धुळे : शेतीच्या वादातून मारहाण केल्याची घटना तालुक्यातील फागणे गावात रविवारी रात्री घडली़ यावेळी हाताबुक्यांसह सर्रासपणे लोखंडी रॉडचा वापर झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ यात दोन महिलांसह एक जण असे तिघांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ याप्रकरणी जखमी महिलेने धुळे तालुका पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटे फिर्याद दाखल केल्याने १८ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला़धुळे तालुक्यातील फागणे गावात शेतीचा वाद अचानक पेटल्याने काहीसा तणाव निर्माण झाला होता़ शेतीचा वाद घालत एक जमावाने घरात प्रवेश करीत महिलेशी उज्जत भांडण सुरु केले़ शाब्दिक वाद वाढल्यानंतर तिची छेड काढली़ तिच्या पोटाला लाथा बुक्याने मारहाण केली़ एवढ्यावरच न थांबता त्या महिलेच्या सासुच्या डोक्यात लोखंडी रॉडने टाकल्याने गंभीर दुखापत झाली़ त्या महिलेचा जेठ वादामध्ये आल्याने त्यालाही मारहाण करण्यात आली़ लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने त्यांच्याही डोक्याला दुखापत झाली़ या गोंधळात जखमी महिलेच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या गहाळ झाल्या आहेत़ बराच काळ हा धुमाकूळ सुरु होता़ त्यामुळे काहीसा तणाव वाढल्याने परिस्थिती गंभीर झाली होती़ यात दोन महिलांसह एक जण असे तीन जण जखमी झाल्याने त्यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमी आणि पीडित महिलेने धुळे तालुका पोलीस ठाणे गाठले आणि सोमवारी पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, भूषण चौधरी उर्फ ठाकरे, लखन सोनार, कुणाल पाटील, संजय पाटील, टिनू पाटील, भिकन पाटील (कोणाचेही पूर्ण नाव माहित नाही) सदाशिव संभाजी पाटील, जितेंद्र संभाजी पाटील, सुनील मोतीराम पाटील यांचे दोन मुले आणि त्यांच्यासह अन्य ७ ते ८ जण अनोळखी यांच्या विरोधात संशयावरुन फिर्याद दाखल झाल्याने भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२६, ४५२, ३५४ (अ), ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलीस उपनिरीक्षक काळे घटनेचा तपास करीत आहेत़
धुळ्यात शेतीचा वाद पेटला लोखंडी रॉडचा सर्रास वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 21:22 IST