मुंबईचे खालावत चाललेले मराठीपण सावरुन धरण्यासाठी किंवा तसा आवेश धारण करुन मुंबईच्या समाजकारणात प्रवेश केलेल्या व एकीकडे आत्यंतिक जिव्हाळा आणि दुसरीकडे तितकाच टोकदार विरोध यांची धनी झालेल्या व आज आपल्या पन्नाशीत प्रवेश करीत असलेल्या शिवसेनेकडे आजवर कोणालाही दुर्लक्ष करता आलेले नाही, ही बाब सर्वमान्य व्हावी. केवळ मुंबई शहरापुरतेच आपले कार्यक्षेत्र मर्यादित ठेऊन आणि ऐंशी टक्के समाजकारण व अवघे वीस टक्के राजकारण असे ब्रीद घेऊन कार्यारंभ केलेल्या सेनेने यथावकाश शत प्रतिशत राजकारण आणि शत प्रतिशत महाराष्ट्र ही भूमिका स्वीकारली. सेनेला तिच्या बाल्यावस्थेत आकार देणे, तिचा व्याप वाढवीत नेणे, राजकीय पसारा वृद्धिंगत करणे आणि कोणालाही तिच्याकडे दुर्लक्ष करता येऊ नये अशी ताकद निर्माण करणे, याचे संपूर्ण श्रेय सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याचकडे जाते. त्यांना त्या काळात जीवाभावाचे अनेक सहकारी लागले व सेनेला मोठेपण प्राप्त करुन देण्यात त्यांचाही हातभार लागला, हे खरे असले तरी त्यामागेही सेनाप्रमुखांचे चुंबकीय व्यक्तिमत्व कारणीभूत होते, ही बाब कोणालाही नाकारता येणार नाही. कालांतराने यातील काही सहकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या हयातीत व काहींनी त्यानंतर सेनेशी द्रोह केला. पण त्यातील कुणीही व खुद्द बाळासाहेबांच्या संदर्भात उणावाकडा शब्द कधीही उच्चारला नाही. ते त्यांच्या मनातील सेनाप्रमुखांविषयीच्या आदरयुक्त दराऱ्याचे गमक होते की शिवसैेनिकांविषयीची त्यांच्या मनातील भीती होती, याचा उलगडा करणे एकूण अवघडच म्हणायचे. सेनेच्या राजकीय शैशवावस्थेत तिला वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील या महाराष्ट्राच्या दोन्ही मुख्यमंत्र्यांचे सक्रीय सहकार्य लाभले व त्यातूनच आकारविल्हे सेना मोठी होत गेली, हा आक्षेप घटकाभर मान्यही केला, तरी पुन्हा संधीचे सोने करण्यासाठीही अंगी वकूब असावाच लागतो. समाजकारणातून राजकारण आणि मराठीपणातून हिन्दुकरण हा प्रवासही बाळासाहेबांच्याच कारकिर्दीत घडून आला. जे स्वत:ला योग्य वाटले, ते केले हाच त्यांचा खाक्या होता. सेनेच्याच कृपेने खासदारकी लाभलेले एक संपादक तर गंमतीने म्हणत की, बाकी सारे सामान्य जीव आधी विचार व नंतर कृती करतात तर बाळासाहेब कृती करुन मोकळे होतात आणि नंतर विचार करतात. यात फरक एकच, तो विचार ते बदलत नसत. एखाद्या संघटनेवर इतकी जबर पकड असणारे स्वातंत्र्योत्तर काळातील जे मोजके राजकीय आणि सामाजिक नेते होऊन गेले, त्यात बाळासाहेब अव्वल स्थानी होते, हे निर्विवाद. स्वाभाविकच त्यांच्या निधनानंतर सेनेची वाताहत होईल अशी अनेकांची अटकळ होती. विशेषत: सेनाप्रमुखांच्या हयातीतच राज ठाकरे यांंनी सवतासुभा मांडल्याने आणि उद्धव व राज यांच्यात राज अधिक आक्रमक असल्याने बाळासाहेबांच्या पश्च्यात तेच सेनेला गिळंकृत करतील, अशी भाकिते वर्तविली जात होती. राज ठाकरे यांचे राजकारणातील सवते पदार्पण तशी ग्वाहीदेखील देत होते. पण प्रत्यक्षात राज आणि बाळासाहेबांच्या माघारी सेनेची सूत्रे हाती घेतलेले उद्धव ठाकरे यांनी ससा-कासवाच्या शर्यतीचीच आठवण करुन दिली. तरीही उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व अद्याप खऱ्या अर्थाने कसाला लागले असे म्हणता येणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीने निर्माण केलेले वातावरण नीट लक्षात न घेता, त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाशी युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवून आपले नेतृत्व पणास लावले खरे, पण स्वबळावर महाराष्ट्राची सत्ता काबीज करण्याचा त्यांचा मनसुबा पार ढासळून गेला. तरीही एकदा स्वीकारलेली स्वतंत्रपणाची आणि स्वबळाची भूमिका त्यांनी कायम ठेवली असती तर सतत राजकीय जुगार खेळण्याचा वडिलांचा वारसा त्यांच्याकडे गेला आहे, असे म्हणता आले असते. पण तसे झाले नाही. सत्तेविना कासावीस झालेल्या शिवसैनिकांची मोट बांधून ठेवणे उद्धव याना दुरापास्त वाटू लागले. संघटनेच्या उभ्या फुटीची भीती भेडसावू लागली आणि अखेर त्यांनी स्वबळ आणि स्वाभिमान बाजूला सारुन भाजपाशी हातमिळवणी केली. बाळासाहेब हयात असते तर मुळात भाजपाची सेनेशी दोन हात करण्याची हिंमतच झाली नसती. तरीही तिने ती केली असती आणि बाळासाहेबांनी तिला ठोकरुन निवडणूक लढविली असती व स्वबळ त्यांनाही मिळाले नसते तरी त्यांनी सौदेबाजी केली नसती. कारण आपला सैनिक कोणत्याही स्थितीत आपल्याशी द्रोह करणार नाही, याची त्यांना मनोमन खात्री होती. ही खात्री आपोआप निर्माण झालेली नव्हती. त्यासाठी बाळासाहेबांनी आपल्या सैनिकांवर मन:पूत प्रेम केले होते व तितकेच ते प्राप्तही केले होते. सेनाप्रमुख संपर्काच्या बाहेर गेले आहेत, असा अनुभव त्या काळात ना कोणी सैनिकांनी घेतला, राजकारण्यांनी घेतला, ना माध्यमांच्या प्रतिनिधींनी घेतला. तशी स्थिती राहिलेली नाही. सामान्यातील सामान्यांसाठी राजकारण आणि समाजकारण करणारी बाळासाहेबांची शिवसेना आज दरबारी राजकारण करण्यात मश्गुल आहे. नित्याचा जनसंपर्क हा कोणत्याही राजकीय पक्षाचा प्राणवायू असतो. तो पुरेशा प्रमाणात मिळाला नाही तर केवळ केविलवाणेपण पदरी पडत असते. त्या दृष्टीने आपल्याला लाभलेला वारसा सिद्ध करुन दाखविण्याची संधी सेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात उद्धव यांच्याकडे चालून आली आहे, ती मुबंई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या निमित्ताने. ही निवडणूक याचसाठी महत्वाची, कारण सेनेच्या आजवरच्या साऱ्या भराऱ्यांचे ‘लॉन्चींन्ग पॅड’ अखेर ही महापालिकाच राहिली आहे.
बाळासाहेबांच्या शिवसेनेची पन्नाशी!
By admin | Updated: June 19, 2015 03:18 IST