शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

लोकप्रिय व्हा, कायदा पाळण्याची गरज नाही...

By admin | Updated: May 8, 2015 06:06 IST

२८ सप्टेंबर २००२. मध्यरात्रीनंतर वांद्र्याच्या फुटपाथवर सलमान खानची गाडी आदळली. एक माणूस मेला, चार जखमी झाले. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी सलमानच्या रक्ताची

निळू दामले(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक)२८ सप्टेंबर २००२. मध्यरात्रीनंतर वांद्र्याच्या फुटपाथवर सलमान खानची गाडी आदळली. एक माणूस मेला, चार जखमी झाले. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी सलमानच्या रक्ताची तपासणी करून त्याला सोडून दिलं. २९ रोजी माध्यमांमध्ये ही घटना लोकांना पाहायला मिळाली. ३० तारखेच्या वर्तमानपत्रात सविस्तर बातम्या आल्या. तरी सलमान बाहेर. जणू काही घडलंच नव्हतं. त्यावेळी निखिल वागळे ‘महानगर’चे संपादक होते आणि मी महानगरमधे स्तंभ, संपादकीय लिहीत असे. सलमान प्रकरणावर विचार करत असतानाच ऐश्वर्या राय यांच्या वडिलांचा फोन आला. सलमान ऐश्वर्याच्या घरासमोर दारू पिऊन शिमगा करत असे. ‘आम्हाला त्रास होतोय, काही तरी करा’ असं ऐश्वर्याचे वडील म्हणत होते. पैसा आणि सिनेमामुळे मिळालेल्या प्रतिमेचा सलमानला माज आला आहे, त्याच्यासमोर सरकारही वाकतंय, आपण काही तरी केलं पाहिजे असं आम्हाला वाटलं. आमचे वकील मित्र नितीन प्रधान यांना आम्ही फोन केला. लगोलग त्यांच्या घरी पोचलो. आमचा निर्णय झाला की आपण एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन करावं. सलमानला पकडावं, त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा खटला भरावा, या घटनेचा त्रास झालेल्यांना भरघोस भरपाई मिळावी अशा मागण्या आम्ही तयार केल्या. स्त्रियांवरील अत्याचाराविरोधात लढणाऱ्या संघटनेच्या प्रतिनिधी म्हणून सुधा कुलकर्णी यांना खटल्यात सोबत घेतलं. कोर्टात गर्दी होती. गलेलठ्ठ खिशांच्या वकिलांच्या घामाघूम गराड्यात मी अंग चोरून उभा होतो. यथावकाश आमची प्रार्थना न्यायाधीशांसमोर आली. न्यायाधीशांनी पहिली ओळ वाचली, ते दाणकन सरकारवर कोसळले. सरकार काही करत नाही, पोलीस काही करत नाहीत, यावर त्यांनी कडक ताशेरे मारले. कोर्टात सरकारचा माणूस का हजर नाही असं विचारलं. ताबडतोब कारवाई केली नाहीत, तर मला मंत्री, सरकारी वकील यांच्यावर समन्स काढावं लागेल असं काहीतरी ते म्हणाले. कायद्यात नुकसानभरपाईच्या तरतुदी काय आहेत याचा विचार न करता त्यांनी सतरा अठरा लाखांची रक्कम ताबडतोब सलमानकडून घ्यावी असा निकालही देऊन टाकला. सरकार कामाला लागलं. सलमान हा शिकला सवरलेला माणूस. त्यामुळं दारू प्याल्यानंतर माणसाची विचारशक्ती नीट काम करत नाही हे त्याला कळतं. तरीही जाम दारू प्यायलेला सलमान गाडी चालवतो याचा अर्थ काय घ्यायचा? यालाच (ठरवून, प्लॅनिंग करून केलेला नसला तरी) खून मानायचं की नाही?- या मुद्द्यानं सुरुवात झाली. सलमानचे वकील ही बेदरकार ड्रायव्हिंगची, अपघाताची केस ठरवून कमी गंभीर गुन्हा आहे असं म्हणत होते. माध्यमाच्या दबावामुळं, न्यायाधीशांनी दिलेल्या दणक्यामुळं सरकार हा सदोष मनुष्य खून आहे असं म्हणत होतं. बेदरकार ड्रायव्हिंगमध्ये चार सहा महिने शिक्षा आणि पाच-पन्नास हजार रुपयांच्या दंडावर माणूस सुटतो. सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दहा वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा होते.