शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
3
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
4
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
5
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
6
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
7
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
8
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
9
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
10
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
11
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
12
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
13
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
14
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
15
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
16
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
17
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
18
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
19
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
20
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय

‘डिजिटल’ आणि ‘रिअल’

By admin | Updated: July 3, 2015 04:15 IST

‘डिजिटल डिव्हाइड’ हटवण्याचे आव्हान आज अनेक विकसनशील देशांच्या पुढे आहे. भारतही त्याला अपवाद नाही. या आव्हानाच्या जोडीनेच आपल्या देशातील धोरणकर्त्यांना भेडसावणारे

‘डिजिटल डिव्हाइड’ हटवण्याचे आव्हान आज अनेक विकसनशील देशांच्या पुढे आहे. भारतही त्याला अपवाद नाही. या आव्हानाच्या जोडीनेच आपल्या देशातील धोरणकर्त्यांना भेडसावणारे तितकेच गंभीर असे दुसरे आव्हान म्हणजे ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’चे. आपण ‘डिजिटल’ साक्षर नसल्याची बोच प्रौढ वयस्करांच्या तुलनेत तरुणाईला अधिक जाणवते. मोठा गाजावाजा करत प्रारंभ झालेल्या ‘डिजिटल इंडिया’ अभियानाद्वारे समस्यांच्या या जोडगोळीवर काही अंशी तरी उतारा सापडावा, अशी आशा बाळगण्यास हरकत नाही. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे ऐलान दस्तुरखुद्द पंतप्रधान करत असताना देशाच्या कॉर्पोरेट विश्वातील सुमारे डझनभर दिग्गज व्यासपीठावर हजर होते, ही बाब सूचक आहे. या उपक्रमाची कार्यवाही मार्गी लागल्यानंतर येत्या काळात जवळपास साडेचार लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे संकल्प उद्योजकांच्या त्या मांदियाळीने तिथल्या तिथेच सोडावेत, ही बाबही सध्याच्या वैश्विक अर्थपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नीट समजावून घ्यायला हवी. ही गुंतवणूक जमिनीवर अवतरली की येत्या पाच-दहा वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये रोजगाराच्या जवळपास १८ लाख संधी नव्याने निर्माण होतील, हे भविष्यकथनही आजघडीच्या मलूल वातावरणात अधिकच कर्णमधुर ठरावे. हे सगळे खरोखरच वास्तवात उतरेल का, कधी उतरेल... हे व यासारखे प्रश्न व्यासपीठावर उपस्थित असलेल्यांच्याही मनात निर्माण झाले नसतीलच असे छातीठोकपणे म्हणवत नाही. मात्र, सरकारनेच कंबर कसली तर मैदानात उतरण्यास ‘डिजिटल’ विश्वाशी या ना त्या नात्याने संबंधित असलेले देशातील उभे उद्योगविश्व कमालीचे उतावीळ आणि उत्सुक आहे, याची प्रचीती या सगळ्यांवरुन पटते न पटते. त्याला कारणही तसेच आहे. ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न वास्तवात उतरण्यात दूरसंचार आणि माहिती व तंत्रज्ञान या दोन उद्योगशाखांचा सहभाग कळीचा राहील. म्हणजेच, या दोन उद्योगांना देशी बाजारपेठेमध्ये येत्या काळात व्यवसायाच्या भरीव संधी उपलब्ध होण्याच्या शक्यता ‘डिजिटल इंडिया’ने एकदम उजळून टाकलेल्या आहेत. भारतीय माहिती-तंत्रज्ञान व माहिती-तंत्रज्ञानाधारित सेवाउद्योगाचे भाग्य आजवर सततच पश्चिमी बाजारपेठांवर विसंबत आलेले आहे. २००८ साली उद्भवलेल्या मंदीपासून नेमक्या त्याच बाजारपेठांना जबर हुडहुडी भरुन कमालीचा गळाठा आलेला आहे. अगदी आजही माहिती-तंत्रज्ञान उद्योगाच्या परदेशी उलाढालीमध्ये अमेरिका आणि युरोपीय समुदायातील देशांच्या बाजारपेठांचा हिस्सा अनुक्रमे ५०-५५ टक्के आणि २५-२६ टक्के असा आहे. अशा सगळ्या वातावरणात देशी बाजारपेठेच्या आश्वस्त करणाऱ्या आधाराची असोशी या क्षेत्रातील बलदंडांना असावी, हे स्वाभाविकच ठरते. दुसरीकडे, शासनव्यवहारात ‘जनधन-आधार-मोबाइल’ या त्रिवेणीवर भर देण्याचे शासनसंस्थेनेही मनावर घेतलेले असल्याने ‘डिजिटल’चे जाळे विस्तारण्याची गरज पूर्वी नव्हती, इतकी आता सघन आणि प्रखर बनलेली आहे. त्यामुळे, हे जाळे तोलण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या निर्मिती व विस्तारामध्ये गुंतवणूक करण्यास त्या क्षेत्रातील वजनदारांनी रस दाखवावा हे ओघानेच येते. या सगळ्या उत्सवात दोन गोष्टींचा मात्र सगळ्यांनाच अंमळ विसर पडलेला दिसतो. देशव्यापक असे आणि जवळपास अडीच लाख ग्रामपंचायतींना आपल्या कोंडाळ्यात सामावून घेणारे हे ‘डिजिटल’ जाळे व्यवहारात कार्यरत बनायचे तर मुळात सगळीकडे वीज सर्वकाळ मौजुद असायला हवी ! ‘डिजिटल इंडिया’मध्ये ‘ई-गव्हर्नन्स’कडून ‘एम (मोबाइल) गव्हर्नन्स’कडे वाटचाल सुरू व्हावी, अशी अपेक्षावजा ‘व्हिजन’ पंतप्रधानांनी डोळ्यांसमोर ठेवले आहे. मोबाइल जरी बॅटरीवर चालत असला तरी ती बॅटरी चार्ज करायला वीज लागतेच. त्याचबाबतीत आपल्याकडे उजेड आहे ! खेडोपाडी जर १६ आणि १८ तास भारनियमन असणार असेल तर ‘डिजिटल इंडिया’ वास्तवात उतरावे कसे? वीजनिर्मितीच्या प्रस्थापित क्षमतेमध्ये वाढ घडवून आणण्याचे जे उद्दिष्ट आपण १२व्या पंचवार्षिक योजनेमध्ये नजरेसमोर ठेवलेले होते ते हुकलेच. दुसरे म्हणजे, हे देशव्यापक जाळे चालवायचे, कार्यरत राखायचे तर चांगले प्रशिक्षित मनुष्यबळ मुबलक प्रमाणात उपलब्ध हवे. आपल्या देशातील माहिती-तंत्रज्ञान आणि माहिती-तंत्रज्ञानाधारित उद्योगांना आजमितीला सर्वाधिक भेडसावणारे आव्हान आहे ते सक्षम, तंत्रशिक्षित, कुशल मनुष्यबळाच्या तुटवड्याचे. ‘नॅसकॉम’ने आजवर प्रकाशित केलेल्या संशोधनाधारित अनेक अहवालांमधून हे दारुण सत्य वारंवार मांडले गेलेले आहे. ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाच्या माध्यमातून येत्या पाच-दहा वर्षांत खरोखरच १८ लाख रोजगार निर्माण होणार असतील तर माहिती-तंत्रज्ञान, दूरसंचार, अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या ज्ञानशाखांचे उत्तम व दर्जेदार शिक्षण-प्रशिक्षण देणाऱ्या संस्थात्मक यंत्रणेचे अतिशय मोठ्या प्रमाणावर सक्षमीकरण घडवून आणणे अत्यावश्यक ठरते. ‘डिजिटल इंडिया’चे अवतरण या भारतभूमध्ये व्हायचे असेल तर वीज, तंत्रकुशल प्रशिक्षित मनुष्यबळ यासारख्या ‘रिअल’ बाबींचा भक्कम आधार ‘डिजिटल’ला मिळणे ही या स्वप्नाच्या यशाची पूर्वअट ठरते.