- भालचंद्र मुणगेकर(सदस्य, राज्यसभा)२७ जुलै रोजी दिवंगत रा. सु. ऊर्फ दादासाहेब गवई यांना राज्यसभेत उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी श्रद्धांजली अर्पण करीत असताना माझ्या डोळ्यासमोर आम्हा दोघांमधील सुमारे ३५ वर्षांचे ऋणानुबंध जसेच्या तसे उभे राहिले.१९६४मध्ये ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले आणि सतत सहा वेळा निवडून गेले. १९६८ ते १९७८ या काळात ते परिषदेचे उपाध्यक्ष आणि नंतर १९७८ ते १९८४ या काळात ते अध्यक्ष झाले. ते अध्यक्ष असताना, साधारणपणे १९८० साली मी वडाळ्याच्या आंबेडकर कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना त्यांची व माझी प्रथम भेट झाली. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बौद्ध समाजात प्रथमच एमबीबीएस झालेल्या शशिकांत कदम याच्या जाहीर सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून मी त्यांना निमंत्रण द्यायला गेलो. ‘‘तुम्ही डाक्तर झाल्याबद्दल सत्कार करता? आमच्या विदर्भात बौद्ध समाजात प्रत्येक घरात किमान एक तरी डाक्तर आहे’’. तोंडात पानाचा विडा घोळवत हसत-हसत ते म्हणाले. ‘‘साहेब, तोच तर फरक आहे. अवश्य येतो म्हणाले’’. राजकारणाविषयी अक्षरही न बोलता त्यांचे त्यावेळचे भाषण माझ्या आजही ध्यानात आहे.व्यक्तिगत ऋणानुबंधमाझ्यावर त्यांचे विशेष प्रेम होते, असे म्हटले तर त्यात अतिशयोक्ती होणार नाही. मी मुंबई विद्यापीठाच्या १४३ वर्षांच्या इतिहासात पहिला दलित-आंबेडकरवादी कुलगुरु झालो, नंतर योजना आयोगाचा सदस्य झालो व आता राज्यसभेचा सदस्य झालो, याविषयी त्यांना मनापासून आनंद आणि समाधान तर वाटेच; परंतु प्रत्येक पद सांभाळताना, ते मिरवण्यापेक्षा, समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी मी काम करीत असल्याचा त्यांना अभिमानही वाटे. २००६मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमच्या मुणगे या गावी आम्ही बुद्धविहार बांधले, तेव्हा केवळ माझ्यावरील प्रेमामुळे ते बिहारच्या राज्यपालपदी असताना त्याच्या उद्घाटनासाठी खास आले. सुमारे तीस मोटारींचा ताफा बघून सगळे चकीत झाले. एखाद्या संस्थानिकाला शोभेल असे क्वचितच मिळणारे राजबिंडे व्यक्तिमत्त्व असलेले दादासाहेब मित्र आणि पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यात विशेष दक्ष असत. राज्यसभेत खासदार असताना त्यांनी आपल्या घरी आग्रहाने अनेक वेळा जेवायला बोलाविले. जेवल्यानंतर किमान एक-दीड तास गप्पा होत. ते बिहारचे राज्यपाल असताना मी दोनदा राजभवनावर त्यांचा पाहुणा होतो आणि केरळमध्ये एकदा. माझे कसे चालले आहे, याची ते एकेक तासाने माहिती घेत. श्री भाटिया यांना केरळहून बिहारला यायचे असल्यामुळे दादासाहेबांना बिहारहून केरळला जावे लागले. तेव्हा खूप अस्वस्थ होते. ‘‘एकदा तर माझ्या मनात राजीनामा देण्याचा विचार आला होता,’’ असे ते मला म्हणाल्यावर ‘‘बिहार ही बुद्धाची भूमी आहे आणि तुमचे व नितीशकुमार यांचे चांगले जमते असे मला स्वत: नितीशकुमार यांनीनेच सांगितले. तरीही तुम्ही भावनेच्या भरात राजीनामा दिला नाही, हे फार चांगले झाले,’’ असे मी म्हटल्यानंतर ‘‘तुम्हाला राजकारण बरेच समजते’’, असे म्हणून ते नुसते हसले होते. ‘‘परंतु तुमच्याएवढे मुळीच नाही,’’ असे मी म्हटल्यावर ते खळखळून हसले. मी योजना आयोगात गेल्यानंतर एकाच महिन्यात अनुसूचित जाती व जमातींच्या एम.