घोळ सुरू झाला. खालचं कोर्ट, त्यावरचं कोर्ट, त्यावरचं कोर्ट असा कायद्याचा खेळ सुरू झाला. हा खेळ फार महाग असतो. कोर्टही मजेशीर असतं. समोरचा वकील कोण आहे याचाही विचार कोर्ट अनेक वेळा करतं. याला कोर्ट क्र ाफ्ट असं नाव आहे. कोणा जजसमोर कोणा वकिलाचा दबदबा आहे याचा विचार करून त्या-त्या वकिलाकडं माणसं जातात. हे कायच्या कायचं महागडं प्रकरण. वर्षाला शेदोनशे कोटींची उलाढाल करणाऱ्या सलमानला कोर्ट क्र ाफ्टची काहीच अडचण नसते.मूळ घटना घडून गेल्यावर तब्बल तेरा वर्षांनी एक अशोक सिंह अचानक उपटतो आणि म्हणतो की सलमान नव्हे तर मीच गाडी चालवत होतो! कोर्टानं त्याची दखल घेतली नाही हे नशीब. नाही तर खटला आणखी लांबला असता आणि सलमान चक्क निर्दोष सुटला असता. खटला उभा राहण्यात दिरंगाई. पुराव्यातली भोकं शोधून काढून पुराव्याचं वस्त्र फाडण्याच्या वकिलांच्या खटाटोपानं दिरंगाई. सलमानच्या रक्तात अल्कोहोल सापडलं होतं. तरीही त्याला दारू देणारा बार टेंडर सांगतो की त्याच्या ग्लासात पाण्यासारखा द्रव दिसला खरा, पण तो द्रव बकार्डी नावाची व्होडका होती की नाही हे माहीत नाही. सलमानच्या रक्तातलं दारूचं प्रमाण घातक होतं. सलमानचा पोलीस कॉन्स्टेबल अंगरक्षक रवींद्र पाटील यानं मॅजिस्ट्रेटसमोर साक्ष दिली- ‘सलमानला मी सांगितलं होतं की तू दारू प्याला आहेस, गाडी चालवू नकोस. तरीही त्यानं गाडी चालवली.’ या दोन पुराव्यामुळं सलमान खरं म्हणजे संपला होता. पण सलमानकडं पैसे होते. गलेलठ्ठ वकील त्याच्या दिमतीला धावले. मेलेला माणूस गाडीखाली मेला नसून त्या ठिकाणी आणलेल्या क्रेनखाली मेला असं कोर्टाला सांगण्यात आलं. अपघात झाला तो टायर फुटल्यामुळं असं सांगण्यात आलं. काफ्काच्या कथेत घडतात तशा चमत्कारिक गोष्टी कोर्टासमोर आणल्या जात होत्या. अशा नाना गोष्टी घडवून आणल्या की खटला लांबत जातो. अजूनही तो लांबणारच आहे. कारण अजून उच्च न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे आणि लाखो रुपये मूल्याचे वकीलही ढीगभरानं मुंबई-दिल्लीत पडले आहेत. त्यामुळं पाच-दहा वर्षं तर कुठंच गेली नाहीत. या खेळात २०३० साल उजाडेल. मग सलमानचे वकील सांगतील की २००२ ते २०३० एवढा २८ वर्षांचा काळ अशिलानं खूप मानसिक त्रास सोसलाच आहे, करोडो रुपयांचा दानधर्म केला आहे, तेव्हा झालं इतकं खूप झालं, कोटीभर रुपये दंड घेऊन सलमानला सोडा. काय माहीत? सुटेलही!!२०१५ पर्यंत सलमानने त्याच्याकडं असलेल्या पैशाच्या जोरावर कायदा झुलवत ठेवला. जणू पैसा हा कायद्याला पर्याय. सबस्टिट्यूट. पैसा खर्च करा, कायदा त्रास देत नाही. सलमाननं कॅन्सर रोग्यांना मदत केली. गरिबांना मदत केली. सलमान हा संत आहे, थोर माणूस आहे. तेव्हा त्याला शिक्षा न झालेली बरी.म्हणजे सदाचार हा कायद्याला पर्याय. सदाचार करणाऱ्याला कायद्याचं बंधन नाही. सलमान खाननं काँग्रेसच्या पुढाऱ्यांंसाठी प्रचार केला. मोदींच्या शपथ ग्रहणाला सलमान हजर होता. मोदींसाठी त्यानं गुजरातेत पतंगही उडवले. सलमानचं राजकारणातलं वजन कळत असल्यानंच पोलीसही दमानं घेत असतात.म्हणजे राजकारण हा कायद्याला पर्याय आहे. सत्तेचा नीट वापर करा, कायदा पाळण्याची आवश्यकता नाही. सुरुवातीपासून हे असंच आहे. बारा वर्षांपूर्वी आमची प्रार्थना ऐकून उच्च न्यायालयानं सलमानवरच्या कारवाईला गती दिली. ते सारं पेपरात आलं. त्यानंतर एके दिवशी मी एका कॉलेजात व्याख्यान द्यायला गेलो होतो. तरुण मुलींनी मला गराडा घातला. त्या माझ्यावर चिडल्या होत्या. सलमान हा त्यांच्या हृदयाचा तुकडा होता. त्याला तुरुंगात पाठवल्याबद्दल त्यांचा माझ्यावर राग होता. सलमानचं नाव घेऊन त्या किंचाळत होत्या, संधी मिळती तर त्यांनी माझ्या झिंज्यासुद्धा (त्यावेळी माझ्या डोक्यावर केस होते) उपटल्या असत्या.म्हणजे लोकप्रियता हा कायद्याला पर्याय असतो. लोकप्रिय व्हा, कायदा पाळायची आवश्यकता नाही.