म्हसदी (ता़ साक्री जि़ धुळे) : पाणी पाहण्यासाठी गेलेल्या तरुणीचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची घटना साक्री तालुक्यातील ककाणी येथील नव्या गावठाण शिवारात शुक्रवारी सायंकाळी घडली़ तिचा शोध घेतला असता शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेततळ्याजवळ तिचा मृतदेह आढळून आला़ या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात आली़साक्री तालुक्यातील ककाणी येथील प्रगतशील शेतकरी मधुकर विठ्ठल बेडसे यांचे नव्या गावठाण शिवारातील शेतात वास्तव्य आहे. याच शेतात त्यांनी मोठ्या आकाराचे शेततळे बांधलेले आहे. शुक्रवारी सायंकाळी बेडसे यांची कन्या जयश्री मधुकर बेडसे (२१) ही शेततळ्यातील पाणी पाहण्यासाठी बांधावर गेली. मात्र पायात बुट असल्याने जयश्रीचा पाय अचानक घसरला आणि ती शेततळ्यातील पाण्यात पडली. सायंकाळ होऊन देखील ती घरी न आल्यामुळे सर्वत्र तिचा शोध घेण्यात आला़ शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला़ या घटनेची माहिती गाव व परीसरात कळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती़ तिला पाण्याबाहेर काढून साक्रीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले़ याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ यानंतर तिच्या मृतदेहावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले़जयश्री ही हुशार विद्यार्थीनी होती. तीने दहावीच्या परिक्षेत ककाणी विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला होता. बी.फार्मसी परिक्षा देखील उत्तीर्ण झाली होती. तिच्या अकाली निधनामुळे गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जयश्री हिच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे.
ककाणी शिवारात शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 21:23 IST