डॉ. रामचंद्र देखणे
सामान्य माणूस लौकिक जीवन जगत असतो. असामान्य माणूस अलौकिक जीवन जगत असतो. पण असामान्य असूनही जो सामान्यांसारखेच जीवन जगतो तो मात्र लौकिकात राहूनही पारलौकिकाची अनुभूती देत असतो आणि घेत असतो, मानवी जीवनातील हे उत्तुंग पारलौकिकत्व म्हणजे संत. ज्ञानदेव म्हणतात...ते परब्रह्मचि मनुष्यरूपे।ओळख तू।।ते मनुष्यरूपातील परब्रह्मच आहे तर तुकोबाराय म्हणतात, ‘तुका म्हणे सांगो किती।तोचि भगवंताची मूर्ती।’संत हीच भगवंताची सगुण मूर्ती आहे. अशा संतांवर माझा दृढ विश्वास आहे. कारण माझे सर्वस्वी कल्याण तेच करणार आहेत याची मला पूर्ण खात्री आहे. तुकोबारायांच्या संतपर प्रकरणातील एक अभंग वारकऱ्यांच्या परिपाठातला आहे.संतांचिया पाया हा माझा विश्वास।सर्व भावे दास झालो त्यांचा।संतांवरील या विश्वासामुळे मी त्यांचा सर्वभावे दास झालो आहे. मानवी भाव जीवनाच्या उत्तुंगतेच्या मंदिराचा ‘विश्वास’ हा पाया असतो तर भक्ती हा कळस. दृढतेचे चार टप्पे आहेत. पहिला विश्वास, मग निष्ठा. त्यानंतर श्रद्धा आणि नंतर भक्ती. या चारही अवस्था एकमेकांशी जोडल्या आहेत. विश्वास दृढ झाला की, निष्ठा येते. निष्ठा दृढ झाली की श्रद्धा. श्रद्धा दृढ झाली की भक्ती आणि भक्तीही दृढ झाली की आत्मनिष्ठा किंवा समर्पिता. या समर्पिता अवस्थेत तो परमेश्वराशी इतका दृढ होतो की, स्वत:लाही विसरतो. गोकुळात वावरणाऱ्या गौळणी मथुरेच्या बाजाराला निघाल्या. डोक्यावर दुधाचे माठ घेतले. पण मनात कृष्ण, डोळ्यात कृष्ण, वाणीत कृष्ण, सारे कृष्णमय झालेले. डोक्यावरच्या माठात दहीदूध आहे हे विसरल्या आणि म्हणू लागल्या, ‘‘दुडीवर दुडी गौळणी साते निघाली।गौळण गोरस म्हणो विसरली।गोविंदु घ्या कोणी दामोदर घ्या रे।।गोविंद घ्या, गोपाळ घ्या, दामोदर घ्या.’’स्वत:ला विसरण्यात खूप आनंद आहे, पण परमात्म्याच्या ठायी स्वत:ला विसरण्यात परमानंद आहे. ही समर्पिता केवढी उच्च पातळीवरची म्हणावी? प्रसिद्ध शहनाईवादक भारतरत्न पंडित बिस्मिल्ला खाँ यांच्या शहनाईने संगीत विश्वात नादब्रह्म अवतरले. तुमच्या शहनाईतून इतके सुंदर स्वर कसे बाहेर पडतात, असे त्यांना एकदा विचारले. पंडित बिस्मिल्ला खाँ हे वाराणशीचे. दररोज काशी विश्वेश्वराच्या मंदिरात शहनाईवादन करायचे. त्यांनी उत्तर दिले, ‘शहनाई बजाते बजाते एक दिन मुझे ऐसी अनुभूती मिली की बाबाजीने (विश्वनाथाने) मेरे शहनाईमें फुँक दी है। काशी विश्वनाथावर केवढी मोठी श्रद्धा. त्या श्रद्धेच्या बळावर माणूस लौकिकातून अलौकिकात जातो. ही डोळस श्रद्धा मानवी जीवनातील दृढतेचा पाया भक्कम करते आणि या मानवी जीवनात भक्ती सौंदर्याचे मंदिर उभे राहते.