फिल. आणि पीएच. डी. करणाऱ्या २००० विद्यार्थ्यांसाठी दरमहा १५,००० रु पये देणारी अनुक्रमे दोन आणि पाच वर्षांची राजीव गांधी राष्ट्रीय फेलोशिप योजना तयार केली आणि ती २००५-०६ पासून लागू करण्याचे ठरले. योजना आयोगाचे उपाध्यक्ष मोन्टेकसिंग अहलुवालिया आणि पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्या योजनेस त्वरित मंजुरी दिली. परंतु काही हितसंबंधियांनी मंत्रिमंडळाची मान्यता मिळविण्यासाठी एक वर्ष लावले. मी हे दादासाहेबांना सांगितल्यावर स्पेशल मेन्शन तरतुदीखाली त्यांनी माझ्या नावासकट हा प्रश्न राज्यसभेत मांडला.यशस्वी राजकीय कारकीर्ददादासाहेबांच्या राजकीय कारकिर्दीविषयी बरेचचे लिहिण्यात आले आहे. परंतु त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी कॉँग्रेसशी सतत केलेली आघाडी. तसे करण्यात त्यांनी कसलीही चूक केली असे मला कधीच वाटले नाही. ते एकटे असते तर आंबेडकरवादी आणि कॉँग्रेसशी सहकार्य म्हणजे आंबेडकरद्रोह, असे समजणे केवळ अडाणीपणा नाही, तर दांभिकपणाचेही आहे. कधी कधी बाबासाहेबांच्या विचारांशी पूर्णपणे विरोधी असलेल्या पक्ष-संघटनांशी लपून-छपून हातमिळवणी करण्यापेक्षा कॉँग्रेससारख्या (त्यात काही उणिवा असूनही) उदारमतवादी-लोकशाही-धर्मनिरपेक्ष-मध्यममार्गी-सर्वसमावेशक पक्षाशी सहकार्य केले, तर त्यात कसला आंबेडकरद्रोह? त्याची तुलना भारतीय पक्षासारख्या जातीयवादी पक्षाशी तर होऊ शकत नाही ना? आणि आज महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाच्या मोजता येणार नाहीत इतके जे तुकडे झाले आहेत, त्याचे कारण काय आंबेडकरवादाविषयी मतभेद हे आहे? दुसरे, १९९८च्या लोकसभेच्या निवडणुकीत एकसंध रिपाइंचे सर्वश्री गवई, रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर आणि जोगेंद्र कवाडे हे चार खासदार प्रथमच जनरल मतदारसंघातून निवडून गेले, ते कॉँग्रेसच्या पाठिंब्यावरच ना? नाहीतर ही मंडळी लोकसभेच्या पायऱ्या चढू तरी शकली असती का? त्यामुळे श्री. गवई यांनी सतत कॉँग्रेसशी आघाडी केली ती राजकीयदृष्ट्या पूर्णपणे बरोबर होती. मात्र, ती करताना बाबासाहेबांच्या विचारांशी त्यांनी तडजोड केली असे एक उदाहरण दाखविता येणार नाही.दीक्षाभूमीचे शिल्पकारत्यांच्या सार्वजनिक जीवनातील ऐतिहासिक कार्य म्हणजे ते नागपूर येथील दीक्षाभूमीचे शिल्पकार आहेत. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी डॉ. आंबेडकर स्मारक समिती स्थापन केली. ते या समितीचे संस्थापक अध्यक्ष. त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या मध्यस्थीने सध्याची चौदा एकर जागा मिळवली. ती सहजपणे मिळाली नाही, तर ‘‘चौदा एकरांपैकी एक इंचही कमी जागा घेणार नाही,’’ असे सांगून त्यासाठी कर्मवीरांना सत्याग्रह करावा लागला. डिसेंबर १९७१ मध्ये कर्मवीरांचे निधन झाल्यानंतर दादासाहेब गवई स्मारक समितीचे अध्यक्ष झाले आणि त्यानंतर प्रयत्नांची पराकाष्टा करून व कोट्यवधी रुपयांच्या देणग्या जमा करून, केवळ महाराष्ट्रातील अथवा देशातीलच नव्हे, तर जगातील प्रत्येक बौद्धधर्मीयाला अभिमान वाटेल, अशाप्रकारची भव्य दीक्षाभूमी उभी केली. यापुढे दीक्षाभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करताना तिचे शिल्पकार असलेल्या दादासाहेब गवई यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण झाल्याशिवाय राहणार नाही.शेवटी, स्मारक समितीच्या विद्यमान विश्वस्तांना मी एकच विनंती करू इच्छितो, गवई यांच्या राजकीय प्रवासात आणि पर्यायाने दीक्षाभूमी उभी करण्यात त्यांच्या सहचारिणी कमलतार्इंचे मोठे योगदान आहे. या पार्श्वभूमीवर समितीच्या विश्वस्तांनी दादासाहेबांबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांची समितीच्या अध्यक्षपदी सन्मानपूर्वक नियुक्ती करावी. ही केवळ माझीच नव्हे, तर महाराष्ट्रातील तमाम बौद्ध जनतेची भावना असेल, असा माझा विश्वास आहे.
दादासाहेब गवई : दीक्षाभूमीचे शिल्पकार
By admin | Updated: July 31, 2015 02:21 IST