन अकाउंट हॅक करण्यात आली होती. त्यात एक अकाउंट झुकरबर्गचे असल्याचे सांगितले जात आहे; आणि ह्याच हॅक केलेल्या खात्याच्या मदतीने त्या हॅकरने झुकरबर्गची इतर दोन खातीदेखील हॅक केली आहेत. हॅकर व त्याच्या ग्रुपने चक्क झुकरबर्गचेच अकाउंट वापरून ट्विटदेखील केले आहे आणि झुकरबर्गला आम्हाला उत्तर दे अशी साद घातली आहे. ‘मार्क, तुझी ट्विटर, पिंटरेस्ट आणि इंस्टाग्राम खाती हॅक करणे ही आमची एक सुरक्षेसंबंधात घेतलेली चाचणी आहे, तेव्हा मार्क प्लीज आम्हाला उत्तर दे.’ असे ह्या ट्विटमध्ये म्हटले आहे.