शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

लेखकांसमोर समाजाला तिमिराकडून तेजाकडे नेण्याचे आव्हान!

By admin | Updated: August 9, 2015 01:25 IST

वाङ्मय केवळ स्वायत्त गोष्ट नाही. तिचा संबंध समाज व संस्कृती ह्यांच्याशी अपरिहार्यपणे असतोच़ त्यामुळे वाङ्मयातील क्रांतीचा संबंधही समाज आणि संस्कृती ह्यांच्यातील अपेक्षित विकासोन्मुख

- डॉ. अक्षयकुमार काळे

वाङ्मय केवळ स्वायत्त गोष्ट नाही. तिचा संबंध समाज व संस्कृती ह्यांच्याशी अपरिहार्यपणे असतोच़ त्यामुळे वाङ्मयातील क्रांतीचा संबंधही समाज आणि संस्कृती ह्यांच्यातील अपेक्षित विकासोन्मुख ध्येयशील परिवर्तनाशी असतो. हे परिवर्तन एखाद्या लेखकाच्या अचाट प्रयत्नांच्या आणि प्रतिभेच्या जोरावर अतिशय वेगाने होते, तेव्हा त्याला आपण वाङ्मयातील क्रांती असे म्हणू शकतो.वाङ्मय क्षेत्रात निर्मितीला साचलेपणाची कळा येते. तोच तो विकासविन्मुख आशय साहित्यातून पुन:पुन्हा प्रगट होऊ लागतो. स्वकाळाशी समरस न होता, सभोवतालची जीवनविषयक आव्हाने न स्वीकारता, समकालीन परिस्थितीतून येणाऱ्या अनुभूतीतून आपल्या रचनेचे घाट न शोधता जेव्हा लेखक पौराणिक, ऐतिहासिक, त्याच त्या रंजक घटनांत, पूर्वसुरींनी दळलेल्या दळणात आपल्या प्रेरणा शोधतात आणि सातत्याने अनुकरणजीवी नि:सत्व निर्मिती करू लागतात. इतकेच नव्हे तर उथळ रंजनद्रव्ये वापरून सामान्य रसिकांना भुलवतात, खोट्या आणि बेगड्या रसिकतेला उत्तेजन देऊन आपला वाङ्मयीन कचरा आकर्षकपणे डबाबंद करून जाहिरातीच्या आधारावर हातोहात खपवतात, तेव्हा वाङ्मयीन अराजक निर्माण होते. ‘जल सडले ते निभ्रान्त। तरि धूर्त त्यास तीर्थत्व। देउनि नाडती भोळे।’ अशी स्थिती निर्माण होते तेव्हा त्याविरुद्ध उठावाची गरज निर्माण होते. वाङ्मय प्रांतातील मिळमिळीतपण अवघेच टाकून उत्कट भव्य वास्तव्याकडे मार्गक्रमण करण्याची, तिमिराकडून तेजाकडे संपूर्ण समाजाला घेऊन जाण्याची जबाबदारी क्रांतिकारी लेखकावर येत असते.मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रातदेखील असे अराजक वेळोवेळी निर्माण झाले आणि त्या त्या काळात समर्थ लेखकांनी त्याविरुद्ध करावयाच्या बंडाचे आव्हान पेलल्याचे दिसते. त्यांनाच आपण क्रांतिकारी लेखक म्हणतो. त्यात पहिले नाव ज्ञानेश्वरांचे. कवी बी यांनी ‘पहिला बंडवाला’ म्हणून त्यांचा सार्थ गौरव केला आहे. संस्कृत भाषेवर असामान्य प्रभुत्व असतानादेखील त्या भाषेत निर्मिती न करता किंवा त्यातील शृंगारप्रवण कथानकाची आळवणी मराठीत वेगळ्या पद्धतीने न करता आपल्या सभोवतालचा बहुजन समाज अध्यात्मप्रवण, कर्तव्यनिष्ठ कसा होईल हे पाहण्याचा त्यांनी प्रयत्न केला. असे करताना ‘वेदु किरू होए आपणाठायी। परि कृपणु ऐसा आन नाही। जो कानी लागला तिहि। वर्णांच्याचि।’ असे म्हणून बहुजनांप्रति कंजूष असणाऱ्या वेदांचे वाभाडे काढले. वाङ्मयीन क्रांती अशाच मन:प्रवृत्तीतून होते. कोणत्याही वाङ्मयीन क्रांतीच्या मूलगर्भात मानवतेच्या प्रेमाचा उत्कट लाव्हा ओसंडून बाहेर येण्यासाठी उत्सुक झालेला असतो. तुकारामांनाही आपल्या क्रांतिकार्यासाठी त्याचा आधार मिळतो. अर्वाचीन काळात अशीच क्रांती महात्मा फुले यांच्या आणि केशवसुतांच्या लेखनाने झाली. फुले तर महाराष्ट्रातल्या सामाजिक क्रांतीचे जनकच होते.नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे,कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे।अशी क्रांतिकारी वीरनायकाची प्रतिमा फुले यांच्या आणि आगरकरांच्या प्रणमनशील व्यक्तिमत्त्वांशी झालेल्या सात्मीकरणातूनच केशवसुतांना साकार करता आली आणि ‘तुतारी’, ‘स्फूर्ती’, ‘नवा शिपाई’ यांसारख्या मराठी काव्यात संपूर्णपणे क्रांतिकारी बदल घडवून आणणाऱ्या कविता लिहिता आल्या.पद्यपंक्तीची तरफ आमुच्या करी विधीने दिली असेटेकुनि ती जनताशीर्षावरि जग उलथुनिया देऊ कसे!बंडाचा तो झेंडा उभवुनि धामधूम जिकडे तिकडेउडवुनि देउनि, जुलुमाचे या करू पहा तुकडे तुकडेअसे वाङ्मयातल्या क्रांतीसाठी आवश्यक असणारे बंडाचे निशाण उभारता आले. अनिल - मुक्तिबोधांना या निशाणाखाली आपल्या वाङ्मयीन क्रांतिकार्याची दिशा ठरवता आली. मर्ढेकरांच्या नवकाव्याने साधलेल्या वाङ्मयीन क्रांतीमागे केशवसुतांच्या प्रगमनशील धगधगत्या व्यक्तिमत्त्वापासून दूर सरकलेल्या आत्मनिष्ठाशून्य वाङ्मयामुळे निर्माण झालेला प्रक्षोभच होता. साम्यवादी सुर्व्यांना आणि आंबेडकरांच्या तेजस्वी आणि झुंजार व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झालेल्या दलित लेखकांना आलेल्या आत्मभानामुळे, त्यांनी खोलवर चालवलेल्या आत्मशोधामुळे, प्रचलित व्यवस्थेला दिलेल्या दृढ नकारामुळे आणि स्वीकारलेल्या सर्वंकष विद्रोहाच्या भूमिकेमुळे मराठी साहित्यात क्रांतिसन्मुख परिवर्तनाची लाट उसळली. आदिवासी साहित्य ही या नाण्याची दुसरी बाजू होय. वाङ्मयीन क्रांतीच्या या ऊर्जस्वल पार्श्वभूमीवर आजच्या अगदी समकालीन वाङ्मयाचे चित्र निराशाजनक आहे.कोणत्या अन् कशा वाङ्मयीन क्रांतीचे स्वप्न बघायचे ?मूळचा सधन, मध्यम वर्ग, बहुजन आणि दलित ह्यातून शिकून निर्माण झालेला मध्यम वर्ग या सर्वांनीच चढाओढीने इंग्रजीच्या पायावर लोळण घेऊन आपल्या मातृभाषेला आणि अस्मितेला कमालीचे दुय्यम महत्त्व द्यावयाचे ठरविले असताना कोणत्या आणि कशा वाङ्मयीन क्रांतीचे स्वप्न बघायचे, असा प्रश्न आज निर्माण झाला आहे. या क्रांतिदिनी आमचे उदयोन्मुख लेखक निर्मिती वृत्ताची दिव्य दाहकता समजून घेऊन क्रांतिकारी लेखकांच्या आत्म्यांचा शोध करून प्रकाशाच्या वाटा उजळतील तर मराठी साहित्य नव्या वाङ्मयीन क्रांतीच्या दिशेने वाटचाल करू लागेल. एरवी क्रांतीचा तवंग असणारी जात-जमातनिहाय वाङ्मयीन डबकी जागोजागी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत.(लेखक हे मराठी साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक आहेत.)