सत्तारूढ पक्ष आणि विरोधक यांच्यातील तेढीचे खरे कारण दूर झाल्याखेरीज संसदेची वाटचाल सुरळीत होण्याची शक्यता सध्यातरी दुरावली आहे. आजच्यासारखा संसदीय गतिरोध डॉ. मनमोहनसिंग यांच्या दुसऱ्या कारकीर्दीच्या अखेरीसही उत्पन्न झाला होता आणि तेव्हाचे त्याचे कारण भाजपा व रालोआची अडवणूक हे होते. आजचे त्याचे कारण काँग्रेस व विरोधी पक्ष हे आहे. विरोधकांना सुषमा स्वराज, वसुंधरा राजे आणि शिवराज सिंग चौहान यांचे राजीनामे हवे आहेत आणि त्यासाठी त्यांनी पुढे केलेल्या कारणांचे जोरकस असणे नाकारण्याजोगे नाही. सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे या दोघी त्यांच्या ललित मोदी या अपराधी माणसाशी असलेल्या संशयास्पद संबंधांसाठी अडचणीत आल्या आहेत. ललित मोदी हा इंडियन प्रीमियर लीगमधील घोटाळ्यासाठी व कोट्यवधींच्या सट्टेबाजीसाठी आरोपी ठरला असून त्याने देशातून पळ काढून इंग्लंडचा आश्रय घेतला आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक अन्वेषण विभागाने त्याच्याविरुद्ध अजमानती वॉरंट जारी केले असून त्याला त्याने वाकुल्या दाखविल्या आहेत. त्याच्या फरार असण्याच्या काळात सुषमा स्वराज यांनी ‘केवळ मानवतावादी कारणांसाठी’ मेहरबान होऊन त्याला इंग्लंडमधून अन्य देशांत जाण्यासाठी आवश्यक ती परवानगी दिली आहे. तसे आदेशही त्यांनी इंग्लंडमधील भारतीय दूतावासाला दिले आहेत. सुषमाबार्इंचे यजमान अॅड. स्वराज कौशल हे या मोदीचे वकील असणे हा त्यांच्या संबंधांचा आणखी एक पुरावा आहे. तिकडे वसुंधरा राजे यांनी ललित मोदीशी आपले खासगी संबंध असल्याचे मान्य केले आहे, तर त्यांच्या दुष्यंत या खासदार चिरंजीवाच्या व्यवहारात मोदीने कोट्यवधी रुपये गुंतविले असल्याचे उघड झाले आहे. शिवराज सिंग चौहानांचा अपराध याहून मोठा व ‘व्यापमं’ म्हणून ओळखला जाणारा व्यापक आहे. त्यांच्या कारकीर्दीत मध्य प्रदेशात झालेल्या शासकीय प्रवेशाच्या पदवी परीक्षांमध्ये सतत ११ वर्षे भ्रष्टाचार होत राहिला आणि त्यात राज्याच्या राज्यपालांपासून मंत्रिमंडळातील अनेक जण गुंतले असल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढे गंभीर आरोप असणारी माणसे केंद्र व राज्य सरकारात महत्त्वाची पदे घेऊन बसली असताना विरोधी पक्ष गप्प राहणार नाही हे उघड आहे. त्याचमुळे त्यांनी या तिघांच्या हकालपट्टीसाठी संसद रोखून धरली आहे. याउलट सरकार पक्षाची म्हणजे भाजपाची स्थिती अवघड व राजकीय आहे. नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदावर येऊन जेमतेम एक वर्षाचा काळ पूर्ण झाला आहे. अशावेळी त्यांच्या तीन सहकाऱ्यांना त्यांच्यावरील आरोपांमुळे जावे लागले तर तो त्यांच्या नेतृत्वावर ठपका ठेवणारा व त्यांचा पक्ष दुबळा बनविणारा प्रकार ठरणार आहे. शिवाय बिहारच्या निवडणुका समोर असताना सरकारने विरोधकांपुढे नमते घेतलेले दिसणेही भाजपाला परवडणारे नाही. तात्पर्य, सध्याच्या तेढीचे खरे स्वरूप असे राजकीय आहे आणि त्याची सोडवणूक सांसदीय बैठकांमधून होणारी नाही. लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलविलेल्या आजवरच्या सर्वपक्षीय बैठकी याचमुळे असफल झाल्या आहेत. गुरुवारची बैठकही त्याचमुळे अयशस्वी ठरली आहे. खरेतर अशा बैठकी खुद्द पंतप्रधानांनीही बोलवून पाहिल्या. परंतु राजकीय मुद्दे समोर असताना व सगळे विरोधी पक्ष त्यासाठी संघटित झाले असताना अशी तडजोड निघणे अशक्य आहे. त्याचमुळे या गतिरोधातून मार्ग काढायचा तर तो देवाणघेवाणीच्या पद्धतीनेच काढावा लागणार आहे आणि देवाणघेवाणीच्या कोणत्याही प्रयत्नात ‘मोठ्या’ पक्षालाच काही सोडावे लागते ही काळाची शिकवण आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यात संघर्षाचा आणखीही एक प्रश्न अडकला आहे. सरकारने आणलेले जमीन अधिग्रहण विधेयक शेतकरीविरोधी असल्याचा विरोधकांचा आरोप आहे आणि त्यांच्या म्हणण्यात तथ्यही आहे. हे विधेयक भूमिधारकांना भूमिहीन बनविणारे व त्यांच्या जमिनी बड्या उद्योगपतींसाठी सरकारच ताब्यात घेणार असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. विरोधकांच्या या आरोपाला समर्पक उत्तर देणे सरकारला अजून जमले नाही. परिणामी अध्यादेशांची संजीवनी देऊन हे विधेयक जिवंत ठेवण्याचा सरकारचा आटापिटा सुरू आहे. सरकार पक्ष व विरोधक यांच्या प्रकृतीधर्मातच विरोध असणे हे आणखीही मोठे व सर्वस्पर्शी कारण आहे. मात्र जनतेने सरकार निवडले असल्याने त्याविषयी आत्ताच काही बोलण्याचे कारण विरोधकांना उरले नाही हे वास्तव आहे. मात्र वादाचे जे दोन मुद्दे संसदेत लढविले जात आहेत ते जोवर निकालात निघत नाहीत वा त्यावर राजकीय मात करण्याचा उपाय सरकारला सापडत नाही तोवर आताचा गतिरोध कायम राहील अशीच आजची चिन्हे आहेत. देशाच्या इतिहासात हा प्रसंग दुसऱ्यांदा आला आहे आणि तसे प्रसंग येऊ नयेत यासाठी परतता न येणाऱ्या ठिकाणावर कोणत्याही पक्षाने पोहचू नये हाच खरा मार्ग आहे. पण आम्ही तुमचे काहीएक ऐकून घेणार नाही अशी भूमिका दोन्ही पक्ष घेत असतील तर आज जे घडत आहे तेच यापुढेही घडत राहणार आहे. यात राजकीय शहाणपण नाही व देवाणघेवाणीखेरीज त्यावर उपाय नाही. नाहीतर ‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी’ असा आताचाच प्रकार यापुढेही देशाला पहावा लागणार आहे.
आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी...
By admin | Updated: August 1, 2015 02:41 IST