वरवाडे येथे गाडगेबाबा यांना अभिवादन
शिरपूर : वरवाडे येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत राष्ट्रीय संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.मुख्याध्यापक गोपाल पाटील यांनी प्रतिमा पूजन केले. मनिषा पाटील यांनी गाडगेबाबांच्या जीवनावर प्रकाश टाकला. सूत्रसंचालन राकेश शिरसाठ यांनी केले. आभार तुळशीराम पावरा यांनी मानले.
नरेंद्र खैरनार यांना पीएचडी पदवी प्रदान
साक्री : जिल्हा परिषद शाळा इंदवे येथे कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक कवी नरेंद्र खैरनार यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने पीएचडी पदवी प्रदान केली. त्यांना प्रा.डॅा. आशुतोष पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
थंडी गायब, उन्हाचे प्रमाण वाढू लागले
नेर : गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण एकदम कमी झालेले असून, उन्हाचे प्रमाण मात्र वाढलेले आहे. त्यामुळे दुपारी १२ ते सायंकाळी ४ पर्यंत गावातही शुकशुकाट असतो. शेतकरीही आता सकाळीच आपले कामे आटोपण्यावर भरत देत आहे.
बसस्थानकातील खड्डा बुजविण्यात यावा
धुळे : येथील मध्यवर्ती बसस्थानकात बस प्रवेश करतात त्याठिकाणी मोठा खड्डा पडलेला आहे. त्यामुळे येथून बसनेतांना चालकांना कसरत करावी लागत असते. त्यामुळे किमान तो खड्डातरी बुजविण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
चित्रपटगृह चालकांना प्रेक्षकांची प्रतीक्षाच
धुळे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेले चित्रपटगृह दीर्घ कालावधीनंतर सुरू झाले. सुरवातीचे काही दिवस प्रेक्षकांची चांगली गर्दी झालेली होती. मात्र आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने, प्रेक्षकांनीही चित्रपटगृहांकडे पाठ फिरवली आहे.त्यामुळे चित्रपटगृहांना प्रेक्षकांची प्रतीक्षाच आहे.
दुभाजकात टाकला जातो कचरा
धुळे : वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून ८० फुटी रस्त्यावर दुभाजक टाकण्यात आलेले आहे. मात्र या परिसरातील रहिवासी त्या दुभाजकाचा उपयोग कचरा टाकण्यासाठी करीत आहे. त्यामुळे अस्वच्छता वाढत आहे.
मोबाईलची रेंज मिळत नसल्याची तक्रार
शिंदखेडा : शहर व परिसरात बीएसएनएल तसेच खाजगी कंपन्यांची मोबाईलची रेंज मिळत नसल्याची ग्राहकांची तक्रार आहे. रेंज मिळावी यासाठी उंचावर जावे लागते. तरी बीएसएनएलसह खाजगी कंपन्यांनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी
शिंदखेडा : गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे गहू, पपई पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
धुळीचा नागरिकांना होतोय त्रास
शिंदखेडा : गेल्या काही महिन्यांपासून शिंदखेडा-चिमठाणे रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र या तयार होणाऱ्या रस्त्यावर पाणी टाकण्यात येत नसल्याने, वाहनधारक, शेतकऱ्यांना धुळीचा सामना करावा लागतोय. या रस्त्यावर पाणी टाकावे.